रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
मध्य प्रदेशातील 2,367 कोटी रुपये खर्चाच्या 9 महामार्ग प्रकल्पांचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
30 JAN 2024 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 30 जानेवारी 2024
उत्तम रस्ते संपर्क प्रदान करून मध्य प्रदेशच्या प्रगतीला नवी गती देत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मध्य प्रदेशात जबलपूर येथे 2,367 कोटी रुपये खर्चाच्या आणि एकूण 225 किलोमीटर लांबीच्या 9 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणी केली. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव, केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार, केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते, मध्य प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा, राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, राज्यमंत्री राकेश सिंह, खासदार-आमदार, अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आज उदघाटन झालेल्या प्रकलपांमध्ये टिकमगड-झाशी मार्गावरील जामनी नदीवर 43 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 1.5 किमी लांबीच्या पुलाचा समावेश आहे. यामुळे ओरछा येथील राजाराम मंदिर या पर्यटन स्थळी पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. चांदिया घाट ते कटनी बायपास पर्यंत पक्क्या दुपदरी रस्त्याच्या बांधकामामुळे कटनी येथील कोळसा खाणींपर्यंतच्या कनेक्टिव्हिटी अर्थात संपर्कयंत्रणेत दर्जेदार बदल होईल. याचा लाभ कोळसा खाण उद्योगाला होईल. बमिठा-खजुराहो रस्त्याच्या रुंदीकरणामुळे खजुराहो येथील पर्यटनाला चालना मिळेल. याशिवाय या भागातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत देखील सुधारणा होईल.
ज्या प्रकल्पांची आज पायाभरणी करण्यात आली त्यात गुलगंज बायपास ते बारणा नदीपर्यंतच्या रस्त्याचे उन्नतीकरण, बर्णा नदी ते केन नदीपर्यंत दुपदरी रस्त्याचे उन्नतीकरण, शहडोल ते सागरटोला, ललितपूर-सागरपर्यंत पक्क्या दुपदरी रस्त्याचे उन्नतीकरण या कामांचा समावेश आहे.
लखनादोन विभागात एकूण 23 भूमिगत मार्ग, पूल, सेवा रस्त्यांचे बांधकाम, सुक्त्रा, कुरई आणि खवासा येथे एकूण 3 फूट ओव्हर ब्रिजचे बांधकाम आणि घुनई आणि बंजारी खोऱ्यातील 2 अपघात प्रवण ठिकाणांमध्ये योग्य ती सुधारणा करण्याचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे या परिसराची कनेक्टिव्हिटी सुधारेल. तसेच वेळ आणि इंधनाची बचत होऊन परिसराचा आर्थिक, सामाजिक त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास होईल.
R.Aghor/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2000661)
Visitor Counter : 80