कायदा आणि न्याय मंत्रालय
भारत आणि सिंगापूर यांच्यात कायदा आणि विवाद निराकरण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासंबंधी सामंजस्य करार
Posted On:
14 MAR 2024 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मार्च 2024
भारत आणि सिंगापूर यांनी आज कायदा आणि विवाद निराकरणाच्या क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारावर भारताकडून कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल यांनी तर सिंगापूरकडून सिंगापूर सरकार मधील सांस्कृतिक, समुदाय आणि युवा मंत्री आणि द्वितीय कायदा मंत्री एडविन टोंग यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत स्वाक्षरी केली. हा सामंजस्य करार दोन्ही देशांमधील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विवाद निराकरणासारख्या सामायिक हिताच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढवण्यासंदर्भात करण्यात आला असून यामध्ये संबंधित देशांमध्ये मजबूत पर्यायी विवाद निवारण यंत्रणेला प्रोत्साहन देणे आणि सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी संयुक्त सल्लागार समितीची स्थापना करणे यासंबंधी बाबींचा समावेश आहे.
कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आपल्या भाषणात सामंजस्य कराराचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “या सामंजस्य करारावर स्वाक्षरी होणे म्हणजे उत्कृष्ट कार्यपद्धती, कौशल्याची देवाणघेवाण आणि हितधारकांसाठी क्षमता निर्माण उपक्रम सुलभ करणे आदी बाबींवर लक्ष केंद्रित करून कायदा आणि विवाद निराकरणाच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्याची आपली सामूहिक वचनबद्धता स्पष्ट करते. या भागीदारीच्या माध्यमातून आपण आपल्या कायदेशीर व्यवस्थांमधील समन्वय साधण्याचे, परस्पर देशांमध्ये असलेल्या सामर्थ्यांचा लाभ घेण्याचे आणि आपल्या नागरिकांच्या आणि व्यवसायांच्या नवनवीन गरजा पूर्ण करण्यासाठी अभिनव दृष्टिकोनाचा शोध घेण्याचे ध्येय ठेवले आहे.”
सिंगापूर सरकारमधील सांस्कृतिक, समुदाय आणि युवा कल्याण मंत्री आणि द्वितीय कायदा मंत्री एडविन टोंग यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि सांगितले की, “सिंगापूरचे भारतासोबत खूप चांगले, व्यापक आणि बहुआयामी संबंध आहेत. आपले मजबूत आर्थिक आणि व्यावसायिक संबंध लक्षात घेता, कायदा आणि विवाद निराकरण क्षेत्रात परस्पर सहकार्य सतत वृद्धिंगत करणे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. आपण परस्पर अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि भारतासोबतचे आपले संबंध दृढ करण्यासाठी उत्सुक आहोत.”
* * *
S.Kane/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2014723)