आयुष मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे आणि झज्जर येथील आयुष प्रकल्पांचे करणार उद्घाटन


महाराष्ट्रातील पुण्यात 213.55 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था ‘निसर्ग ग्राम’चे होणार उद्घाटन

हरियाणातील झज्जर येथे 63.88 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ‘सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी’चे होणार उद्घाटन

Posted On: 24 FEB 2024 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 फेब्रुवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी  25 फेब्रुवारी रोजी आपल्या गुजरात दौऱ्यादरम्यान आयुष मंत्रालयाच्या दोन संस्थांचे उद्घाटन देखील करणार आहेत. या दोन्ही संस्था देशातील सर्वसमावेशक आरोग्य सेवा पद्धतीला अधिक प्रोत्साहन देतील. महाराष्ट्रात पुणे येथील ‘निसर्ग ग्राम’ नावाची राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (NIN) आणि हरियाणातील झज्जर येथील  ‘योग आणि निसर्गोपचार केंद्रीय संशोधन संस्था’ (CRIYN) या दोन्ही संस्था, 25 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान, दूरदृश्य प्रणाली मार्फत राष्ट्राला समर्पित करतील.

निसर्ग - राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणे

‘निसर्ग ग्राम’ हे 250 खाटांचे रूग्णालय आहे ज्यामध्ये बहुविद्याशाखीय संशोधन आणि विस्तार सेवा केंद्र आहे, स्नातक आणि स्नातकोत्तर तसेच परा वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण देणारे निसर्गोपचार वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये निवासी आणि अनिवासी सुविधा देखील उपलब्ध आहेत. मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, सभागृह, योग दालन, कॉटेज आणि प्रसिद्ध गांधी मेमोरियल हॉल देखील महाविद्यालय प्रांगणाचा अविभाज्य भाग आहे.  25 एकर क्षेत्रावर पसरलेला हा प्रकल्प सुमारे 213.55 कोटी रुपये खर्चाचा आहे.

आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत बांधण्यात आलेल्या, हरियाणा मधील झज्जर येथील ‘योग आणि निसर्गोपचार केंद्रीय संशोधन संस्थेचे उद्घाटन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. ही संस्था सर्वोच्च स्तरावरील योग आणि निसर्गोपचार संशोधन आणि शिक्षण सुविधा प्रदान करते. या प्रकल्पाद्वारे योग आणि निसर्गोपचार आरोग्य सेवासंबंधी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. या संस्थेमध्ये बाह्य रुग्ण विभागासह 200 खाटांचे रुग्णालय, योग विभाग आणि संतुलित आहार विभाग तसेच उपचार विभाग, शैक्षणिक विभाग, वसतिगृह आणि निवासी विभाग यांचा समावेश आहे. 63.88 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प 19 एकर भूभागावर विस्तारलेला आहे.

केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन संस्था, झज्जर (हरियाणा)

पुण्यातील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (NIN) आणि झज्जरमधील देवरखाना गावातील केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन संस्था (CRIYN)  म्हणजे पारंपारिक आरोग्य सेवा प्रणालींच्या माध्यमातून सर्वसमावेशक आरोग्यसेवेला चालना देण्याच्या मार्गावरील महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. या संस्था जलोपचार, मसाज, नैदानिक पोषण आणि योगोपचार अशा विविध पद्धतींचा अवलंब करून उदयोन्मुख आरोग्य सेवा आव्हाने, विशेष करून असंसर्गजन्य रोग (NCDs) प्रकाराची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन त्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करतात. या संस्था आपल्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून व्यक्तींना त्यांच्या तंदुरुस्तीला आणि आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी सक्षम बनवतील. 

 

* * *

M.Pange/S.Mukhedkar/D.Rane



(Release ID: 2008690) Visitor Counter : 66


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu