इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर सोमवारी मुंबई टेक वीकमध्ये सहभागी
प्रविष्टि तिथि:
20 FEB 2024 3:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 20 फेब्रुवारी 2024
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री आणि जलशक्तीमंत्री, राजीव चंद्रशेखर, यांनी सोमवारी मुंबई टेक वीक दरम्यान अनंत गोयंका यांच्याशी दूरस्थ पद्धतीने संवाद साधला.

देशातल्या नियमनाच्या परीदृश्याबद्दल आपले विचार मांडताना राजीव चंद्रशेखर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या परिवर्तनकारी दृष्टिकोनावर भर दिला, त्याविरुद्ध आधीच्या सरकारच्या काळात दूरसंचार सारखी महत्वाची क्षेत्रे अत्यंत ढिसाळपणे हाताळली जात असत, असे ते म्हणाले.
आपल्या 12 वर्षांच्या व्यापक उद्योजकीय अनुभवावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की दूरसंचार क्षेत्रात काही अत्यंत मोठे घोटाळे झाले होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा सरकार नियमनाविषयी बोलते तेव्हा तेव्हा त्याकडे संशयाच्या दृष्टीने बघितले जाते आणि निंदा केली जाते कारण नियमन हे एखाद्या अजेंड्याला राबवण्यासाठी किंवा सरकारची गरज म्हणून किंवा राजकीय नियंत्रण म्हणून केले जाते असा सार्वत्रिक समज झाला होता.
मात्र नियमनाची चौकट तयार करण्याचा आमचा दृष्टीकोन खुला, पारदर्शक आणि सल्लामसलत करण्याचा आहे. यामध्ये सरकारचे शासन अधिक नाही तर सर्व संबंधित भागधारकांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कोणत्याही भागाच्या यथोचित वृद्धीसाठी स्वतःला बंधने घालून घेण्यासारखे आहे. जर केवळ नवोन्मेष साध्य करायचा आहे किंवा उद्योजक त्यांना हवे तसे करत आहेत, आणि कोणतेही नियम, कायदे अथवा बंधने नाहीत अशी परिस्थिती असेल तर अराजक माजेल.
चीनच्या तुलनेत भारताच्या जागतिक स्थितीबद्दल विशेषतः सेमी कंडक्टर क्षेत्राबद्दल बोलताना चंद्रशेखर यांनी या क्षेत्राच्या प्रगतीमध्ये लक्षणीय परिवर्तन आल्याचे सांगितले.
“चीनच्या बाबतीत, आज असा कल आहे की, त्यांनी उदयोन्मुख आणि उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेल्या दशकात जी गती प्राप्त केली होती, ती आता मंद आणि बोथट होत आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्या विरोधात घातलेले निर्यात विषयक निर्बंध होय. भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये चीनकडे एक विश्वासू भागीदार म्हणून नक्कीच बघितले जात नाही. मी हे अत्यंत विश्वासाने सांगू शकतो की गेल्या 75 वर्षांमध्ये भारताने ज्या ज्या संधी गमावल्या त्या सर्व आपण पुन्हा मिळवणार आहोत. आज आमच्याकडे दोन पूर्ण विकसित उत्पादन एकके अर्थात फॅब आहेत, ज्यामध्ये दशकांनंतर देशात 10 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी फॅब गुंतवणूक येत आहे. आम्ही सेमीकंडक्टर क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी तंत्रज्ञानविषयक बाबींमध्ये सर्वोत्तम भागीदारांसह भागीदारी करत आहोत. त्यामुळे, येणाऱ्या पिढीतील चिप्स आणि उपकरणे डिझाइन करणाऱ्या सेमीकंडक्टरवरील डिझाइन नवोन्मेष परिसंस्थेसमवेत , आम्ही भारत सेमीकंडक्टर संशोधन केंद्र देखील सुरू करत आहोत. हे केंद्र एक अत्याधुनिक संशोधन केंद्र असेल जिथे जगातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर निर्माते भारतात संशोधन करतील.”असे त्यांनी सांगितले.

S.Tupe/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2007366)
आगंतुक पटल : 119