पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 ला संबोधित केले


भारत वेगाने पुढे जात आहे

अर्थव्यवस्थेच्या विकासाची आकडेवारी आणि वाढत्या उत्पन्नामुळे मोबिलिटी क्षेत्रात नवीन आत्मविश्वास निर्माण होईल: पंतप्रधान

आमच्या सरकारची गती आणि व्यापकतेने भारतातील मोबिलिटीची व्याख्याच बदलली आहे: पंतप्रधान

ऑटो आणि ऑटोमोटिव्ह घटक उद्योगांच्या महत्वाच्या भूमिकेमुळे भारत आता जागतिक आर्थिक शक्ती बनण्यापासून दूर नसल्याचा पंतप्रधानांचा विश्वास

ट्रक चालक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्यांची सरकारला जाणीव आहे: पंतप्रधान

नवीन योजनेच्या पहिल्या टप्प्यात सर्व राष्ट्रीय महामार्गांवर अन्न, पिण्यायोग्य पाणी, स्वच्छतागृहे,  पार्किंग आणि वाहनचालकांसाठी विश्रांती स्थळांनी सुसज्ज 1000 आधुनिक इमारती उभारल्या जात आहेत: पंतप्रधान

Posted On: 02 FEB 2024 6:55PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मध्ये भारत मंडपम येथे ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024’, या ‘मोबिलिटी प्रदर्शना निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. हे भारतातील सर्वात मोठे आणि अशा प्रकारचे पहिलेच प्रदर्शन आहे. पंतप्रधानांनी यावेळी प्रदर्शनाला भेट देऊन निरीक्षणही केले.

भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन 2024, मोबिलिटी, आणि ऑटोमोटिव्ह व्हॅल्यू चेन, अर्थात दळणवळणाच्या स्वयंचलित मूल्य साखळी मधील भारताच्या क्षमता प्रदर्शित करत असून, या ठिकाणी प्रदर्शने, परिषदा, खरेदीदार-विक्रेता संमेलने, राज्य सत्रे, रस्ता सुरक्षा मंडप आणि गो-कार्टिंग या सारखे लोकांना आकर्षित करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगाचे, या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अभिनंदन केले आणि प्रदर्शनात आपली उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी प्रदर्शकांनी घेतलेल्या परिश्रमांची प्रशंसा केली. पंतप्रधान म्हणाले की, देशात एवढ्या भव्य आणि विशाल स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन केल्याने त्यांचा आनंद आणि आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. दिल्लीमधील नागरिकांनी भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन 2024, ला भेट द्यावी, असे आवाहन करून पंतप्रधान म्हणाले की, या प्रदर्शनाने संपूर्ण मोबिलिटी (दळणवळण) आणि पुरवठा साखळीला एकाच व्यासपीठावर एकत्र आणले आहे.

