पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मंत्रिस्तरीय बैठकीला केले संबोधित


भारताने एका दशकात जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये 11 व्या स्थानावरून 5 व्या स्थानावर झेप घेतल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार

‘रिड्यूस, रियूज आणि रिसायकल’ हा भारताच्या पारंपरिक जीवनशैलीचा एक भाग आहे: पंतप्रधानांचे प्रतिपादन

भारत प्रत्येक मिशनमध्ये व्यापकता आणि वेग, प्रमाण आणि गुणवत्ता आणतो: पंतप्रधान

Posted On: 14 FEB 2024 8:18PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मंत्रिस्तरीय बैठकीला संबोधित केले.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या स्थापनेच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त अभिनंदन केले आणि या बैठकीच्या सह-अध्यक्षतेबद्दल आयर्लंड आणि फ्रान्सचे आभार मानले.

शाश्वत विकासाकरता ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वततेची गरज अधोरेखित करत, पंतप्रधानांनी एका दशकात भारताने जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये 11व्या स्थानावरून 5व्या स्थानावर झेप घेत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था कशी बनली, यावर प्रकाश टाकला.

त्याच कालावधीत भारताने सौरऊर्जा क्षमतेत 26 पट वाढ नोंदवली, तसेच देशाची अक्षय ऊर्जा क्षमता दुप्पट झाली, याचाही उल्लेख केला. "आम्ही या संदर्भात काळाच्या पुढे जात आमच्या पॅरिस वचनबद्धतेची निर्धारित वेळे पूर्वी पूर्तता केली", पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

जागतिक लोकसंख्येच्या 17% लोकसंख्या भारतामध्ये असून, जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा उपलब्धतेच्या उपक्रमांपैकी एक उपक्रम देखील चालवत आहे, या गोष्टीचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, भारतातील कार्बन उत्सर्जन हे जगातील एकूण कार्बन उत्सर्जनाच्या केवळ 4% आहे. त्यांनी सामूहिक आणि सक्रिय दृष्टीकोन अवलंबून हवामान बदलाचा सामना करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारताने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसारख्या उपक्रमांचे नेतृत्व केले आहे. आमचे मिशन लाईफ (LiFE) सामूहिक प्रभावासाठी प्रो-प्लॅनेट (ग्रह-अनुकूल) जीवनशैलीच्या निवडीवर लक्ष केंद्रित करते. कचरा  रिड्यूस (कमी करणे), रियूज (पुनर्वापर) आणि रिसायकल (पुनर्निर्मिती)हा भारताच्या पारंपरिक जीवनपद्धतीचा एक भाग आहे,” पंतप्रधान म्हणाले. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात जागतिक जैवइंधन गट सुरू झाल्याचा संदर्भ देत, पंतप्रधान मोदी यांनी या उपक्रमाला पाठिंबा देऊन पुढाकार घेतल्याबद्दल आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे (आयईए) आभार मानले. कोणत्याही संस्थेची विश्वासार्हता आणि क्षमता वाढवणाऱ्या सर्वसमावेशकतेकडे लक्ष वेधून पंतप्रधानांनी 1.4 अब्ज भारतीय नागरिकांचा उल्लेख केला, जे प्रतिभा, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष उपलब्ध करू शकतात. आम्ही प्रत्येक मिशनमध्ये व्यापकता आणि वेग, प्रमाण आणि गुणवत्ता आणतो”, पंतप्रधान मोदी म्हणाले, आणि भारताने मोठी भूमिका बजावल्यामुळे त्याचा मोठा लाभ आयईए ला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी आयईए च्या मंत्रिस्तरीय बैठकीच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आणि सध्याची भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि नवीन भागीदारीसाठी या व्यासपीठाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

आपण एक स्वच्छ, अधिक हरित आणि सर्वसमावेशक जग घडवूया”, पंतप्रधान मोदी यांनी भाषणाचा समारोप केला.

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2006122) Visitor Counter : 102