संरक्षण मंत्रालय
भारत आणि जपान यांच्यातील “ धर्म गार्डियन” या संयुक्त युद्ध सरावाला राजस्थानमध्ये सुरुवात
Posted On:
25 FEB 2024 12:19PM by PIB Mumbai
भारतीय लष्कर आणि जपानचे लष्कर यांच्यात आजपासून राजस्थानच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजेसवर “ धर्म गार्डियन” या संयुक्त युद्ध सरावाची सुरुवात झाली. आज 25 फेब्रुवारी ते 9 मार्च 2024 या कालावधीत हा युद्धसराव होणार आहे.
“धर्म गार्डियन” हा वार्षिक युद्धसराव आहे आणि भारत आणि जपानमध्ये त्याचे आलटून पालटून आयोजन करण्यात येते. दोन्ही देशांच्या पथकांमध्ये प्रत्येकी 40 सैनिकांचा समावेश आहे. 34वी इन्फन्ट्री रेजिमेंट जपानच्या पथकाचे प्रतिनिधित्व करत आहे तर राजपुताना रायफल्सची एक बटालियन भारतीय पथकाचे प्रतिनिधित्व करत आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील सातव्या भागाअंतर्गत निम-शहरी वातावरणात संयुक्त मोहिमांमधील एकत्रित क्षमतेमध्ये वाढ करण्याचा आणि लष्करी सहकार्य वृद्धिंगत करण्याचा या सरावाचा उद्देश आहे. अतिशय उच्च शारीरिक क्षमता, संयुक्त नियोजन, संयुक्त लष्करी डावपेचांचे सराव आणि विशेष सशस्त्र कौशल्यांचे मूलभूत धडे यावर या सरावात भर दिला जातो. तात्पुरत्या परिचालन तळांची उभारणी, गुप्तचर प्रणाली, टेहळणी आणि फेरतपासणी(ISR) जाळे तयार करणे, फिरत्या वाहन तपासणी चौकीची उभारणी करणे, शत्रुपक्ष असलेल्या गावात वेढा आणि शोधमोहीम राबवणे, हेलिबोर्न कारवाया आणि संशयास्पद घरात शिरकाव करण्याचा सराव यांसारख्या सरावांचा या युद्धविषयक डावपेचांच्या सरावात समावेश आहे. शस्त्रे आणि उपकरणांच्या प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात येईल ज्यामध्ये आत्मनिर्भर भारत उपक्रमाचे आणि देशाच्या वाढत्या संरक्षण उद्योजकतेचे दर्शन घडेल.
“धर्म गार्डियन” या युद्धसरावामुळे दोन्ही देशांना परस्परांचे युद्धविषयक सर्वोत्तम डावपेच, तंत्र आणि प्रक्रिया यांची युद्धविषयक डावपेच सरावांच्या आयोजनातून देवाणघेवाण करता येईल. या युद्धसरावामुळे दोन्ही बाजूंच्या सैनिकांच्या तुकड्यांमध्ये आंतर परिचालनक्षमता, सौहार्द आणि मित्रत्वाच्या भावनेचा विकास होण्यासाठी देखील मदत मिळेल. संरक्षण सहकार्याचा स्तर उंचावेल आणि दोन्ही मित्र देशांमधील द्विपक्षीय संबंधांना आणखी चालना मिळेल.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2008842)
Visitor Counter : 297