कोळसा मंत्रालय
गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत कोळसा क्षेत्राने लक्षणीय प्रमाणात रोजगार संधी निर्माण केल्या आहेत
Posted On:
11 MAR 2024 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2024
भारताचे कोळसा क्षेत्र देशाच्या ऊर्जाविषयक गरजा भागवण्यात महत्त्वाची भूमिका निभावत असून त्यासोबतच लक्षणीय प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना देण्याचे कार्य करत आहे. दिनांक 6 मार्च 2024 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार देशातील कोळसा उत्पादनाने 900 दशलक्ष टनांची उल्लेखनीय पातळी गाठली असून विद्यमान आर्थिक वर्षात हे क्षेत्र 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोळसा उत्पादनात दिसून आलेली ही उसळी देशातील अत्यावश्यक पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान देण्यासोबतच विशेष करून देशातील कोळसा-समृद्ध प्रदेशांमध्ये लक्षणीय प्रमाणात रोजगार संधींची देखील निर्मिती करत आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कोळसा उत्पादन विषयक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयुज) विशेषतः कोल इंडिया (उपकंपन्यांसह) आणि एनएलसी इंडिया ही कंपनी यांच्यात 128,236 कंत्राटी कामगारांसह एकूण 369,053 व्यक्ती काम करतात. तसेच हे क्षेत्र अंदाजे 3.1 लाख निवृत्तीवेतनधारकांना मदत करून रोजगार तसेच समाज कल्याणावरील महत्त्वपूर्ण प्रभाव अधोरेखित करते.
गेल्या काही काळात, कोल इंडिया आणि तिच्या उपकंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भर्ती अभियान राबवले असून त्याद्वारे 2014 पासून फेब्रुवारी 2024 पर्यंत या कंपन्यांच्या मनुष्यबळात 59,681 कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. त्याच प्रमाणे एनएलसी इंडिया या कंपनीने याच कालावधीत 4,265 नव्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करून रोजगार संधींमध्ये वाढ करण्याप्रती योगदानाचे दर्शन घडवले आहे.
चालू आर्थिक वर्षात भर्तीविषयक प्रयत्नांमध्ये आणखी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यावर्षी कोल इंडिया आणि तिच्या उपकंपन्यांनी मोहीम तत्वावरील भर्ती प्रक्रियेतून 5,711 व्यक्तींची नेमणूक केली आहे. त्याचप्रमाणे, एनएलसी इंडिया या कंपनीने याच कालावधीत 661 नव्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन रोजगारविषयक गरजांची पूर्तता करण्याच्या दिशेने सक्रीय दृष्टिकोनाचे दर्शन घडवले आहे.
वाढत्या मागणीमुळे कोळसा उत्खनन कार्यांतील वाढलेल्या वेगामुळे, येत्या वर्षी रोजगार संधींच्या वाढीला आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्ष रोजगार संधींची तरतूद करण्यासोबतच उत्खनन कार्यातून लक्षणीय प्रमाणात अप्रत्यक्ष रोजगार संधी देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होतात आणि त्या देशभरातील सामाजिक आर्थिक विकासामध्ये योगदान देतात.कोळसा क्षेत्राचा विस्तार यापुढेही सुरु राहणार असून हे क्षेत्र समावेशक विकासाची जोपासना करण्याप्रती आणि शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याप्रती वचनबद्ध आहे.
* * *
NM/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2013463)
Visitor Counter : 86