पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(109 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
Posted On:
28 JAN 2024 11:46AM by PIB Mumbai
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! 2024 मधील हा पहिला ‘मन की बात’ चा कार्यक्रम आहे. अमृतकालामध्ये एक नवा उत्साह, (आनंदाची, जल्लोषाची) नवी लाट जाणवते आहे. आपण सर्व देशवासीयांनी, दोन दिवसांपूर्वी, 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. या वर्षी आपल्या राज्यघटनेलाही 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयालाही 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या लोकशाहीचे हे सण, उत्सव, लोकशाहीची जननी म्हणून, भारताला अधिक बळकट करतात. इतके गहन विचारमंथन करून भारतीय संविधान,(भारताची घटना) तयार केली गेली आहे की तिला जिवंत दस्तावेज असे म्हणतात. या राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये , तिसऱ्या प्रकरणात भारतातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे वर्णन करण्यात आले असून, हे खूपच लक्षणीय आहे की आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांनी त्या तिसऱ्या प्रकरणाच्या सुरुवातीला भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मणजींच्या चित्रांना स्थान दिले आहे. प्रभू रामाचे राज्य आपल्या संविधानाच्या निर्मात्यांसाठीही प्रेरणेचा स्त्रोत होते आणि म्हणूनच 22 जानेवारीला अयोध्येत बोलताना मी देव ते देश, राम ते राष्ट्र; या विषयावर बोललो होतो.
मित्रांनो, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामूळे देशातील कोट्यावधी लोक एका धाग्याने बांधले गेले आहेत असे दिसते आहे. सर्वांची भावना एक, सर्वांची भक्ती एक, सर्वांच्या बोलण्यात राम, सर्वांच्या हृदयात राम आहे.
यावेळी देशातील अनेकांनी राम भजने गाउन श्री रामाच्या चरणी समर्पित केली. 22 जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशाने रामज्योती लावून दिवाळी साजरी केली. या काळात, देशाने सामूहिकतेमधील शक्ती पाहिली. ही सामूहिकतेची शक्ती आपल्या विकसित भारतासाठी केलेल्या संकल्पांचादेखील एक प्रमुख आधार आहे. मी देशवासियांना, मकर संक्रांती ते 22 जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्याची विनंती केली होती. हे ऐकून मला आनंद झाला की लाखो लोक ह्या अभियानात भक्तीभावाने सहभागी झाले आणि त्यांनी आपापल्या परिसरातील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली. अनेक लोकांनी मला यासंबंधीची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवले आहेत. ही भावना, ही इच्छा कधीच संपू नये, ही मोहीम थांबू नये. सामूहिकतेची हीच शक्ती आपल्या देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, यावेळची 26 जानेवारीची परेड फारच अद्भूत (अप्रतिम) होती, पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती परेडमधील स्त्री शक्तीची, जेव्हा केंद्रीय सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिस दलातील महिलांच्या तुकड्या कर्तव्य पथावर कदम ताल ( संचलन ) करू लागल्या, तेव्हा सर्वाना खूप अभिमान वाटला. महिलांचे घोष पथकासहित संचलन पाहून आणि त्यांचा जबरदस्त समन्वय पाहून देश-विदेशातील लोकांमध्ये जोश आणि उत्साह संचारला. या वेळी परेडमध्ये भाग घेतलेल्या 20 पथकांपैकी 11 पथके तर केवळ महिलांचीच होती. आपण पाहिले की शोभायात्रेत / चित्ररथात देखील सर्व महिला कलाकार होत्या. जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्यात सुमारे दीड हजार मुली सहभागी झाल्या होत्या. अनेक महिला कलाकार शंख, नादस्वरम आणि नगारा ही भारतीय संगीत वाद्ये वाजवत होत्या. डीआरडीओच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जल, भूमी , आकाश, सायबर आणि अवकाश या प्रत्येक क्षेत्रात महिला शक्ती देशाचे रक्षण कसे करत आहे हे ह्या चित्ररथाच्या देखाव्यात सादर केले होते. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा मंत्र घेऊन 21व्या शतकातील भारत प्रगतीपथावर जात आहे.
