राष्ट्रपती कार्यालय
बेरहामपूर विद्यापीठाच्या 25व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
01 MAR 2024 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मार्च 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (1 मार्च, 2024) ओदिशात गंजाम मधील भांजा बिहार येथील बेरहामपूर विद्यापीठाच्या 25 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, ओदिशाच्या दक्षिणेकडील प्रदेशाला केवळ ओदिशाच्याच नव्हे, तर भारताच्या इतिहासातही खूप महत्त्वाचे स्थान आहे. ही भूमी शिक्षण, साहित्य, कला आणि हस्तकलेमध्ये समृद्ध आहे. कबी सम्राट उपेंद्र भांजा आणि कबीसूर्य बलदेव रथ या इथल्या सुपुत्रांनी आपल्या लेखनातून ओडिया तसेच भारतीय साहित्य समृद्ध केले आहे. ही भूमी अनेक स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मा आणि लोकसेवक यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे.
1967 मध्ये स्थापन झालेले बेरहामपूर विद्यापीठ हे ओदिशाच्या दक्षिण भागातील सर्वात जुने विद्यापीठ आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. आदिवासीबहुल भाग असलेल्या या प्रदेशाच्या शिक्षण आणि विकासातील बरहामपूर विद्यापीठाच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.
राष्ट्रपतींनी नमूद केले की बेरहामपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभाग आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे 45000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये 55 टक्क्यांहून अधिक विद्यार्थिनी आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. इतकेच नाही तर सुवर्णपदक विजेत्यांमध्ये 60 टक्के मुली आहेत आणि आज डॉक्टरेट पदवी मिळवणाऱ्या निम्म्या संशोधकही मुली आहेत. लिंग समानतेचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्या म्हणाल्या.
समान संधी दिल्यास मुलींमध्ये मुलांपेक्षा सरस कामगिरी करण्याची क्षमता आहे यात शंका नाही असे राष्ट्रपती म्हणाल्या. साहित्य, संस्कृती, नृत्य, संगीत यामध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय आहे. मात्र आता आपल्या मुलींची क्षमता विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून पोलीस आणि लष्करापर्यंत प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे. आता आपण महिलांच्या विकासाच्या टप्प्याकडून महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे वाटचाल करत आहोत.
राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना सांगितले की, दीक्षांत समारंभ म्हणजे केवळ पदव्या स्वीकारणे नाही. मेहनत आणि यश साजरे करण्याचा एक उत्सव आहे. याद्वारे नवीन स्वप्ने आणि संधींची कवाडे खुली होतात. पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण संपले असे नाही असे त्या म्हणाल्या. आयुष्यभर शिकण्याची आवड असायला हवी. विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्ञानाचा आणि विद्वत्तेचा उपयोग केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही करावा असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी राष्ट्र उभारणीबाबतही विचार करायला हवा, असे त्या म्हणाल्या.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2010592)
आगंतुक पटल : 119