आयुष मंत्रालय

पंतप्रधानांनी झज्जर आणि पुणे येथील दोन ‘आयुष प्रकल्पांचे’ केले उद्घाटन


महाराष्ट्रातील पुणे येथील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या ‘निसर्ग ग्राम’ चे उद्घाटन

Posted On: 25 FEB 2024 8:04PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणाली मार्फत आयुष मंत्रालयाच्या दोन संस्थांचे उद्घाटन केले. या संस्था देशातील सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रणालीला अधिक प्रोत्साहन देतील. हरियाणातील झज्जर येथील  केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन संस्था’ (CRIYN) आणि महाराष्ट्रातील पुणे येथील निसर्ग ग्रामया राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे (NIN) उद्घाटन करण्यात आले.

आमच्या सरकारचे प्राधान्य रोग प्रतिकारशक्ती आणि रोगाशी लढण्याची क्षमता वाढवणे याला आहे, असे पंतप्रधान या संस्थांच्या उद्घाटन समारंभात बोलताना म्हणाले. आम्ही पोषणावर भर दिला असून रोग टाळण्यासाठी योग, आयुर्वेद आणि स्वच्छता यावर लक्ष केंद्रित केले आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीय आयुष तसेच बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री  सर्बानंद सोनोवाल पश्चिम बंगालमधील कल्याणी येथून दूरदृश्य प्रणालीमार्फत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पंतप्रधानांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील एम्सचे देखील उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील  दूरदृश्य प्रणालीमार्फत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय आयुष तसेच महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई गुजरातमधील कार्यक्रमात सहभागी झाले होते.

'निसर्ग ग्राम' हे 250 खाटांचे रूग्णालय आहे ज्यामध्ये बहु-शाखीय  संशोधन आणि विस्तार सेवा केंद्र आहे तसेच पदवी पूर्व  (UG) आणि स्नातकोत्तर (PG) आणि पॅरा मेडिकल अभ्यासक्रमांचे शिक्षण देणारे निसर्गोपचार वैद्यकीय महाविद्यालय आहे.  या महाविद्यालयामध्ये निवासी आणि अनिवासी सुविधा देखील उपलब्ध आहेत. मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, सभागृह, योग दालन, कॉटेज आणि प्रसिद्ध गांधी मेमोरियल हॉल देखील महाविद्यालय प्रांगणाचा अविभाज्य भाग आहे.  25 एकर क्षेत्रावर पसरलेल्या या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 213.55 कोटी रुपये आहे.

पुण्यातील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (NIN) आणि झज्जर येथील देवरखाना गावातील केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन संस्था (CRIYN) पारंपरिक आरोग्य सेवा प्रणालींद्वारे सर्वसमावेशक आरोग्यसेवेला चालना देण्यासाठीच्या मार्गावरील महत्त्वपूर्ण टप्पे आहेत.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2008949) Visitor Counter : 69