पंतप्रधानांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातील मोबिलिटी संबंधित परिषदेची आठवण करून दिली, ज्यामध्ये त्यांनी बॅटरी आणि इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित केले होते. आपल्या दुस-या कार्यकाळात यामध्ये लक्षणीय प्रगती पाहायला मिळाली, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, आणि तिसऱ्या कार्यकाळात मोबिलिटी मध्ये देश नवीन उंची गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्याचा पुनरुच्चार करत, पंतप्रधानांनी मोबिलिटी  क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘ये ही समय है, सही समय है’, अर्थात हीच योग्य वेळ आहे, या आपण केलेल्या आवाहनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. "भारत पुढे जात आहे आणि वेगाने वाटचाल करत आहे", असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, सध्याचे युग हे मोबिलिटी क्षेत्रासाठी सुवर्ण काळाची सुरुवात आहे. त्यांनी अधोरेखित केले की भारताची अर्थव्यवस्था वेगाने विस्तारत आहे आणि सध्याच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. गेल्या 10 वर्षातील सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सांगितले की, अंदाजे 25 कोटी लोक गरिबीच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. जेव्हा एखादा नागरिक गरिबीतून बाहेर पडतो, तेव्हा सायकल, दुचाकी किंवा चारचाकी ही वाहतुकीची साधने त्यांची पहिली गरज बनते, यावर त्यांनी भर दिला. नव-मध्यम वर्गाचा उदय झाल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी, या आर्थिक स्तरातील नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याची गरज अधोरेखित केली, आणि ते म्हणाले की, याला पर्याय नाही. देशातील मध्यमवर्गाच्या कक्षांचा विस्तार आणि वाढत्या उत्पन्नामुळे भारतातील मोबिलिटी  क्षेत्राला बळ मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. "अर्थव्यवस्थेच्या विकासाची आकडेवारी आणि वाढत्या उत्पन्नामुळे मोबिलिटी क्षेत्रात नवीन आत्मविश्वास निर्माण होईल", पंतप्रधान म्हणाले. 2014 पूर्वीच्या 10 वर्षांच्या तुलनेत 2014 नंतरच्या 10 वर्षांमध्ये भारतात विकल्या गेलेल्या कारची संख्या 12 कोटींवरून 21 कोटींवर गेली आहे, तर 10 वर्षांपूर्वी भारतात विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कारची संख्या प्रतिवर्षी 2 हजार होती ती आज 12 लाख प्रतिवर्ष झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की, गेल्या 10 वर्षात प्रवासी वाहनांच्या संख्येत 60 टक्के तर दुचाकी वाहनांच्या संख्येत 70 टक्के वाढ झाली आहे. पंतप्रधानांनी माहिती दिली की, ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारीमधील कार विक्रीने मागील सर्व विक्रम मोडले आहेत. “मोबिलिटी क्षेत्रासाठी देशात अभूतपूर्व वातावरण निर्माण झाले आहे, आणि तुम्ही त्याचा फायदा घ्यायला हवा”, पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित उद्योग जगतातील धुरिणांना आवाहन केले. पंतप्रधान म्हणाले की, आजचा भारत भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नवीन धोरणे बनवत आहे. काल सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी सांगितले की 2014 मध्ये भारताचा भांडवली खर्च 2 लाख कोटी रुपयांहून कमी होता आणि आज तो 11 लाख कोटी रुपयांहून अधिक झाला आहे. यामुळे भारताच्या वाहतूक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत हे त्यांनी नमूद केले. हा अभूतपूर्व खर्च रेल्वे, रस्ते, विमानतळ, जलमार्ग वाहतूक आणि इतर सर्व प्रकारच्या वाहतुकीचा कायापालट करत आहे. अटल बोगदा ते अटल सेतू यांसारखे अभियांत्रिकी चमत्कार विक्रमी कालावधीत पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. भारतात गेल्या 10 वर्षात 75 नवीन विमानतळ बांधण्यात आले, सुमारे 4 लाख किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार झाले आहेत, 90,000 किमी राष्ट्रीय महामार्ग बांधले गेले आहेत, 3500 किमी जलद-गती कॉरिडॉर विकसित केले गेले आहेत, 15 नवीन शहरात मेट्रो आणि 25,000 रेल्वे मार्ग तयार केले आहेत. 40,000 रेल्वे डब्यांचे आधुनिक वंदे भारत प्रकारातील डब्यांमध्ये रूपांतर करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. हे डबे सामान्य गाड्यांमध्ये बसवल्यास भारतीय रेल्वेचा कायापालट होईल.

पंतप्रधान म्हणाले की, “आमच्या सरकारच्या गतीने आणि प्रमाणामुळे भारतातील गतिशीलतेची व्याख्याच बदलली आहे”. त्यांनी कामांची पद्धतशीर आणि वेळेवर पूर्तता करण्याबद्दल सांगितले आणि लॉजिस्टिकमधील अडथळे दूर करण्यासाठीच्या पायऱ्यांवर प्रकाश टाकला. पीएम राष्ट्रीय गति शक्ती बृहत आराखडा देशातील एकात्मिक वाहतुकीला चालना देत आहे. विमान आणि जहाज भाडेतत्त्वावर देण्यासाठी गिफ्ट सिटी नियामक चौकट तयार करण्यात आली आहे. राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण लॉजिस्टिक्सच्या समस्या सोडवत आहे, असे ते म्हणाले. समर्पित मालवाहू कॉरिडॉर खर्च कमी करत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या तीन रेल्वे आर्थिक कॉरिडॉरमुळे देशातील वाहतूक सुलभता वाढेल.

व्यापाराला चालना देण्यात वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) आणि राज्यांच्या सीमेवरील तपासणी नाके रद्द करण्याच्या परिवर्तनीय प्रभावावरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. शिवाय, पंतप्रधान मोदींनी उद्योगात इंधन आणि वेळ या दोन्हींची बचत करण्यासाठी फास्ट-टॅग तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित केली. "फास्ट-टॅग तंत्रज्ञानामुळे उद्योगात इंधन आणि वेळेची बचत होत असल्याची," त्यांनी पुष्टी केली. अलीकडील अभ्यासाचा दाखला देत पंतप्रधानांनी नमूद केले की फास्ट-टॅग तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्थेला वार्षिक 40,000 कोटी रुपयांचा फायदा होत आहे.

"भारत आता जागतिक आर्थिक शक्तीस्थान बनण्याच्या उंबरठ्यावर आहे, वाहन उद्योग आणि वाहनाच्या सुट्या भागांचे उद्योग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत," पंतप्रधान मोदी म्हणाले. जागतिक ऑटोमोटिव्ह बाजारपेठेतील भारताचा दर्जा अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज भारत प्रवासी वाहनांसाठी जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि जागतिक स्तरावर व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या पहिल्या तीन देशांमध्ये आहे." तसेच, उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलाय) योजनेसारख्या उपक्रमांद्वारे विविध क्षेत्रांना पाठिंबा देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधान मोदींनी पुनरुच्चार केला. "उद्योगासाठी, सरकारने 25,000 कोटी रुपयांहून अधिकची उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले."

पंतप्रधान म्हणाले की राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी अभियान इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला चालना देत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी निर्माण करण्यासाठी सरकारने 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फेम योजनेमुळे राजधानीत तसेच इतर अनेक शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस सुरू झाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 1 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याबाबत सांगताना पंतप्रधान मोदींनी स्टार्टअप्सना देण्यात येणाऱ्या कर सवलतींचा आणखी विस्तार करण्याच्या निर्णयाचाही उल्लेख केला. “या निर्णयांमुळे वाहतूक क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील”, असे विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. ईव्ही उद्योगातील किंमत आणि बॅटरी या सर्वात महत्त्वाच्या आव्हानांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी या निधीचा वापर संशोधनात करण्याची शिफारस केली.

पंतप्रधान मोदींनी उद्योगांना बॅटरी उत्पादनासाठी भारतातील मुबलक कच्चा माल वापरणारे संशोधन मार्ग शोधण्यासाठी आणि हरित हायड्रोजन आणि इथेनॉल यांसारख्या क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित केले. "भारतात उपलब्ध कच्चा माल वापरून बॅटरी बनवण्यासाठी संशोधन का केले जात नाही? असा सवाल करताना त्यांनी वाहन उद्योग क्षेत्राने हरित हायड्रोजन आणि इथेनॉलमध्येही संशोधन करण्याची अपेक्षा व्यक्त केली."पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौवहन उद्योगामध्ये मिश्र प्रकारची जहाजे विकसित करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महत्त्व अधिक ठळकपणे सांगितले. “केंद्रीय नौवहन मंत्रालय  स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने मिश्र प्रकारची जहाजे उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे,” ते म्हणाले.स्टार्ट अप्स मुळे भारतातील ड्रोन क्षेत्र नवी भरारी घेत आहे याचा देखील उल्लेख करून त्यांनी ड्रोन क्षेत्रातील संशोधनासाठी निधींचा वापर करण्याची शिफारस केली. जलमार्गांच्या रूपाने वाहतुकीचा किफायतशीर मार्ग उदयाला आला आहे याकडे देखील त्यांनी निर्देश केला आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने मिश्र प्रकारची जहाजे उभारण्यासाठी केंद्रीय नौवहन मंत्रालयाने सुरु केलेल्या जोरदार प्रयत्नांची माहिती दिली.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना, मोबिलिटी अर्थात गतिमानता उद्योगामध्ये कार्यरत चालकांच्या संदर्भात मानवी पैलूकडे देखील उपस्थितांचे लक्ष वेधले. ट्रक चालकांना सहन करावे लागणारे त्रास त्यांनी ठळकपणे मांडले. “ट्रक चालक आणि त्यांच्या कुटुंबियांना वाटणारी चिंता सरकारला समजते आहे,” पंतप्रधान म्हणाले. देशातील प्रत्येक राष्ट्रीय महामार्गावर चालकांसाठी अन्न,स्वच्छ पेयजल, शौचालये, पार्किंगची तसेच आराम करण्याची उत्तम सुविधा इत्यादी सोयी असलेल्या आधुनिक इमारती उभारण्यासंदर्भातील नव्या योजनेवर सरकार काम करत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान पुढे म्हणाले की या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात देशभरात अशा प्रकारच्या 1000 इमारती उभारण्याच्या दृष्टीने सरकार तयारी करत आहे. या उपक्रमामुळे ट्रक आणि टॅक्सी या वाहनांच्या चालकांसाठी जीवनमानातील सुलभता आणि प्रवास करण्यातील सुलभता असे दोन्ही हेतू पूर्ण होण्यास मोठी चालना मिळेल, परिणामी चालकांचे आरोग्य सुधारेल तसेच अपघात रोखण्यास देखील मदत होईल.

मोबिलिटी क्षेत्रात येत्या 25 वर्षांत निर्माण होणाऱ्या अमर्याद शक्यतांवर अधिक भर देत, या शक्यतांचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी या उद्योगाने स्वतःत परिवर्तन घडवून आणावे असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.मोबिलिटी क्षेत्राला आवश्यक असणारे तांत्रिक कार्यबळ आणि प्रशिक्षित चालकांची गरज पूर्ण करण्यासाठी देशात 15 हजार आयटीआय संस्था कार्यरत असून या संस्था आजघडीला या क्षेत्राला लागणारे मनुष्यबळ पुरवत आहेत याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. या क्षेत्राने आयटीआय शिक्षण संस्थांशी सहयोगी संबंध प्रस्थापित करुन उद्योगाच्या स्वरूपाशी अधिक समर्पक ठरतील असे अभ्यासक्रम आखण्यासाठी या उद्योगातील आघाडीच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी केंद्र सरकारच्या स्क्रॅपेज पॉलिसीचा म्हणजेच टाकाऊ वाहने निकालात काढण्याविषयीच्या धोरणाचा उल्लेख केला.जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगच्या बदल्यात नव्या वाहनांना सरकारतर्फे रोड टॅक्समधून सूट देण्यात येते अशी माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधानांनी यावेळी बोलताना या प्रदर्शनाच्या- बियाँड बाउन्ड्रीज- ब्रीदवाक्याचा संदर्भ दिला आणि ते म्हणाले की या वाक्यातून भारताचे चैतन्य दिसून येते. “आज आपल्याला जुन्या बंधनांना तोडून टाकायचे आहे आणि संपूर्ण जगाला एकत्र आणायचे आहे. आपण जागतिक पुरवठा साखळीमधील भारताच्या भूमिकेचा विस्तार करू पाहतो आहोत. भारतातील वाहन उद्योगासमोर आता शक्यतांनी भरलेले आकाश आहे,” असे प्रतिपादन करून पंतप्रधानांनी सर्वांना अमृतकाळाच्या संकल्पनेसह पुढे वाटचाल करायच्या आणि भारताला जागतिक पातळीवरील प्रमुख देश बनवण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांचे सहकार्य घेऊन रबराच्या बाबतीत आयातीवर असलेले अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन त्यांनी टायर उद्योगाच्या नेत्यांना केले. देशातील शेतकऱ्यांवर असलेल्या विश्वासावर अधिक भर देत पंतप्रधानांनी एकात्मिक आणि सर्वांगीण दृष्टीकोन स्वीकारण्याचा सल्ला दिला. चौकटीच्या बाहेरचा विचार करण्याचे आणि एकमेकांच्या सहकार्याने विचार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. भारतात सर्व प्रकारचे प्रमुख संरचनाकार आहेत याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी स्वदेशी संरचनाकारांच्या क्षमतांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन या उद्योगातील व्यक्तींना केले. योगशास्त्राला मिळालेल्या जागतिक प्रतिसादाचे उदाहरण देऊन पंतप्रधान म्हणाले की ‘जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जग देखील तुमच्यावर विश्वास ठेवते. जिथे तुमची नजर जाईल तिथे तुम्ही तयार केलेली वाहने दिसली पाहिजेत असे सांगून पंतप्रधानांनी त्यांचे भाषण संपवले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी तसेच केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

50 हून अधिक देशांमधले 800 पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी झालेल्या सदर प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञाने, शाश्वत उपाययोजना आणि मोबिलिटी क्षेत्रातल्या नव्या घटकांवर अधिक भर दिलेला असेल. वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या 600 पेक्षा अधिक उत्पादकांसह 28 हून जास्त वाहन उत्पादक या प्रदर्शनात भाग घेत आहेत. या प्रदर्शनात  जागतिक पातळीवरील 13 बाजारपेठांतील 1000 पेक्षा जास्त ब्रँड त्यांची उत्पादने,विविध तंत्रज्ञाने आणि सेवा यांचे दर्शन घडवणार आहेत.

प्रदर्शन तसेच परिषदांच्या आयोजनासोबतच या प्रदर्शनादरम्यान विविध राज्यांसाठी राज्य सत्रे देखील आयोजित केली जाणार आहेत. मोबिलिटी क्षेत्रातल्या उपाययोजनांसाठी समावेशक दृष्टीकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रादेशिक योगदाने तसेच राष्ट्रीय आणि प्रादेशिक अशा दोन्ही पातळ्यांवर सहयोग शक्य करण्यासाठीचे उपक्रम यांचे सादरीकरण करण्याच्या उद्देशाने ही राज्य सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

***

S.Patil/R.Agashe/V.Joshi/S.Chitnis/P.Kor

*** 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2002109) Visitor Counter : 122