पंतप्रधान कार्यालय

संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय समुदायाच्या "अहलान मोदी" या कार्यक्रमात पंतप्रधानांचा संवाद

Posted On: 13 FEB 2024 11:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 फेब्रुवारी 2024

 

संयुक्त अरब अमिरातीमधील  भारतीय समुदायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या 'अहलान मोदी' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाला संबोधित केले. या कार्यक्रमात 7 अमिरातीमधील अनिवासी भारतीय सहभागी झाले होते आणि त्यात सर्व समुदायातील भारतीयांचा समावेश होता. प्रेक्षकांमध्ये अमिराती मधील नागरिकांचाही  समावेश होता.

अबुधाबीच्या झायेद स्पोर्ट्स सिटी स्टेडियमच्या मैदानात प्रवेश करताना 40000 प्रेक्षकांनी पंतप्रधानांचे विशेष उत्साहाने स्वागत केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी अनिवासी भारतीयांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे विचार मांडले.भारतीय समुदायाप्रती दाखवलेले औदार्य आणि घेत असलेल्या काळजीबद्दल पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरतीचे राज्यकर्ते आणि सरकारचे आभार मानले. ज्यावेळी संयुक्त अरब अमिरातीमध्ये अनिवासी भारतीयांना शक्य ती सर्व मदत करण्यात आली त्या विशेषतः कोविडच्या कठीण काळात घेतलेल्या विशेष काळजीचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला. गेल्या 10 वर्षात भारताने साधलेल्या प्रगतीच्या अनुषंगाने  पंतप्रधानांनी आपला दृष्टिकोन मांडला आणि 2047 पर्यंत विकसित देश - विकसित भारत - बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना भारत 2030 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त केला.

भारत एक "विश्वबंधू" आहे आणि जागतिक प्रगती आणि कल्याणासाठी योगदान देत आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये मध्ये सुमारे 3.5 दशलक्ष भारतीय नागरिक राहतात, ही  जगात कोणत्याही ठिकाणी राहणाऱ्या भारतीय नागरिकांपैकी सर्वात मोठी संख्या आहे. हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने संस्मरणीय बनवण्यासाठी "अहलान मोदी" ची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू होती.

 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2005788) Visitor Counter : 81