अर्थ मंत्रालय

भारतातील फिनटेक परिसंस्था बळकट करण्यासाठी भारत सरकार आणि एडीबी दरम्यान 23 दशलक्ष डॉलर्स कर्जाचा करार

Posted On: 14 MAR 2024 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 मार्च 2024

 

गिफ्ट सिटी म्हणजेच गुजरात आंतरराष्ट्रीय आर्थिक तंत्रज्ञान शहर येथे फिनटेक म्हणजेच आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञान विषयक शिक्षण, संशोधन तसेच नवोन्मेष यांची उपलब्धता वाढवण्यासाठी भारत सरकार आणि आशियाई विकास बँक (एडीबी) दरम्यान आज 23 दशलक्ष डॉलर्सचा कर्ज करार करण्यात आला.

गिफ्ट सिटी प्रकल्पामध्ये फिनटेक संस्थेचा विकास करून त्या माध्यमातून संशोधन तसेच नवोन्मेष यांना चालना देण्यासंदर्भातील या करारावर भारत सरकारतर्फे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या सहसचिव जुही मुखर्जी यांनी स्वाक्षऱ्या केल्या तर एडीबीचे भारतातील निवासी अभियान अधिकारी राजेश वासुदेवन यांनी एडीबीतर्फे स्वाक्षऱ्या केल्या.

गिफ्ट सिटी हा भारत सरकार आणि गुजरात राज्य सरकार यांचा संयुक्त उपक्रम असून देशातील आर्थिक सेवा तसेच फिनटेक परिसंस्था बळकट  करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

सदर करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर जुही मुखर्जी म्हणाल्या की या प्रकल्पाद्वारे फिनटेक विषयक शिक्षणाला बळकटी आणणे, स्टार्ट अप उद्योगांना यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि फिनटेक संदर्भातील संशोधन तसेच नवोन्मेषाला चालना देणे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय फिनटेक संस्थेची (आयएफआय)ची स्थापना करण्यात येईल.  

वाढीव रोजगार संधी, कार्यबळातील स्पर्धात्मकता तसेच नव्या आणि हरित तंत्रज्ञानांतील उत्पादकता यामध्ये ते योगदान देतील.

एडीबी कार्यक्रम हवामान संदर्भातील फिनटेक, नियामक तंत्रज्ञान, सामाजिक समावेशकता तसेच आर्थिक क्षेत्रातील लैंगिक समानता या विषयांमध्ये अभिनव उपाययोजना आणि तंत्रज्ञान यांतील संशोधनाला पाठबळ पुरवेल. हा प्रकल्प राज्य फिनटेक सुसज्जता निर्देशांक प्रस्थापित करण्यासाठी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांसाठी नवे उपाय विकसित करण्यासाठी मदत करेल.

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2014707) Visitor Counter : 49


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil