युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“माझा भारत- माझा युवा भारत” मंचामध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार तसेच क्रीडा मंत्र्यांचे युवकांना प्रोत्साहन

Posted On: 09 FEB 2024 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर रोजी सुरु केलेल्या “माझा भारत-माझा युवा भारत”या मंचाला भरभरून प्रतिसाद मिळत असल्याबद्दल केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी नुकत्याच जारी केलेल्या निवेदनाद्वारे अपार कृतज्ञता आणि आनंद व्यक्त केला आहे.

राष्‍ट्र-उभारणीच्या कार्यात युवकांचा लक्षणीय सहभाग अधोरेखित करत, केंद्रीय मंत्र्यांनी नोंदणीकृत स्वयंसेवकांचे हित तसेच आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना अनुरूप असलेले विविध  उपक्रम सुरु करण्याबाबतच्या योजना सादर केल्या.  

पंतप्रधानांनी मांडलेली “विकसित भारत 2047” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यात युवकांकडे असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर अधिक भर देत केंद्रीय मंत्र्यांनी नोंदणी झालेले स्वयंसेवक आणि संभाव्य सहभागी अशा दोन्हींना संबोधित करून त्यांना लवकरात लवकर या उपक्रमाच्या mybharat.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केल.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, “तुम्ही केवळ जेन-झेड म्हणजे अत्याधुनिक पिढी नाही तर तुम्ही भारताची अमृत पिढी आहात.” देशाच्या भविष्याला आकार देण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करत त्यांनी या मंचाच्या स्वयंसेवकांमध्ये एकता, नवोन्मेष आणि निश्चयी वृत्तीची जोपासना करण्याबाबत हा मंच कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.

भाषणाच्या शेवटी युवकांना उज्ज्वल उद्यासाठी आज कृती करण्याचे आवाहन करून केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी देशाचे भविष्य घडवण्यात युवकांकडे असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचा उल्लेख केला.

या उपक्रमाबाबत अधिक माहिती घेण्यात तसेच नोंदणी करण्यात स्वारस्य  असलेल्या व्यक्तींना mybharat.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

 

* * *

S.Bedekar/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2004726) Visitor Counter : 90