संरक्षण मंत्रालय

वर्ष 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या संरक्षण दलातील खेळाडूंसाठीच्या आर्थिक प्रोत्साहन निधीला दिली मंजुरी


सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये, रौप्यपदक विजेत्याला - 15 लाख रुपये; तर कांस्यपदक विजेत्याला - 10 लाख रुपये मिळणार

Posted On: 24 FEB 2024 10:02AM by PIB Mumbai

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वर्ष 2023 च्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि चौथ्या आशियाई दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या सशस्त्र दलाच्या जवानांसाठी आर्थिक प्रोत्साहन निधी मंजूर केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच आशियाई दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा या दोन्हींसाठी, सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना प्रत्येकी 15 लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये रोख बक्षीस मिळणार आहे.


संरक्षण दलातील अनेक क्रीडापटूंनी या क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून देशाचा अभिमान वाढवला होता, संरक्षण मंत्र्यांनी हे खेळाडू मायदेशी परतल्यावर त्यांचा सत्कार केला होता आणि या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांची प्रशंसाही केली होती. त्यावेळी संरक्षण मंत्र्यांनी सात दिव्यांग खेळाडूंसहित 45 पदक विजेत्यांना रोख बक्षिसेही मंजूर केली होती. या 45 खेळाडूंनी आशियाई  क्रीडा स्पर्धांमध्ये 09 सुवर्ण, 18 रौप्य आणि 17 कांस्य पदके आणि आशियाई दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये 01 सुवर्ण, 04 रौप्य आणि 02 कांस्य पदके जिंकली होती.


संरक्षण मंत्रालयाने प्रथमच संरक्षण दलातील जवानांसाठी जाहीर केलेल्या या आर्थिक प्रोत्साहन निधीमुळे या खेळाडूंना पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2024 च्या पात्रता स्पर्धांमध्ये आणखी चांगली कामगिरी करून दाखवण्यासाठी प्रेरणा मिळेल, ज्यासाठी ते सध्या तयारी करत आहेत.

***

Jaydevi PS/VPY/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2008567) Visitor Counter : 72