पंतप्रधान कार्यालय
पाली येथे आयोजित केलेल्या 'संसद खेल महाकुंभ' कार्यक्रमामध्ये दूरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.
Posted On:
03 FEB 2024 12:42PM by PIB Mumbai
माझ्या प्रिय युवा मित्रांनो, पालीमध्ये आपल्यामधील खेळाची प्रतिभा दाखवणार्या सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन! खेळामध्ये पराभव ही गोष्ट तर कधीच नसते. कारण खेळामध्ये एक तुम्ही जिंकता तरी किंवा तुम्ही काही नवीन शिकता तरी! म्हणूनच मी सर्व खेळाडूंबरोबरच इथं उपस्थित असलेल्या त्यांच्या प्रशिक्षकांना आणि खेळाडूंचे जे कुटुंबिय आहेत, त्या सर्वांना शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
"संसद खेल महाकुंभ"मध्ये जो उत्साह दिसून येत आहे, जो आत्मविश्वास दिसतोय, तो आज प्रत्येक खेळाडू, प्रत्येक युवकाची ओळख आहे.त्यांचा हा उत्साह, हा उमंग, हा जोश, बनला आहे. ज्याप्रमाणे क्रीडापटू मैदानात कामगिरी करतात तशाच प्रकारे आज खेळांच्या बाबतीत सरकारही 'वेगवान धावपटू' आहे. आमच्या खेळाडूंना खेळासाठी जास्तीत जास्त संधी मिळाव्यात, असे सरकारला नेहमीच वाटते. यामध्ये मग गाव पातळीवर असो, तसेच आपल्या शाळेमध्ये, नंतर त्यांना विद्यापीठामध्ये आणि मग पुढे जाऊन राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळावी. क्रीडापटूंची ही भावना ओळखून भारतीय जनता पार्टीचे खासदार "खेल महाकुंभ" आयोजन करीत आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून भाजपाचे खासदार "खेल महाकुंभ" ला बळकटी देत आहेत. यामुळे या स्पर्धा आयोजनासाठी भारतीय जनता पार्टीचे मी कौतुक करतो. आणि अशा प्रकारच्या खेळांचे आयोजन गेल्या काही वर्षापासून सातत्याने होत आहे.भाजपाच्या खासदार क्रीडा महाकुंभ स्पर्धेमुळे जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये, लक्षावधी होतकरू, प्रतिभावंत खेळाडूंना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये संधी दिली गेली आहे. हे खेल महाकुंभ म्हणजे, नवनवीन खेळाडूंचा शोध घेणे आणि त्यांना प्रशिक्षण देवून जणू हिर्याला पैलू पाडण्याचे मोठे माध्यम बनले आहे.आणि आता तर भाजपाचे खासदार मुलींसाठी एक विशेष खेल महाकुंभचे आयोजन करणार आहे. याबद्दल मी भाजपाच्या खासदारांचे या महत्वपूर्ण मोहिमेसाठी अभिनंदन करतो.
मित्रांनो,
मला असे सांगितले गेले की, पालीमध्ये 1100 पेक्षाही जास्त शाळांनी "सांसद खेल महाकुंभ" च्या आयोजंनामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.दोन लाखापेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी पुढे आले आहेत. या दोन लाख खेळाडूंना या महाकुंभमुळे जे 'एक्सपोजर' मिळाले आहे, आपली प्रतिभा दाखवण्याची जी संधी मिळाली आहे, ती अभूतपूर्व म्हणावी लागेल. यासाठी संसदेतील माझे सहकारी पी.पी. चौधरी यांचे अभिनंदन करतो. खासदार चौधरी यांनी स्पर्धांचे भव्यतेने आयोजन केले आहे. राजस्थानच्या वीरभूमीतील युवकांनी नेहमीच लष्करापासून ते खेळाच्या मैदानापर्यंत देशाचा सन्मान वाढवला आहे. मला विश्वास आहे की, तुम्ही सर्व खेळाडू हा वारसा असाच सातत्याने पुढे घेवून जाणार आहात. तुम्हा सर्वांना माहिती असेलच की, खेळाविषयी एक सर्वात चांगली गोष्ट म्हणजे खेळ आपल्याला जिंकण्याची सवय लावतातच त्याचबरोबर हे खेळ आपल्याला सातत्याने अधिकाधिक उत्तम शिकवणही देतात. सर्वश्रेष्ठ बनण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, त्यामुळे सर्व शक्तीनिशी प्रयत्न करीत राहिले पाहिजे, हे आपल्याला खेळ शिकवतात. म्हणूनच हा क्रीडा महाकुंभ एका तर्हेने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणारा मोठा महायज्ञही आहे.
मित्रांनो,
खेळांमध्ये आणखी एक खूप मोठी ताकद असते ती म्हणजे खेळ युवकांना अनेक वाईट गोष्टींपासून वाचवण्याचेही ते काम करतात. खेळामुळे इच्छाशक्ती दृढ होते. एकाग्रता वाढते. आपला फोकस क्लियर होतो. मग यामध्ये अंमली पदार्थांचे जाळे असो किंवा इतर दुसर्या पदार्थांची वाईट म्हणण्यासारखी सवय असो, खेळाडू अशा गोष्टींपासून दूर राहतात. म्हणूनच खेळ व्यक्तित्व विकासामध्ये मोठी भूमिका बजावतात.
