राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते 'आदि महोत्सवाचे" उद्घाटन
Posted On:
10 FEB 2024 2:47PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (10 फेब्रुवारी, 2024) रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये आदि महोत्सव 2024 चे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आपला देश विविधतेने परिपूर्ण आहे. मात्र ‘विविधतेत एकता’ ही भावना कायम राहिली आहे. या भावनेचे कारण म्हणजे एकमेकांच्या परंपरा, खाद्यपदार्थ आणि भाषा जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा आणि स्वीकारण्याचा आपला उत्साह हा होय. ही एकमेकांबद्दलची आदराची भावना आपल्या ऐक्याचा गाभा आहे. आदि महोत्सवात आदिवासी संस्कृती आणि विविध राज्यांच्या वारशाचा अनोखा संगम पाहून आनंद झाल्याचे सांगून देशाच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी बंधू-भगिनींची जीवनशैली, संगीत, कला, पाककृती यांची ओळख करून घेण्याची ही चांगली संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. या महोत्सवात आदिवासी समाजाच्या जीवनातील अनेक पैलू जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी लोकांना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जगभरातील आदिवासी समुदाय शतकानुशतके निसर्गाच्या सान्निध्यात राहत आहेत. आपले आदिवासी बंधू-भगिनी आजूबाजूचे वातावरण, झाडे, वनस्पती, प्राणी यांची त्यांच्या जीवन चक्राच्या प्रत्येक बाबतीत काळजी घेत आहेत. त्यांच्या जीवनशैलीतून आपण प्रेरणा घेऊ शकतो. आज जेव्हा संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे, तेव्हा आदिवासी समाजाची जीवनशैली अधिक अनुकरणीय बनते.
राष्ट्रपती म्हणाल्या की तंत्रज्ञानाचे आधुनिक युगात एक महत्त्वपूर्ण योगदान आहे. तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सोपे झाले आहे. समाजातील सर्व लोकांचा, विशेषत: वंचित घटकांचा शाश्वत विकास आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आपल्या सर्वांचा प्रयत्न असायला हवा.
राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताकडे पारंपारिक ज्ञानाचे अमूल्य भांडार आहे. हे ज्ञान अनेक दशकांपासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पारंपारिकतेने दिले जात आहे. पण आता अनेक पारंपरिक कौशल्ये नष्ट होत आहेत. ही ज्ञान परंपरा नामशेष होण्याचा धोका आहे. ज्याप्रमाणे अनेक वनस्पती आणि प्राणी नामशेष होत आहेत, त्याचप्रमाणे आपल्या सामूहिक स्मृतीतून पारंपारिक ज्ञानही नाहीसे होत आहे. हा अमूल्य निधी जमा करून आजच्या गरजेनुसार त्याचा योग्य वापर करण्याचाही आपला प्रयत्न असायला हवा. या प्रयत्नात तंत्रज्ञानही महत्त्वाची भूमिका बजावू शकते असे त्यांनी सांगितले.
आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ट्रायफेड द्वारे भारतातील आदिवासी वारशाची समृद्ध विविधता प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने आदि महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यावर्षी हा महोत्सव 10 ते 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2004832)
Visitor Counter : 103