आयुष मंत्रालय

योग महोत्सव 2024: महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करून आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाच्या 100 दिवसांच्या उलटमोजणीला सुरुवात


"महिला सक्षमीकरणासाठी योग" या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम साजरा

योगाभ्यास हा महिलांना सशक्त बनवण्यासाठी, त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी एक व्यापक साधन : वैद्य राजेश कोटेचा

Posted On: 13 MAR 2024 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मार्च 2024

 

विज्ञान भवनात आज योग महोत्सव-2024, आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाच्या 100 दिवसांच्या उलटमोजणीला सुरुवात करण्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाची संकल्पना "महिला सक्षमीकरणासाठी योग" यासह साजरा करण्यात आला. दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. यावर्षी 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार आहे.

महिलांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करून आणि जागतिक आरोग्य आणि शांतता यांना प्रोत्साहन देऊन योगाभ्यासाला एक व्यापक चळवळ म्हणून चालना देणे हा योग महोत्सव 2024 चा उद्देश आहे, असे आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा यांनी यावेळी सांगितले. महिलांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या पीसीओएस/पीसीओडी, ताण व्यवस्थापन यासारख्या गोष्टींसह विविध परिस्थितींवरील अभ्यासांना मंत्रालयाने सक्रियपणे पाठिंबा दिला आहे आणि स्त्रियांच्या आरोग्यावरील पुराव्या-आधारित संशोधनाद्वारे महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले आहे, असे त्यांनी सांगितले. योगाभ्यास हा महिलांना सशक्त बनवण्यासाठी, त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी एक व्यापक साधन आहे. सर्वसमावेशकता, विविधता आणि सक्षमीकरणाला चालना देत महिला म्हणून नेत्या, शिक्षक आणि बदलाच्या समर्थक म्हणून भूमिका पार पाडतात, असे कोटेचा यांनी यावेळी सांगितले.

‘मनाची समतोल स्थिती म्हणजे योग’. असे द योग इन्स्टिट्यूट, मुंबईच्या संचालिका हंसाजी जयदेव यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान चांगल्या कृतींतुन निर्माण होणाऱ्या चिरस्थायी मूल्यावरही भर दिला. हे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे जे आपल्याला कायम शाश्वत ठेवेल, असे त्यांनी सांगितले. इतरांच्या कृतीमुळे स्वतःला त्रास होऊ न देता लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारण्याचे आणि त्यांना समजून घेत आनंद मिळवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. योग हे मूलत: जागरूकतेचे शास्त्र आहे, जे व्यक्तींना त्यांचे शरीर, मन आणि पर्यावरणाविषयी सखोल जागरूकता विकसित करण्यास सक्षम करते, यावरही हंसाजी जयदेव यांनी  भर दिला.

मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे गाठलेल्या अलीकडील महत्वाच्या टप्प्याचे प्रदर्शन हे उद्घाटन कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. यात आयुष योग पोर्टल, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे  संकेतस्थळ, नमस्ते योग आणि वाय-ब्रेक ॲप या अद्ययावत   केलेल्या माहिती तंत्रज्ञान उपक्रमांचा समावेश होता. हे अद्ययावत केलेले  माहिती तंत्रज्ञान उपक्रम सार्वजनिकरित्या केवळ  एका क्लिकवर द्विभाषिक पद्धतीने  सामान्य माणसाला सहज उपलब्ध आहेत.

हे ॲप्स ताज्या आशयासाठी नियमित अद्यतने, दोष निराकरणे आणि सर्व उपकरणांमध्ये सुधारित सुसंगतता, उत्तम कार्यप्रदर्शन आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासह वैयक्तिक योग दिनचर्या, प्रगतीचा मागोवा आणि ध्यान सत्रे उपलब्ध करून देतात.

या योग महोत्सव-2024 च्या एकदिवसीय कार्यक्रमात उद्घाटन सत्रानंतर संकल्पनेवर आधारित तांत्रिक सत्रांसह (योगाभ्यासाद्वारे महिलांचे आरोग्य सक्षम करणे, योगाभ्यासाद्वारे जीवन बदलणे) विविध उपक्रमांचा समावेश होता. कार्यक्रमाचा समारोप परिसंवाद (योग आणि महिला सक्षमीकरण: विविध पैलू), वाय-ब्रेक आणि योग प्रात्यक्षिकांनी झाला.

अग्रगण्य योग संस्था, योग गुरु आणि इतर आयुष संबंधितांचे पाठबळ मिळवून योगाभ्यासाची पोहोच अधिकाधिक व्यापक करणे हा 100 दिवसांच्या उलटमोजणीचा उद्देश आहे.

 

* * *

S.Tupe/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2014119) Visitor Counter : 157