युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चेन्नईमध्ये खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 विजेत्यांना अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान


महाराष्ट्र, तामिळनाडू, हरियाणा अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानावर

Posted On: 31 JAN 2024 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2024

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी बुधवारी तामिळनाडूतील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 च्या समारोप समारंभात विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली.

या क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण 158 पदके (57 सुवर्ण, 48 रौप्य, 53 कांस्य) मिळवून अव्वल स्थान पटकावले, तर तामिळनाडूने  98 पदके (38 सुवर्ण, 21 रौप्य, 39 कांस्य) कमावून दुसरे आणि हरियाणाने 103 पदकांची (35 सुवर्ण, 22 रौप्य, 46 कांस्य) कमाई करत  तिसरे स्थान पटकावले. 

या क्रीडा स्पर्धेत एकूण 7234 जर सहभागी झाले होते. यामध्ये क्रीडापटू, तांत्रिक अधिकारी, स्वयंसेवक इत्यादींचा समावेश होता.

“प्रत्येक खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेगणिक आपल्या खेळांचा दर्जा उंचावत आहे, असे अनुराग सिंग ठाकूर यांनी सांगितले.  की 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 4454 युवा खेळाडूंनी 26 स्पर्धात्मक क्रीडा प्रकारात उत्साहाने आणि खिलाडूवृत्तीच्या अतुलनीय भावनेने सहभागी होऊन बाजी मारली, हे मी अत्यंत अभिमानाने नमूद करतो, असेही ते म्हणाले. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 2307 पुरुष क्रीडापटू आणि 2147 महिला  क्रीडापटू सहभागी झाले होते आणि त्यांचे प्रतिनिधित्व जवळपास समसमान होते, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

“भारत जगातील भावी क्रीडा महासत्ता बनेल असे स्वप्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिले आहे, आणि देशातली क्रीडा व्यवस्था दररोज ज्या प्रकारे विकसित होत आहे, तो याच परिवर्तनाचा दाखला आहे.” असेही ते म्हणाले.

या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत एकूण 30 विक्रम आणि राष्ट्रीय युवा विक्रम नोंदवण्यात आले आहेत. यात ॲथलेटिक्समध्ये 8 तर भारोत्तोलनात  22 विक्रम नोंदवले गेले आहेत.  

हरियाणाच्या खेळाडूंनी 7 तर महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी एकूण 6 विक्रम प्रस्थापित केले.

हरियाणाच्या संजनाने 76 किलो वजनी गटात 5 विक्रम स्थापित केले तर तामिळनाडूच्या कीर्तनाने 81 किलो वजनी गटात 3 विक्रम स्थापित केले. महाराष्ट्राच्या आरती तात्गुणीने 49 किलो वजनी गटात 3 विक्रम नोंदवले.

तेलंगणाची जलतरणपटू वृत्ती अग्रवाल या क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंपैकी एक बनली. तिने 200 मीटर बटरफ्लाय, 1500 मीटर फ्रीस्टाईल, 800 मीटर फ्रीस्टाईल, 400 मीटर फ्रीस्टाईल आणि 200 मीटर फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात एकूण 5 सुवर्णपदके कमावली. 

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेमधील सर्वात उल्लेखनीय घटकांपैकी एक म्हणजे अत्यंत प्रतिकूल पार्श्वभूमीतून व्यासपीठावर पोहोलेल्या खेळाडूंच्या यशाच्या विविध कथा.  त्यातील काही कथांचा उल्लेख करताना ठाकूर म्हणाले, “आसामच्या पंचमी सोनोवालने 49 किलो वजनी गटात तब्बल तीन राष्ट्रीय युवा विक्रम मोडीत काढले. पंचमी आसाममधील एका चहा विक्रेत्याची मुलगी आहे.”

“तसेच, देशातील काही लहान शहरांमध्ये तर फार कमी पायाभूत सुविधा आढळतात, मात्र आता इथून पुढे, भारतीय क्रीडा प्राधिकरण त्यांची संपूर्ण काळजी घेईल” , असे त्यांनी सांगितले. “बिहारच्या दुर्गा सिंगने 1500 मीटर स्पर्धेतील विक्रम मोडला. बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील बेलवा ठकुरई या  दुर्गम गावातल्या शेताच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेत ती धावायची. खेळाची अत्यल्प पार्श्वभूमी असलेल्या भागात, दुर्गाचे वडील शेतकरी, शंभू शरण सिंग हे तिला प्रोत्साहन देणारे एकमेव व्यक्ती होते.”

“ओदिशाच्या दुर्गम गावातल्या गरीब कुटुंबातून आलेल्या भारोत्तोलक ज्योश्ना साबर हिने राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. वडील छोटे शेतकरी  आणि आई गृहिणी असलेल्या गरीब कुटुंबातील ही 15 वर्षांची मुलगी भारतातील आघाडीच्या कनिष्ठ भारोत्तोलकांपैकी एक बनली आहे. गेल्या वर्षी अल्बानिया येथे झालेल्या जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर तिने 40 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत  राष्ट्रीय स्नॅच विक्रम मोडीत काढला.

“अशा स्पर्धांमधून समोर आलेल्या या कथा केवळ शर्यतीतील विजयापुरत्या मर्यादित नव्हत्या. प्रत्येक खेळाडूची स्वतःची एक गोष्ट होती आणि प्रतिभेला सीमा नसतात याची आपल्याला प्रकर्षाने आठवण करून दिली” असे अनुराग सिंग ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या स्पर्धांमध्ये प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेले तिरंदाज अदिती गोपीचंद स्वामीपासून ते भारोत्तोलक एल.  धनुष पर्यंत 23 नामवंत खेळाडूही उपस्थित होते. अदितीने गेल्या वर्षी हँगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत एका सुवर्णपदकासह  दोन पदके जिंकली होती, तर तामिळनाडूच्या धनुषने गेल्या वर्षी अल्बेनियातील ड्युरेस येथे झालेल्या आयडब्ल्यूएफ  जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.

“तमिळनाडूमधील खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या गेल्या 13 दिवसांमध्ये आपण जे पाहिले त्याबद्दल मला प्रचंड अभिमान आणि आशावाद वाटतो. ही स्पर्धा  आपल्या युवकांच्या  प्रतिभा, समर्पण आणि अदम्य इच्छाशक्तीचे अभिमानस्पद उदाहरण  आहे. खेळाडूंचा  पराक्रम, खिलाडूवृत्ती आणि मैत्रीही मी पाहिली आहे आणि त्यातून मला खूप प्रेरणा मिळाली,” असे ते म्हणाले.

बुधवारी झालेल्या भव्य कार्यक्रमाला खासदार (मध्य चेन्नई) दयानिधी मारन  आणि तामिळनाडूचे युवा कल्याण  आणि क्रीडा विकास मंत्री  उदयनिधी स्टॅलिन, उपस्थित होते.

 

* * *

R.Aghor/Shraddha/Sushma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2001011)