पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 13 मार्च रोजी ‘भारताचे तंत्रज्ञान युग: चिप्स फॉर विकसित भारत’ मध्ये सहभागी होऊन सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या तीन सेमीकंडक्टर सुविधांची पायाभरणी करणार


या प्रसंगी पंतप्रधान देशभरातील तरुणांना संबोधित करणार

या तीन सुविधांच्या स्थापनेमुळे सेमीकंडक्टर परिसंस्था बळकट होऊन तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील

Posted On: 12 MAR 2024 7:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2024 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 मार्च 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘भारताचे तंत्रज्ञान युग: चिप्स फॉर विकसित भारत’ मध्ये सहभागी होतील आणि सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी करतील. यावेळी पंतप्रधान देशभरातील तरुणांना संबोधित करणार आहेत.

देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून सेमीकंडक्टर संरचना, उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासासाठी भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थान देण्याचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन आहे. या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, गुजरातमधील धोलेरा विशेष गुंतवणूक प्रदेशात (डीएसआयआर) सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधेसाठी; आसाममधील मोरीगाव येथे बाह्यस्त्रोत सेमीकंडक्टर जोडणी आणि चाचणी (ओएसएटी) सुविधेसाठी; आणि गुजरातमधील साणंद येथे बाह्यस्त्रोत सेमीकंडक्टर जोडणी आणि चाचणी (ओएसएटी) सुविधेसाठी पायाभरणी करण्यात येईल.

भारतात सेमीकंडक्टर फॅब्सच्या स्थापनेसाठी सुधारित योजनेअंतर्गत टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (टीईपीएल) द्वारे धोलेरा विशेष गुंतवणूक प्रदेशात (डीएसआयआर) सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा स्थापित केली जाईल. एकूण 91,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीसह हे देशातील पहिले व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब असेल.

टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (टीईपीएल) द्वारे सेमीकंडक्टर जोडणी, चाचणी, अंकन आणि वेष्टनासाठी (एटीएमपी) सुधारित योजनेअंतर्गत आसाममधील मोरीगाव येथे बाह्यस्त्रोत सेमीकंडक्टर जोडणी आणि चाचणी (ओएसएटी) सुविधा एकूण सुमारे 27,000 कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणुकीतून सुरू केली जाईल.

सेमीकंडक्टर जोडणी, चाचणी, अंकन आणि वेष्टनासाठी (एटीएमपी) सुधारित योजनेअंतर्गत सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडद्वारे साणंदमध्ये बाह्यस्रोत सेमीकंडक्टर जोडणी आणि चाचणी (ओएसएटी) सुविधा एकूण सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणुकीतून सुरू केली जाईल.

या सुविधांद्वारे सेमीकंडक्टर परिसंस्था बळकट होईल आणि भारतामध्ये त्याला एक मजबूत पाया मिळेल. या युनिट्समुळे सेमीकंडक्टर उद्योगात हजारो तरुणांना रोजगार मिळेल तसेच इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम इत्यादी संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती उत्प्रेरित होईल.

या कार्यक्रमात सेमीकंडक्टर उद्योगातील अग्रणी उद्योजकांसह हजारो महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असेल.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2013911) Visitor Counter : 69