मित्रांनो, तुम्ही काही दिवसांपूर्वीच अर्जुन पुरस्कार समारंभ पाहिला असेल. या समारंभात, देशातील अनेक होतकरू खेळाडू आणि ऍथलेट्स ना राष्ट्रपती भवनात सन्मानित करण्यात आले. इथेही ज्या एका गोष्टीने लोकांचे लक्ष वेधून घेतले ती होती, अर्जुन पुरस्कार मिळालेल्या मुली आणि त्यांची जीवनयात्रा.
यावेळी 13 महिला खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या महिला खेळाडूंनी जगभरातील अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि विजयश्री खेचून आणून भारताचा झेंडा फडकवला. शारीरिक आणि आर्थिक आव्हाने या धाडसी आणि प्रतिभावान खेळाडूंना अडवू शकली नाहीत. बदलत्या भारतात आपल्या मुली आणि देशातील महिला प्रत्येक क्षेत्रात लक्षवेधक कामगिरी करुन दाखवत आहेत.
जिथे महिलांनी आपला झेंडा फडकावला आहे असे आणखी एक क्षेत्र म्हणजे बचत गट. आज देशातील महिला बचत गटांची संख्याही वाढली आहे आणि त्यांच्या कार्यक्षेत्राचा देखील खूप विस्तार झाला आहे. तो दिवस आता दूर नाही जेव्हा तुम्हाला गावा गावातील शेतांमध्ये नमो ड्रोन दीदी, ड्रोनच्या माध्यमातून शेतीच्या कामांमध्ये मदत करताना दिसतील.
उत्तर प्रदेशातील बहराइच येथे स्थानिक घटकांचा वापर करून जैविक खाते - बायो-फर्टिलायझर आणि जैव- कीटकनाशके तयार करणाऱ्या महिलांविषयी मला माहिती मिळाली. निबिया बेगमपूर गावातील बचत गटांतील महिला, गायीचे शेण, कडुलिंबाची पाने आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींचे मिश्रण करून जैविक खत तयार करतात. त्याचप्रमाणे या महिला आले, लसूण, कांदा, मिरची ह्यांचे वाटण करून, सेंद्रिय कीटकनाशकही तयार करतात. या महिलांनी एकत्र येऊन ‘उन्नती बायोलॉजिकल युनिट’ नावाची संस्था स्थापन केली आहे. ही संस्था या महिलांना जैविक उत्पादने तयार करण्यात मदत करते. त्यांनी बनवलेल्या जैविक -खते आणि सैन्द्रिय कीटकनाशकांना असलेली मागणीही सातत्याने वाढत आहे. आज आसपासच्या गावातील ६ हजारांहून अधिक शेतकरी त्यांच्याकडून जैविक उत्पादने खरेदी करत आहेत. त्यामुळे बचतगटांतील महिलांचे उत्पन्न वाढले असून, त्यांची आर्थिक स्थितीही सुधारली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये आपण अशा देशबांधवांच्या प्रयत्नांना देशासमोर आणतो, जे समाज आणि देश बळकट करण्यासाठी नि:स्वार्थपणे काम करत असतात. नुकतीच, तीन दिवसांपूर्वी देशातील पद्म पुरस्कारांची घोषणा केली गेली आहे, तेव्हा मन की बात मध्ये अशा लोकांची चर्चा होणे स्वाभाविक आहे.
यावेळीही अशा अनेक देशवासीयांना पद्म सन्मान देण्यात आला आहे, ज्यांनी स्वतःला तळागाळातील लोकांशी जोडून घेऊन, समाजात मोठे, हितकारक बदल घडवून आणण्याचे काम केले आहे. या प्रेरणादायी लोकांच्या आयुष्या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता देशभरात निर्माण झाली आहे. प्रसारमाध्यमांमधील प्रसिद्धीपासून दूर, वर्तमानपत्रांच्या मथळ्यांपासून, बातम्यांपासून दूर राहिलेले हे लोक कोणत्याही प्रसिद्धीची, प्रकाशझोताची अपेक्षा न करता समाजाची सेवा करण्यात मग्न होते. याआधी, या लोकांबद्दल आपण क्वचितच काही वाचलेले किंवा ऐकलेले असेल, पण मला आनंद होतो आहे की आता , पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशा लोकांची सर्वत्र चर्चा होत आहे, लोक त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
पद्म पुरस्कार मिळालेल्यांपैकी बहुतेक जण आपापल्या क्षेत्रात अतिशय विलक्षण काम करीत आहेत. कुणी रुग्णवाहिका सेवा पुरवत आहे, तर कुणी निराधारांच्या डोक्यावर छप्पर असावे म्हणून व्यवस्था करत आहे. असेही काही आहेत जे हजारो झाडे लावून निसर्ग संवर्धनाच्या प्रयत्नात मग्न आहेत. एकजण असेही आहेत जे तांदुळाच्या 650 हून अधिक जातींच्या, वाणांच्या जतन आणि संवर्धनासाठी काम करीत आहेत. एकजण असेही आहेत जे अमली द्रव्ये आणि दारूमुळे येणारी व्यसनाधीनता रोखण्यासाठी समाजात जनजागृती करत आहेत.
अनेक जण, लोकांना बचत गटांशी जोडण्यात गुंतलेले आहेत, विशेषत: स्त्री शक्ती अभियान चालवून महिला बचतगटांसाठी प्रयत्न करत आहेत. ह्या पुरस्कार विजेत्यांमध्ये 30 महिलांचा समावेश असल्याने देशवासीयांनाही खूप आनंद झाला आहे. या महिला अगदी प्राथमिक स्तरावरील, तळागाळातील आपल्या कार्यातून समाज आणि देशाला प्रगती पथावर नेत आहेत.
मित्रांनो, पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी प्रत्येकाचेच योगदान देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे. या वेळी सन्मान प्राप्त करणाऱ्यांमध्ये, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत, लोकनृत्य, नाट्य आणि भजन ह्या क्षेत्रांत देशाचे नाव मोठे करणाऱ्यांचा बहुसंख्येने समावेश आहे. प्राकृत, माळवी आणि लंबाडी भाषांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांनाही हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. ज्यांचे कार्य भारतीय संस्कृती आणि परंपरेला गौरवाचे स्थान प्राप्त करून देत आहे अशा विदेशातील अनेकजणांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये फ्रान्स, तैवान,मेक्सिको आणि बांगलादेशच्या नागरिकांचाही समावेश आहे.
मित्रांनो, मला खूप आनंद होत आहे की गेल्या दशकात पद्म पुरस्कारांची व्यवस्था/ (रचना) पूर्णपणे बदलली आहे. आता ते लोकपद्म झाले आहे.पद्म पुरस्कार देण्याच्या पद्धतीतही अनेक बदल झाले आहेत. आता लोकांना पुरस्कारासाठी स्वतःचे नाव सुचविण्याची संधी मिळत आहे. यामुळेच 2014 च्या तुलनेत यावेळी 28 पट अधिक नामांकन आलेले आहेत. यावरून दिसून येते की पद्म पुरस्काराची प्रतिष्ठा, त्याची विश्वासार्हता आणि आदर दरवर्षी वाढत आहे. पद्म पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, असे म्हणतात की प्रत्येक जीवनाचे एक ध्येय असते, ते ध्येय पूर्ण करण्यासाठीच प्रत्येकाचा जन्म झालेला असतो. यासाठी लोक निष्ठापूर्वक आपले कर्तव्य बजावतात. आपण पाहिले आहे की, काही लोक समाजसेवेच्या माध्यमातून, कोणी सैन्यात भरती होऊन, कोणी पुढच्या पिढीला शिक्षण देऊन, आपले कर्तव्य पार पाडतात. पण मित्रांनो, आपल्यामध्ये अशीही काही माणसे आहेत जी आयुष्य संपल्यानंतरही समाजाविषयीचे आपले कर्तव्य पार पाडत असतात. आणि त्यासाठी त्यांचे माध्यम अवयवदान हे आहे.