माझ्या प्रिय मित्रांनो,
भाजपा सरकार, मग ते राज्यांमध्ये असेल, अथवा केंद्रामध्ये युवकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देते. खेळाडूंना अधिकाधिक संधी देवून...खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत पारदर्शक आणून, सरकारव्दारे सर्व प्रकारची साधन सामुग्री उपलब्ध करून दिल्यामुळे भारताच्या खेळाडूंना खूप चांगली मदत मिळाली आहे. आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये खेळाच्या अंदाज पत्रकामध्ये आधीच्या तुलनेत तिप्पट वाढ केली आहे. शेकडो खेळाडू आज "टाॅप्स" योजने अंतर्गत देश- परदेशांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. "खेलो इंडिया" अंतर्गत तीन हजारांपेक्षा जास्त खेळाडूंना दरमहा 50 हजार रूपये मदत दिली जात आहे. अगदी जमिनी स्तरावर, गाव पातळीवर जवळपास एक हजारपेक्षा जास्त खेलो इंडिया केंद्रामध्ये लाखो खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. आणि त्याचे परिणाम आता आपल्यासमोर आहेत. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आमच्या खेळाडूंनी शंभरपेक्षा अधिक पदकांची कमाई करून विक्रम नोंदवला आहे. आशियाई स्पर्धेमध्ये पदके जिंकणार्यांपैकी बहुतांश खेळाडू "खेलो इंडिया" मधून आलेले आहेत.
माझ्या प्रिय खेळाडूंनो,
खेळाडू ज्यावेळी एखाद्या संघामध्ये खेळत असतो, त्यावेळी तो व्यक्तिगत लक्ष्यांपेक्षाही जास्त प्राधान्य आपल्या संघाच्या लक्ष्यांना देतात. ते आपला संघ, आपले राज्य, आपला देश यांच्या लक्ष्यांबरोबर खांद्याला खांदा लावून वाटचाल करीत असतात. आज अमृतकाळामध्ये देशही याच युवामनाच्या भावनांबरोबर पुढे जात आहे. या एक तारखेला जो अर्थसंकल्प सादर केला गेला, तोही एक प्रकारे देशाच्या युवकांना समर्पित आहे. सरकार जे रेल्वे, रस्ते यांच्यावर, आधुनिक पायाभूत सुविधांवर 11 लाख कोटी रूपये खर्च करणार आहे, त्याचा सर्वाधिक लाभ युवकांना मिळणार आहे. चांगले, गुळगुळीत रस्ते असावेत, असे सर्वाधिक कोणाला वाटते? आमच्या युवकांना! नवीन वंदे भारत रेलगाड्या पाहून सर्वात जास्त आनंद कोणाला होतो? आमच्या युवकांना! अर्थसंकल्पामध्ये 40 हजार वंदे भारतसारख्या रेल्वे बोगी बनविण्याची घोषणा झाली आहे, त्याचा लाभ कोणाला होणार आहे? आमच्या युवकांना! भारत आधुनिक पायाभूत सुविधांवर 11 लाख कोटी रूपये खर्च करणार आहे, त्यामुळे सर्वाधिक रोजगाराच्या संधी युवकांसाठीच निर्माण होणार आहेत. भारताच्या युवकांना नवनवीन गोष्टींचे संशोधन करण्याची संधी मिळावी, खेळ असो अथवा इतर कोणतेही क्षेत्र असो, आपल्या मोठमोठ्या कंपन्या बनवता याव्यात, यासाठी एक लाख कोटी रूपयांचा स्वतंत्र निधी बनवण्यात आला आहे. सरकारने स्टार्ट अप्ससाठी कर सवलतीला आता आणखी मुदत वाढ दिली आहे.
मित्रांनो,
चोहोबाजूंनी होत असलेल्या विकास कामांमुळे पाली या शहराचे भाग्यच पालटले आहे, पालीची प्रतिमाही बदलली आहे. तुमच्या या पाली लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 13 हजार कोटी रूपये खर्चून रस्ते बनवले आहेत. रेल्वे स्थानकांचा विकास असो, रेल्वे पूल असो, रेल्वे मार्गिकेचे दुपदरीकरण असो, अशा असंख्य विकास कामांचा लाभ तुम्हां सर्वांना घेता येत आहे. सरकारचे लक्ष पालीच्या विद्यार्थ्यांवर आणि युवकांवर आहे, त्यांना जास्तीत जास्त संधी कशा मिळू शकतील याकडे आहे. इथल्या युवा मंडळीच्या कौशल्य विकासाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. पालीमध्ये अनेक नवीन आय.टी. केंद्रे बनविण्यात आली आहेत. दोन नवीन केंद्रीय विद्यालयेही सुरू करण्यात आली आहेत. सरकारी विद्यालयांमध्ये नवीन वर्ग बनविण्याचे काम असो, नवीन संगणक प्रयोगशाळा निर्माण करण्याचे काम असो, अशा सर्व दिशांनी प्रयत्न केले जात आहेत. इथे वैद्यकीय महाविद्यालय बनविण्याचे काम असो, पारपत्र केंद्र सुरू करण्याचे काम असो, गावांमध्ये सौर ऊर्जेचे दिवे लावणे असो, या सर्व गोष्टींमुळे पालीच्या नागरिकांचे जीवन अधिक सुकर, सुगम बनले आहे. आमचा प्रयत्न आहे की, डबल इंजिन असलेल्या सरकारमुळे पालीसहीत संपूर्ण राजस्थानचा प्रत्येक नागरिक सशक्त बनावा, यशस्वी व्हावा. भाजपा सरकारच्या या प्रयत्नांनी पाली आणि या संपूर्ण राज्यातील युवकांचे जीवनही सुलभ बनावे. आणि ज्यावेळी जीवनातील संकटे, आव्हाने कमी होतात, त्यावेळी खेळामध्येही चांगले लक्ष लागते आणि जिंकण्याची शक्यता वाढते. पुन्हा एकदा तुम्हा सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद!!
***
JPS/SB/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2002361)
Visitor Counter : 129
Read this release in:
Gujarati
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam