संरक्षण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सेला बोगद्याचे केले लोकार्पण
बोगदा तवांगला सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि लोकांसाठी प्रवास सुखकर करेल: पंतप्रधान
सीमा रस्ते संघटनेने 13,000 फूट उंचीवर बांधलेला हा बोगदा संरक्षण दलांची सज्जता वाढवेल तसेच सीमावर्ती भागाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देईल
Posted On:
09 MAR 2024 1:21PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मार्च 2024 रोजी अरुणाचल प्रदेश मधील इटानगर येथे विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश कार्यक्रमादरम्यान दूरदृश्य प्रणालीद्वारे सेला बोगद्याचे लोकार्पण केले. हा बोगदा सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ ) अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील तवांगला आसामच्या तेजपूरशी जोडणाऱ्या रस्त्यावर 13,000 फूट उंचीवर बांधला आहे. एकूण 825 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा बोगदा बलीपारा - चरिदुआर - तवांग रोडवरील सेला खिंड ओलांडून तवांगला सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, सशस्त्र दलांची सज्जता वाढवेल आणि सीमावर्ती भागाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देईल.
आपल्या भाषणात, पंतप्रधानांनी ईशान्य क्षेत्राच्या विकासाप्रति सरकारची अतूट वचनबद्धता व्यक्त केली . ते म्हणाले की सेला बोगदा सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि तवांगच्या लोकांसाठी प्रवास सुखकर करेल. ईशान्य प्रदेशात अनेक बोगद्यांचे काम सुरू आहे असे ते म्हणाले.
सीमावर्ती गावांच्या विकासाकडे यापूर्वी दुर्लक्ष झाल्याची टीका पंतप्रधानांनी केली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्हे तर देशाच्या गरजेनुसार काम करण्याची आपली शैली आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. आपल्या पुढील कार्यकाळात अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना असलेल्या या ठिकाणी भेटायला येऊ असे त्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांना वचन दिले.
उद्घाटन समारंभाला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते.
सेला बोगदा नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती वापरून बांधण्यात आला आहे आणि त्यात सर्वोच्च मानकांची सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. हा प्रकल्प या प्रदेशात केवळ जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक मार्ग प्रदान करणार नाही तर देशासाठी सामरिकदृष्ट्या देखील तो महत्त्वाचा आहे.
बोगद्याची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते 9 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आली आणि 1 एप्रिल 2019 रोजी बांधकामाला सुरुवात झाली. कठीण भूप्रदेश आणि प्रतिकूल हवामानासारख्या आव्हानांवर मात करून हा बोगदा अवघ्या पाच वर्षांत बांधून पूर्ण झाला आहे. सीमावर्ती भागाच्या विकासात बीआरओ नेहमीच आघाडीवर राहिले आहे. गेल्या तीन वर्षांत, बीआरओ ने 8,737 कोटी रुपये खर्चून विक्रमी 330 पायाभूत सुविधा प्रकल्प बांधून पूर्ण केले आहेत..
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2012999)
Visitor Counter : 158