कंपनी व्यवहार मंत्रालय

भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्थेतर्फे मुंबईत पहिल्या ‘द ग्रेट इंडियन बोर्ड रीबूट: रोड शो 2024’ चे आयोजन

Posted On: 06 FEB 2024 3:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2024

 

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचा (आयआयसीए)प्रमुख विचारगट असलेल्या भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्थेने 31 जानेवारी 2024 रोजी मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजार मुख्यालयात पहिल्या ‘द ग्रेट इंडियन बोर्ड रीबूट: रोड शो 2024’ चे आयोजन केले.

राष्ट्रीय शेअर बाजार – एनएसई इंडिया आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) यांच्यासह भागीदारीत आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वाच्या पहिल्याच कार्यक्रमाने भारतीय कॉर्पोरेट प्रशासनविषयक एक महत्त्वाचा टप्पा गाठला. प्रमुख व्यावसयिक नेते, नियामकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट प्रशासन क्षेत्रातील तज्ञांसह 200 हून अधिक प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

संचालक मंडळाचे नूतनीकरण, विविधता तसेच नवी तंत्रज्ञाने आणि नियामकीय आराखडा या बाबींच्या  समावेशासह, नव्याने उदयाला येणारी आव्हाने तसेच संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने अधोरेखित करण्यात आल्या.

कार्यक्रमात सुरुवातीला, आयआयसीएमधील कॉर्पोरेट प्रशासन आणि सरकारी धोरण विभागाचे प्रमुख डॉ.नीरज गुप्ता यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाला योग्य सूर लाभला.

यावेळी एनएसई इंडियाचे मुख्य नियामकीय अधिकारी अंकित शर्मा आणि बीएसईच्या मुख्य नियामकीय अधिकारी कमला के. यांची बीजभाषणे झाली. भविष्यातील धोरणात्मक दिशादर्शनासाठी संचालक मंडळाच्या स्थापनेत वैविध्य तसेच स्वीकारार्हता यांचे महत्त्व ठळकपणे विषद करत शर्मा यांनी आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक आणि सामुदायिक ध्येयांमध्ये समतोल साधण्यात कॉर्पोरेट प्रशासनाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. कमला यांनी त्यांच्या भाषणात, भारतीय व्यवसायांच्या परिवर्तनशील प्रवासाची चर्चा केली. व्यवसायात येणारे विविध व्यत्यय, व्यापारविषयक चित्रात होणारे बदल तसेच नवनव्या क्षेत्रांचा उदय यांना प्रतिसाद देत संचालक मंडळांनी या बदलांना स्वीकारुन नव्याने कार्य सुरु करण्याची गरज देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. गेल्या 25 वर्षांच्या काळात मंडळांच्या स्थापनेत झालेल्या उत्क्रांतीबद्दलची आकर्षक आकडेवारी सादर केली तसेच त्यांनी संचालकांच्या वाढत्या जबाबदाऱ्या आणि डिजिटल युगात वेगवेगळे कौशल्य संच आत्मसात करण्याच्या गरजेवर भर दिला.

या कार्यक्रमात दोन अभ्यासपूर्ण गट चर्चांचे आयोजन करण्यात आले होते:

ब्लू स्टार कंपनीचे प्रमुख शैलेश हरिभक्ती यांनी ‘ संचालक मंडळ नूतनीकरणातील आव्हाने आणि संधी शोधताना’ या विषयावरी चर्चेचे संचालन केले. या चर्चेत थरमॅक्सचे संचालक मंडळ सदस्य नौशीर मिर्झा व्हीआयपी क्लोदिंगचे संचालक मंडळ सदस्य रॉबिन बॅनर्जी, एचडीएफसी बँकेचे संचालक मंडळ सदस्य संदीप पारेख यांनी भाग घेतला. सध्या जलदगतीने होत असलेल्या तंत्रज्ञानविषयक प्रगतीशी संचालक मंडळाने सक्रियतेने जुळवून घेण्याची गरज तसेच सातत्यपूर्ण शिक्षण, कालबाह्य शिक्षण मागे टाकून पुनर्शिक्षण घेणे याचे महत्त्व यावर या चर्चेत विचारमंथन करण्यात आले.

‘लिंगविषयक वैविध्य आणि त्यापलीकडील घटक’ या विषयावरील गटचर्चेचे नेतृत्व केंद्र सरकारचे माजी सचिव दीपक शेट्टी यांनी केले. या चर्चेत आदित्य बिर्ला उद्योग समूहातील कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागाचे माजी संचालक तसेच संचालक मंडळाचे माजी सदस्य डॉ.संतृप्त मिश्रा;फर्स्ट मेरिडीयनच्या संचालक मंडळ सदस्य रिचा अरोरा, झोमॅटोच्या संचालक मंडळ सदस्य सुतपा बॅनर्जी आणि रिलायन्स उद्योग समूहाच्या अनुपालन विभाग प्रमुख सावित्री पारेख हे तज्ञ सहभागी झाले होते. डिजिटल युगातील आव्हाने तसेच संधी यांचा शोध घेण्यासाठीच्या सज्जतेची सुनिश्चिती करत संचालक मंडळांनी लोकसंख्याविषयक तसेच तंत्रज्ञानविषयक बदलत्या चित्राबाबत व्यक्त होण्याची गरज या चर्चेत ठळकपणे मांडण्यात आली.

या चर्चेतून व्यक्त झालेले विचार आणि धोरणे भारतातातील कॉर्पोरेट उद्योगांच्या संचालक मंडळांची उभारणी तसेच प्रशासन विषयक पद्धतींच्या भविष्यातील वाटचालीवर लक्षणीयरीत्या प्रभाव टाकतील तसेच भारतातील कॉर्पोरेट प्रशासनाच्या संदर्भातील चर्चांमध्ये नवे आयाम प्रस्थापित करतील या उद्देशाने ‘द ग्रेट इंडियन बोर्ड रीबूट: रोड शो 2024’चे आयोजन करण्यात आले होते.

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2003052) Visitor Counter : 60


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu