पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रिपब्लिक शिखर परिषद 2024’ ला केले संबोधित


"विकसित भारताची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हे दशक महत्त्वाचे"

"भारताची स्वप्ने भारताच्या सामर्थ्यातून साकार करण्याचे हे दशक”

"हे दशक भारताच्या जलद गतीची संपर्क सुविधा, गतिशीलता आणि समृद्धीचे दशक"

"भारत एका मजबूत लोकशाहीच्या रुपात विश्वासाचा किरण बनलेला आहे"

“चांगले राजकारण चांगल्या अर्थकारणाच्या आधारावरच होऊ शकते हे भारताने सिद्ध केले आहे”

“माझे संपूर्ण लक्ष देशाच्या विकासाचा वेग आणि प्रमाण वाढवण्यावर आहे”

"गेल्या 10 वर्षात लोकांनी घोषणा नव्हे तर उपाय पाहिले"

"पुढील दशकात भारत ज्या उंचीवर गाठेल ती अभूतपूर्व, अकल्पनीय असेल"

Posted On: 07 MAR 2024 10:05PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे रिपब्लिक शिखर परिषद 2024 ला संबोधित केले. या शिखर परिषदेची संकल्पना भारत : आगामी दशकअशी होती.

हे दशक भारताचे असल्याचे पंतप्रधानांनी या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. तसेच, हे विधान राजकीय नव्हते याला आज जगाने देखील  दुजोरा दिला आहे, यांची आठवण करून दिली. हे भारताचे दशक आहे हा जगाचा विश्वास आहे”, असे सांगत पंतप्रधानांनी परिषदेच्या संकल्पनेनुसार आगामी दशकातील भारतयावर चर्चा घडवून आणल्याबद्दल रिपब्लिक चमूच्या दृष्टीकोनाचे कौतुक केले. सध्याचे दशक हे विकसित भारताचे संकल्प पूर्ण करण्याचे एक माध्यम बनेल, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

स्वतंत्र भारतासाठी सध्याच्या दशकाच्या महत्त्वावर भर देताना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या त्यांच्या विधानाचे स्मरण केले आणि ते म्हणाले, “यही समय है, सही समय है.हे दशक सक्षम आणि विकसित भारताचा पाया मजबूत करण्याचा आणि एकेकाळी अशक्य मानल्या गेलेल्या लोकांच्या इच्छा पूर्ण करण्याचा काळ आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  देशाच्या क्षमतेद्वारे भारताची स्वप्ने पूर्ण करण्याचे हे दशक आहे”, यावर त्यांनी भर दिला.  पुढील दशक सुरू होण्यापूर्वी लोक, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या घटनेचे साक्षीदार बनतील. आणि, या काळात पक्की घरे, शौचालय, गॅस, वीज, पाणी, इंटरनेट इत्यादी मूलभूत गरजा प्रत्येकासाठी उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी नमूद केले.  सध्याचे दशक द्रुतगती मार्ग, हाय स्पीड ट्रेन्स आणि देशांतर्गत जलमार्गाच्या जाळ्याशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासाचे असेल. याच काळात भारताला पहिली बुलेट ट्रेन मिळेल, पूर्णपणे कार्यरत समर्पित फ्रेट कॉरिडॉर मिळेल आणि भारतातील मोठी शहरे नमो किंवा मेट्रो रेल्वेद्वारे जोडली जातील,” असे पंतप्रधान म्हणाले. "हे दशक भारतात जलद गतीची संपर्क सुविधा, गतिशीलता आणि समृद्धीसाठी समर्पित असेल", असेही त्यांनी सांगितले.

सध्याच्या काळातील जागतिक अनिश्चितता आणि अस्थिरता याविषयी बोलताना पंतप्रधानांनी तज्ञांच्या मताचा संदर्भ दिला आणि सध्याचा क्षण तीव्रतेमध्ये आणि विस्तारामध्ये सर्वात अस्थिर असून जगभरातील सरकारांना विरोधाच्या मोठ्या लाटांचा सामना करावा लागत आहे, असे सांगितले.  "या सगळ्यात भारत एक मजबूत लोकशाही म्हणून विश्वासाच्या किरणांसारखा आहे", असे पंतप्रधान म्हणाले. चांगल्या अर्थकारणाच्या आधारावरच चांगले राजकारण करता येते हे भारताने सिद्ध केले आहे.असे पंतप्रधानांनी सांगितले.