गेल्या काही काळात, देशात एक हजाराहून अधिक लोकांनी मृत्यूनंतर त्यांचे अवयव दान केलेले आहे. हा निर्णय सोपा नसतोच, पण ह्या निर्णयामुळे अनेकांचे प्राण वाचतात. ज्यांनी आपल्या प्रियजनांच्या शेवटच्या इच्छेचा मान राखला त्या कुटुंबांचेही मी कौतुक करेन. आज देशातील अनेक संस्था संघटना या दिशेने खूप प्रेरणादायी प्रयत्न करत आहेत. काही संस्था अवयवदानाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहेत, तर काही संस्था अवयवदान करण्यास इच्छुक लोकांची नोंदणी करण्यासाठी मदत करत आहेत. अशा प्रयत्नांमुळे अवयवदानाबाबत देशात सकारात्मक वातावरण निर्माण होत असून अनेक लोकांचे प्राणही वाचत आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता मी तुम्हाला भारताची एक अशी उपलब्धी सांगतो, ज्यामुळे रुग्णांचे जीवन सोपे होईल आणि त्यांच्या समस्या कमी होतील. तुमच्यापैकी असे अनेक लोक असतील, जे आपल्या उपचारासाठी आयुर्वेद, सिद्ध किंवा युनानी पद्धतीची मदत घेतात. पण त्याच पद्धतीच्या इतर डॉक्टरांकडे गेल्यावर रुग्णांपुढे अडचणी निर्माण होतात. या वैद्यकीय प्रणालींमध्ये रोग, उपचार आणि औषधांच्या नावांसाठी समान भाषा वापरली जात नाही. प्रत्येक डॉक्टर रोगाचे नाव आणि उपचारांच्या पद्धतीतील बारकावे त्याच्या स्वत: च्या पद्धतीने लिहितो. काहीवेळा ते इतर डॉक्टरांना समजणे फार कठीण होऊन जाते. पण अनेक दशकांपासून त्रस्त करणाऱ्या या समस्येवर आता उपाय सापडला आहे. मला सांगायला आनंद होत आहे की आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी औषधांशी संबंधित माहिती आणि शब्दावलीचे वर्गीकरण केले आहे.
या कोडिंगच्या मदतीने आता सर्व डॉक्टरांना प्रिस्क्रीप्शन म्हणजेच आपल्या औषधं लिहून देण्याच्या चिठ्ठीवर एकसमान भाषेत लिहिणं शक्य होईल. याचा एक फायदा असा होईल की, जर तुम्ही ती चिठ्ठी घेवून दुस-या डॉक्टरांकडे गेलात तर त्या डॉक्टरांनाही पूर्ण माहिती त्या चिठ्ठीवरूनच समजू शकेल. तुमचा आजार, त्यावर केलेले उपचार, कोण-कोणती औषधं सुरू आहेत, किती दिवसांपासून औषधोपचार सुरू आहेत, तुम्हाला कोणत्या गोष्टींची अॅलर्जी आहे, अशी सर्व माहिती त्या चिठ्ठीच्या मदतीने मिळू शकेल. याचा आणखी एक फायदा म्हणजे, जे लोक संशोधनाचं काम करत आहेत, त्या लोकांनाही होईल, इतर देशांतील संशोधकांनाही आजार, औषधे, त्यांचा प्रभाव यांची सविस्तर माहिती मिळू शकेल. संशोधन वाढल्यामुळे आणि अनेक संशोधक यामध्ये जोडले जावू शकत असल्यामुळे ही औषधोपचार पद्धती आणखी चांगले परिणाम देवू शकेल आणि अधिकाधिक लोकांचा या उपचार पद्धतीकडे कल झुकेल. मला विश्वास आहे, या आयुष पद्धतींशी जोडले गेलेले आमचे उपचार तज्ज्ञ, वैद्य, याचे अभ्यासक या कोडिंग पद्धतीचा लवकरात लवकर स्वीकार करून प्रत्यक्षात वापर सुरू करतील.
