दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघाच्या डिजिटल नवोन्मेष मंडळाचा सह-अध्यक्ष म्हणून भारताची निवड
Posted On:
21 MAR 2024 8:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 मार्च 2024
आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघाच्या (आयटीयु) जिनिव्हा येथील मुख्यालयात 18 ते 20 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या बैठकींच्या मालिकेमध्ये भारतातर्फे केंद्रीय दूरसंचार विभाग सचिव डॉ.नीरज मित्तल यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भाग घेतला. विविध देशांदरम्यान सहयोगी संबंधांची जोपासना तसेच दूरसंचार तसेच माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान (आयसीटी) या क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा शोध घेण्यावर या दौऱ्यात अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले.
आयटीयुच्या अखत्यारीत असलेल्या आणि डिजिटल विकासासाठीच्या नवोन्मेष आणि उद्योजकता आघाडीच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आलेल्या डिजिटल नवोन्मेष मंडळाचे सह-अध्यक्ष म्हणून डॉ.नीरज मित्तल यांची एकमताने निवड करण्यात आली. आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका या क्षेत्रांमध्ये विस्तारलेल्या आयटीयुच्या 23 सदस्य देशांचे दूरसंचार/माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि उपमंत्री यांचा डिजिटल नवोन्मेष मंडळामध्ये समावेश होतो.
जगभरात कार्यरत असलेल्या नेटवर्क गतिमानता केंद्रांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघाने जगभरातील 17 संघटनांची निवड केली असून या संघटना नवी दिल्ली येथील आयटीयु क्षेत्र कार्यालयासह नवोन्मेष केंद्रातील जागतिक नवोन्मेष केंद्राशी गतिमानता केंद्रांच्या नेटवर्कचे यजमानपद पार पाडतील.
डॉ.नीरज मित्तल यांनी जिनिव्हा येथील भारतीय स्थायी मिशनच्या आढावा बैठकीचे देखील अध्यक्षपद भूषवले. या बैठकीत भारतातील शिक्षणक्षेत्र तसेच उद्योगक्षेत्र यांतील सदस्यांच्या अधिक प्रमाणातील सहभागासह भारताचा आयटीयुच्या उपक्रमांतील सहभाग वाढवण्यासाठी महत्त्वाच्या टप्प्यांची प्रगती तसेच प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला.
आयटीयुच्या मुख्यालयात आयोजित डिजिटल नवोन्मेष मंडळाच्या बैठकीच्या अनुषंगाने भारत आणि जपान दरम्यान द्विपक्षीय बैठक देखील पार पडली.
केंद्रीय दूरसंचार सचिवांनी, डिजिटल नवोन्मेष मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने जिनिव्हा येथील आयटीयुच्या मुख्यालयात बहारीनचे वाहतूक तसेच दूरसंचार मंत्री मोहम्मद बिन थामीर यांच्या सोबत भारत बहारीन द्विपक्षीय बैठकीत सहअध्यक्ष म्हणून भाग घेतला. दोन्ही नेत्यांनी या बैठकीत आयसीटी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धीमत्ता, 5 जी वापराशी संबंधित प्रकरणे, सायबर सुरक्षा तसेच डाटा दूतावासासारख्या मुद्द्यांवर सक्रियपणे सहयोगी संबंध स्थापन करण्याचा निर्णय घेतला. वर्ष 2015 मध्ये खंडित झालेला दोन्ही देशांदरम्यानचा आयसीटीसंबंधी सामंजस्य करार पुनरुज्जीवित करण्यास दोन्ही नेत्यांनी संमती दर्शवली.
कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणालींचे न्याय्य मूल्यांकन आणि मानांकन, नियामकीय सँडबॉक्स वरील स्थितीची सूचना याबाबतचे टीईसी मापदंड बहारीन सोबत सामायिक करण्याचा प्रस्ताव भारताने या बैठकीत मांडला.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2016012)
Visitor Counter : 143