भारताच्या कामगिरीबद्दल जागतिक उत्सुकता लक्षात घेऊन पंतप्रधान म्हणाले, "आम्ही देशातील लोकांच्या गरजा आणि राष्ट्राची स्वप्ने पूर्ण केल्यामुळे हे घडू शकले, सक्षमीकरणावर काम करताना आम्ही समृद्धीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे हे घडले."  वैयक्तिक प्राप्ती कर कमी करत असतानाच कॉर्पोरेट कर कमी करण्याचे उदाहरण पंतप्रधानांनी याप्रसंगी दिले.  शिवाय, आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी गुंतवणूक करून मोफत वैद्यकीय उपचार आणि मोफत अन्नधान्य वाटप यासह कोट्यावधी पक्की घरे बांधली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. जर उद्योगांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजना असतील तर शेतकऱ्यांसाठी देखील विमा आणि उत्पन्नाचे साधन बनणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले. तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील गुंतवणुकीसोबत तरुणांच्या कौशल्य विकासावर भर दिला जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

अनेक दशके सुरु असलेल्या घराणेशाहीच्या राजकारणामुळे भारताच्या विकासासाठीचा महत्वाचा वेळ गमावल्याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी गमावलेला वेळ पुनर्प्राप्त करण्यासाठी अभूतपूर्व प्रमाणात आणि वेगाने काम करण्यावर भर दिला.  आज भारतातील सर्व क्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला तसेच देशाच्या विकासाचा वेग आणि प्रमाण वाढवण्यावर आपले लक्ष केंद्रित असल्याचे सांगितले. गेल्या 75 दिवसात देशात घडलेल्या घडामोडींचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सुमारे 9 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्याचा उल्लेख केला, या सर्व प्रकल्पांची किंमत सुमारे 110 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.  आधुनिक पायाभूत सुविधांसाठी गेल्या 75 दिवसांत केलेली गुंतवणूक ही जगातील अनेक देशांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा जास्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

गेल्या 75 दिवसांत या भागात 7 नवे एआयआयएमएस, 3 आयआयएम्स, 10 आयआयटीज, 5 एनआयटीज,3 ट्रिपल आयटीज, 2 आयसीआर आणि 10 केंद्रीय संस्था, 4 वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालये तसेच 6 राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळा यांचे उद्घाटन किंवा पायाभरणी झाली आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. अवकाश संशोधन क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठीच्या 1800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले असून याच 75 दिवसात 54 ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे किंवा त्यांची पायाभरणी झाली आहे तसेच काक्रापार अणु उर्जा प्रकल्पातील 2 नव्या अणुभट्ट्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे असे ते म्हणाले. कल्पक्कम येथील स्वदेशी फास्ट ब्रीडर अणुभट्टीचे कोअरलोडिंग सुरु झाले असून तेलंगणा येथील 1600 मेगावॉट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प, झारखंड मधील 1300 मेगावॉट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प यांचे उद्घाटन झाले आहे तर उत्तर प्रदेशात 1600 मेगावॉट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प, 300 मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आणि महा नवीकरणीय पार्क, हिमाचल मधील जलविद्युतनिर्मिती प्रकल्प यांचा कोनशीला समारंभ झाला आहे. तामिळनाडू येथे देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन सेल व्हेसलची सुरुवात करण्यात आली असून उत्तर प्रदेशात मेरठ-सिंभावली पारेषण वाहिन्या तसेच कर्नाटकात कोप्पळ येथे पवन उर्जा विभागापासून निघणाऱ्या पारेषण वाहिन्या यांचे उद्घाटन करण्यात आले आहे अशी माहिती पंतप्रधानांनी सर्वांना दिली.

ते पुढे म्हणाले की, गेल्या 75 दिवसांत, भारतातील सर्वाधिक लांबीच्या केबल आधारित पुलाचे उद्घाटन झाले, लक्षद्वीपपर्यंत समुद्राखालून टाकण्यात येणाऱ्या ऑप्टिकल केबलच्या कामाचे उद्घाटन झाले, देशातील 500 हून अधिक रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु झाले, 33 नव्या रेल्वे गाड्यांच्या सेवेची सुरुवात झाली, देशातील 4 शहरांमध्ये मेट्रोसेवेशी संबंधित 7 प्रकल्पांचे उद्घाटन झाले आणि कोलकाता शहरामध्ये देशातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो सेवेची सुरुवात झाली. सुमारे 10,000 कोटी रुपये खर्चाच्या 30 बंदर विकास प्रकल्पांची पायाभरणी झाली असून शेतकऱ्यांसाठीच्या जगातील सर्वात मोठ्या साठवण सुविधा योजनेची सुरुवात, 18,000 सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाचे काम पूर्ण आणि देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 21,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे हस्तांतरण या कार्यांचा देखील त्यांनी उल्लेख केला.

प्रशासनाच्या कार्याचा वेग समजावून सांगताना पंतप्रधान मोदी यांनी अशी माहिती दिली की, अर्थसंकल्पात पंतप्रधान सूर्यघर योजनेची घोषणा झाल्यापासून केवळ 4 आठवड्यांच्या आतच या योजनेला मंजुरी मिळून तिची सुरुवात देखील झाली. नागरिक त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी विकासकार्यांचे प्रमाण आणि वेग पाहत आहेत असे ते म्हणाले.

येत्या 25 वर्षांतील आराखड्याबाबत देखील पंतप्रधानांनी चर्चा केली. ते म्हणाले की देशात निवडणुकीचे वारे वाहत असताना देखील प्रत्येक सेकंदाला विकास कामे सुरु आहेत. गेल्या 10 वर्षांत लोकांनी घोषणांच्या ऐवजी उपाययोजना साकारताना पाहिल्या आहेत,” त्यांनी सांगितले.अन्न सुरक्षा, खत उत्पादन प्रकल्पांना संजीवनी, विद्युतीकरण आणि देशाच्या सीमांवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण यांसारखे उपक्रम, नागरिकांना पक्की घरे मिळण्याच्या सुनिश्चितीपासून कलम 370 रद्द करणे अशा प्राधान्यक्रमांच्या सर्व विषयांबाबत सरकार एकाच वेळी कार्यरत आहे अशी माहिती त्यांनी दिली.

गेल्या 10 वर्षांमध्ये, सरकारला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या स्वरुपामध्ये झालेल्या बदलाची पंतप्रधानांनी नोंद घेतली. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत विचारले जाणारे निराशावादी प्रश्न थांबून आता जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासंदर्भात आशा आणि उत्सुकता असलेले प्रश्न विचारले जात आहेत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची वाट पाहण्याच्या स्थितीपासून डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत आघाडी घेण्यापर्यंत या प्रश्नांचे स्वरूप बदलले आहे असे त्यांनी सांगितले. बेरोजगारीबाबत विचारले जाणारे प्रश्न आता राहिले नसून स्टार्ट अप उद्योगांसंदर्भात चौकशी होते आहे, प्रचंड महागाई असलेल्या दिवसांतील प्रश्नांकडून आपण जगभरातील अस्थिर परिस्थितीला अपवाद ठरण्याबाबत आणि वेगवान विकासाबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देण्याच्या स्थितीकडे आलो आहोत असे ते म्हणाले. हताश परिस्थितीबाबत विचारले जाणारे प्रश्न आता राहिले नसून आता घोटाळे, सुधारणा, कलम 370 आणि जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेतील प्रगती याबाबत विचारणा होत आहे असे देखील त्यांनी पुढे नमूद केले. आज सकाळी श्रीनगरला दिलेल्या भेटीबद्दल बोलताना पंतप्रधानांनी उपस्थितांना जम्मू आणि काश्मीरमधील बदललेल्या मनस्थितीची माहिती दिली.

उत्तरदायित्वाच्या स्वरुपात मुख्य प्रवाहातून मागे पडलेल्यांवर सरकारने अधिक लक्ष केंद्रित केले आहे, त्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी अधिक माहिती दिली. आकांक्षित जिल्ह्यांचे उदाहरण देऊन ते म्हणाले की अशा जिल्ह्यांतील दुर्दैवाच्या भरवशावर सोडून दिलेल्या लोकांचा दृष्टीकोन आणि नशीब केंद्र सरकारने बदलून टाकले. देशाच्या सीमेवरील गावे आणि दिव्यांग व्यक्ती यांच्या बाबतीत असाच दृष्टीकोन स्वीकारल्यामुळे त्यांच्यात परिवर्तन घडून आले आहे.सांकेतिक भाषेच्या प्रमाणीकरणाबाबत माहिती देऊन पंतप्रधान मोदी म्हणाले की, संवेदनशील सरकार खोलवर रुजलेला दृष्टिकोन आणि विचारसरणीसह काम करत असते. यावेळी, दुर्लक्षित आणि वंचित समुदायांवर यापुढेही लक्ष केंद्रित करणे सुरु ठेवून सरकारने  भटके आणि विमुक्त-भटके समुदाय, रस्त्यांवरील वस्तू विक्रेते तसेच विश्वकर्मा यांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचा पंतप्रधान मोदी यांनी उल्लेख केला. 

सफलतेच्या प्रवासात परिश्रम, दूरदृष्टी आणि निर्धार यांची भूमिका लक्षात घेत पंतप्रधान म्हणाले, “भारत देखील या प्रवासात जलदगतीने पुढे जात आहे. आगामी दशकात ज्या उंचीवर भारत पोहोचेल ती अभूतपूर्व आणि कल्पनातीत असेल. ही देखील मोदींची गॅरंटी आहे,” एवढे बोलून पंतप्रधानांनी त्यांचे भाषण संपवले.

***

NM/S.Tupe/S.Mukhedkar/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2012794) Visitor Counter : 70