नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
अर्थव्यवस्थेतील हायड्रोजन आणि इंधन सेल संबंधी आंतरराष्ट्रीय भागीदारी (आयपीएचई) वरील सुकाणू समितीच्या 41 व्या बैठकीचे नवी दिल्ली येथे आयोजन
Posted On:
19 MAR 2024 3:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 19 मार्च 2024
अर्थव्यवस्थेतील हायड्रोजन आणि इंधन सेल विषयक आंतरराष्ट्रीय भागीदारी (आयपीएचई) वरील सुकाणू समितीची 41 वी बैठक नवी दिल्ली येथे 18 ते 22 मार्च 2024 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
या पाच दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी, 18 मार्च 2024 रोजी आयआयटी दिल्ली येथे आयोजित सत्रात आयपीएचई च्या शैक्षणिक उपक्रमाचा एक भाग म्हणून, परिषदेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी हायड्रोजन आणि इंधन सेल तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल मोलाची माहिती दिली.
उद्घाटन सत्राला संबोधित करताना केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय सूद यांनी निदर्शनास आणून दिले की हायड्रोजन तंत्रज्ञान हे फारसे नवीन नसले तरी, ते अधिक किफायतशीर आणि पर्यावरण पूरक बनवण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. या क्षेत्रातील कौशल्य विकास, तसेच संशोधन आणि विकासाचे महत्व अधोरेखित करत ते म्हणाले की, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाव्यतिरिक्त, भारत सरकारची इतर विविध मंत्रालये देखील हरित हायड्रोजनचा अवलंब करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हायड्रोजन मूल्य साखळीतील ज्या पाच क्षेत्रांमध्ये काम करण्याची गरज आहे, त्यामध्ये उत्पादन, साठवण, वाहतूक, वितरण आणि उपभोग या पाच घटकांचा समावेश असल्याचे प्रा. अजय सूद यांनी अधोरेखित केले.
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुदीप जैन यांनी ऊर्जा संक्रमण आणि हायड्रोजन क्षेत्राचा विकास सुकर करण्यासाठी अभ्यासक आणि संशोधन संस्थांचे काम, सहयोग आणि भागीदारी आवश्यक असल्याचे नमूद केले.
आयपीएचईचे उपाध्यक्ष नोए वान हल्स्ट यांनी पर्यावरण पूरक हायड्रोजनचे भविष्य घडवण्यासाठी कौशल्ये, शैक्षणिक पोहोच आणि संशोधन आणि नवोन्मेष गरजेचा असून यामध्ये अभ्यासकांची भूमिका महत्वाची असल्याचे अधोरेखित केले.
आयआयटी दिल्लीचे डीन (आर अँड डी), प्रा. नरेश भटनागर यांनी गेल्या दोन दशकांपासून हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांचे संशोधन आणि विकास यामधील आयआयटी दिल्लीच्या सहभागाबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमात पोस्टर सादरीकरण आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा यासह विविध कार्यक्रमांचा समावेश होता, ज्याचा समारोप प्रत्येक स्पर्धेतील तीन विजेत्यांची घोषणा आणि बक्षीस वितरण याद्वारे झाला.
आयपीएचई च्या शैक्षणिक उपक्रमात पॅनेल चर्चा सत्रे देखील आयोजित करण्यात आल्या होते. पहिले सत्र “कौशल्य सक्षमीकरण: स्वच्छ/हरित हायड्रोजन क्षेत्रात कौशल्य विकासाचे संगोपन” या विषयावर होते. यामध्ये स्वच्छ/हरित हायड्रोजन क्षेत्राच्या विकासाकरता आवश्यक ज्ञान आणि कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात आला.
दुसरे पॅनल चर्चा सत्र, “भविष्याचा शोध: स्वच्छ/हरित हायड्रोजन तंत्रज्ञान आणि त्याचा परिवर्तनशील प्रयोग,” या विषयावर होते. यामध्ये स्वच्छ/हरित हायड्रोजन संशोधन आणि नवोन्मेषाच्या मर्यादांचा आढावा घेण्यात आला. तंत्रज्ञानातील सुधारणा, संशोधन आणि विकासाद्वारे कार्यक्षम उत्पादन/उपयोग करून आणि नियामक चौकटी द्वारे मागणी वाढवून या खर्चात कपात करण्याची गरज असल्याचा विचार पॅनेल सदस्यांनी मांडला.
S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015521)
Visitor Counter : 117