माझ्या मित्रांनो, आत्ता आयुष औषधोपचार पद्धतीविषयी बोलत असताना, माझ्या डोळ्यापुढे यानुंग जामोह लैगोकी यांची प्रतिमा येत आहे. श्रीमती यानुंग अरूणाचल प्रदेशात वास्तव्य करीत आहेत आणि त्या हर्बल औषधांमध्ये विशेषज्ञ आहेत. त्यांनी आदिवासी, जनजातीच्या पारंपरिक औषधोपचार प्रणालीला पुनर्जीवित करण्यासाठी खूप मोठे कार्य केले आहे. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना यावर्षी पद्म पुरस्कारही दिला गेला आहे.
याचप्रमाणे यंदा छत्तीसगढचे हेमचंद मांझी यांनाही पद्म पुरस्कार मिळाला आहे. वैद्यराज हेमचंद मांझी हे सुद्धा आयुष औषधोपचार पद्धतीच्या मदतीने लोकांवर उपचार करतात. छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये पाच दशकांपेक्षाही जास्त काळापासून ते गरीब रूग्णांची सेवा करीत आहेत. आपल्या देशामध्ये आयुर्वेद आणि हर्बल औषधांचे जे प्रचंड भांडार आहे, त्याच्या संरक्षणाच्या कामामध्ये श्रीमती यानुंग आणि हेमचंद यांच्यासारख्या लोकांची खूप मोठी भूमिका आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ च्या माध्यमातून आपलं म्हणजे तुम्हां सर्वांचं आणि माझं जे नातं तयार झालं आहे, त्याला आता एक दशक झालं आहे. समाज माध्यमांच्या आणि इंटरनेटच्या या काळामध्येही रेडिओ हे संपूर्ण देशाला जोडणारे एक सशक्त माध्यम आहे. रेडिओची ताकद किती मोठे परिवर्तन घडवून आणू शकते, याचं एक अनोखं उदाहरण छत्तीसगडमध्ये पहायला मिळत आहे. गेल्या जवळपास 7 वर्षांपासूनच इथं रेडिओवर एका लोकप्रिय कार्यक्रमाचं प्रसारण होत आहे. त्याचं नाव आहे,‘‘ हमर हाथी- हमर गोठ’ कार्यक्रमाचं..नाव ऐकून तुम्हाला वाटू शकतं की, रेडिओ आणि हत्ती यांचा काय बरं संबंध असू शकतो? मात्र हीच तर रेडिओची खुबी आहे. छत्तीसगडमध्ये आकाशवाणीच्या अंबिकापूर, रायपूर, बिलासपूर आणि रायगढ या चार केंद्रांवरून दररोज सायंकाळी या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जातं. आणि तुम्हाला माहिती ऐकून नवल वाटेल, छत्तीसगडच्या जंगल आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारी मंडळी अतिशय लक्षपूर्वक हा कार्यक्रम ऐकतात. ‘हमर हाथी-हमर गोठ’ कार्यक्रमामध्ये सांगण्यात येत की, हत्तींचा कळप, जंगलाच्या कोणत्या भागातून वाटचाल करीत आहे. ही माहिती इथं वास्तव्य करणा-या लोकांना अतिशय उपयोगी ठरते. लोकांना रेडिओच्या माध्यमातून हत्तींचा कळप येणार असल्याची माहिती मिळते, त्यामुळे ते सावध होतात. ज्या मार्गावरून हत्ती जाणार असतात, त्या भागात जाणं टाळता येतं. यामुळे संभाव्य धोकाही टाळता येतो. यामुळे एकीकडे हत्तींच्या कळपामुळे होणा-या नुकसानाची शक्यता कमी होत आहे. त्याचबरोबर हत्तींविषयी सर्व डेटा म्हणजे माहिती जमा करण्यासाठी मदत मिळत आहे. या डेटाचा उपयोग भविष्यात हत्तींच्या संरक्षणासाठी करणं शक्य होणार आहे. इथं हत्तींविषयी मिळणारी सर्व माहिती समाज माध्यमांच्या मदतीनं लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. यामुळे जंगलाच्या परिसरात वास्तव्य करणा-या लोकांना हत्तींच्या वेळांबरोबर समन्वय साधणं आता सुकर बनलं आहे. छत्तीसगडच्या या अनोख्या उपक्रमाचा आणि त्यामुळे आलेल्या अनुभवांचा लाभ देशातल्या इतर वनक्षेत्रांमध्ये राहणा-या लोकांना घेता येवू शकेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, यंदाच्या 25 जानेवारीला आपण सर्वांनी ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा केला. हा आपल्या गौरवाशाली लोकशाही परंपरेसाठी एक महत्वाचा दिवस आहे. आज देशामध्ये जवळपास 96 कोटी मतदार आहेत. तुम्हाला ठावूक आहे, हा आकडा किती मोठा आहे? हा आकडा अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जवळपास तिप्पट आहे. ही संख्या युरोपच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास दीडपट आहे. जर मतदान केंद्रांविषयी बोलायचं झालं तर, देशामध्ये आज त्यांची संख्या जवळपास साडेदहा लाख आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकाला लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा उपयोग करता यावा, यासाठी ज्या ठिकाणी केवळ एक मतदार आहे, अशाही ठिकाणी आपल्या निवडणूक आयोगाकडून मतदानाचे केंद्र तयार केलं जातं. देशामध्ये लोकशाहीची मूल्यं बळकट करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणा-या निवडणूक आयोगाचं मी कौतुक करतो.
मित्रांनो, आज देशासाठी उत्साहाची गोष्ट अशीही आहे की, जगातील अनेक देशांमध्ये जिथं मतदानाची टक्केवारी कमी होत आहे, त्या काळात भारतामध्ये मतदानाची टक्केवारी वाढत आहे. 1951-52 मध्ये ज्यावेळी देशामध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या, त्यावेळी जवळपास 45 टक्के मतदारांनीच मतदान केलं होतं. आज हा आकडा खूप वाढला आहे. देशामध्ये फक्त मतदारांची संख्याच वाढली नाही तर ‘टर्नआउट’ही वाढला आहे. आपल्या युवा मतदारांना मतदार सूचीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी अधिक संधी मिळावी, यासाठी सरकारने कायद्यामध्ये परिवर्तन केलं आहे. मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सामुदायिक स्तरावरही प्रयत्न केले जात आहेत, हे पाहूनही मला चांगलं वाटतं. काही ठिकाणी लोक घरांघरांमध्ये जावून मतदानाविषयी माहिती देत आहेत. तर काही ठिकाणी पेंटिंग बनवून,तसंच काही ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून युवकांना आकर्षित केलं जात आहे. अशा प्रकारच्या प्रत्येक प्रयत्नांमुळे, आपल्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये वेगवेगळे रंग भरले जात आहेत.
मी ‘मन की बात’ च्या माध्यमातून आपल्या फर्स्ट टाइम व्होटर्सना म्हणजेच पहिल्यांदा मतदानासाठी पात्र ठरणा-या युवा मतदारांना सांगू इच्छितो की, मतदार यादीमध्ये आपलं नाव जरूर नोंदवावं. ‘नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल’ आणि ‘व्होटर हेल्पलाइन अॅप’ च्या माध्यमातून तुम्ही अगदी सहजतेनं हे काम ऑनलाइन करू शकता. तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी,तुमचं एक मत, देशाचं भाग्य बदलू शकतं. देशाचं भाग्य घडवू शकतं.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 28 जानेवारी, भारताच्या दोन अशा महान व्यक्तित्वांच्या जयंतीचा हा दिवस आहे की, ज्यांनी वेग-वेगळ्या कालखंडामध्ये देशभक्तीचा आदर्श घालून दिला आहे. आज देश, पंजाब केसरी, लाला लजपतराय यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे. लाला जी, स्वातंत्र्य संग्रामातील असे सेनानी होते, ज्यांनी विदेशी सत्तेपासून देशाला मुक्ती मिळावी यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. लाला जी, यांच्या व्यक्तिमत्वाला फक्त स्वातंत्र्याच्या लढ्यापुरतंच मर्यादित ठेवता येवू शकत नाही. ते खूप दूरदर्शी होते. त्यांनी पंजाब नॅशनल बॅंक आणि इतर अनेक संस्थांच्या उभारणीमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांचा उद्देश फक्त विदेशींना देशाबाहेर घालवणे हाच नव्हता, तर देशाला आर्थिकदृष्टीने बळकट करण्याची त्यांची दूरदृष्टी होती. याविषयी त्यांनी केलेलं चिंतन महत्वाचं होतं. त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या बलिदानानं भगत सिंह यांना खूप प्रभावित केलं होतं.
फिल्ड मार्शल के.एम.करियप्पा जी यांनाही श्रद्धापूर्वक वंदन करण्याचा आजचा दिवस आहे. त्यांनी इतिहासातील महत्वपूर्ण काळात आपल्या लष्कराचं नेतृत्व करून साहस आणि शौर्य यांचा सर्वोत्तम आदर्श घालून दिला.आपल्या लष्कराला शक्तिशाली बनविण्यामध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज क्रीडा क्षेत्रामध्ये भारत नित्य नवीन उंची गाठत आहे. क्रीडा जगतामध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे ते, खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळण्याची आणि देशांमध्ये अनेक ठिकाणी क्रीडा स्पर्धांचं आयोजन होण्याची! याचाच विचार करून आज भारतामध्ये नव-नवीन क्रीडा सामने आयोजित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी चेन्नईमध्ये ‘खेलो इंडिया यूथ’ स्पर्धांचे उद्घाटन झालं. यामध्ये देशभरातून पाच हजारांपेक्षा जास्त क्रीडापटू सहभागी झाले आहेत. मला आनंद वाटतो की, आज भारतामध्ये सातत्यानं असे नवीन मंच तयार होत आहेत. त्यामध्ये क्रीडापटूंना आपलं सामर्थ्य दाखवण्याच्या संधी मिळत आहेत. असाच एक मंच तयार झाला आहे तो म्हणजे -बीच गेम्स! या खेळांचं आयोजन दीवमध्ये झालं होतं.तुम्हाला माहितीच असेल, दीव एक केंद्रशासित प्रदेश आहे. सोमनाथच्या अगदी जवळ आहे. यावर्षाच्या प्रारंभीच दीवमध्ये या बीच गेम्सचं आयोजन केलं होतं. हे भारताचं पहिलं ‘मल्टी-स्पोर्टस् बीच गेम्स’चं आयोजन होतं. यामध्ये टग ऑफ वॉर, सी स्विमिंग, पेनकॅकसिलट, मल्लखांब, बीच व्हॉलिबॉल, बीच कबड्डी, बीच सॉकर आणि बीच बॉक्सिंग यांच्या स्पर्धा झाल्या. यामध्ये प्रत्येक खेळाडू स्पर्धकाला आपली प्रतिभा दाखवण्याची चांगली संधी मिळाली. आणि तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, या स्पर्धांमध्ये अशा राज्यांतूनही अनेक खेळाडू आले होते, की ज्यांचा समुद्राबरोबर दूरदूरचाही संबंध नाही. या स्पर्धांमध्ये सर्वात जास्त पदकं मध्य प्रदेशानं जिंकली. या राज्यात कुठंही समुद्र, सागरी किनारा, बीच नाही. खेळांच्या विषयी इतका उत्साह, अशी भावना कोणत्याही देशाला क्रीडा जगतामध्ये सर्वोच्च स्थान मिळवून देवू शकते.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’मध्ये यावेळी इतकंच!! फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा आपल्याबरोबर संवाद साधला जाईल. देशातील लोकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे,व्यक्तिगत प्रयत्नांमुळे , देश कशारितीने पुढे जात आहे, यावर आपलं लक्ष्य केंद्रीत असेल. मित्रांनो, उद्या 29 तारीख आहे. सकाळी 11 वाजता आपण ‘परीक्षा पे चर्चा‘‘ ही करणार आहोत. ‘परीक्षा पे चर्चा’’ या कार्यक्रमाची ही सातवी आवृत्ती असणार आहे. हा एक असा कार्यक्रम आहे की, त्याची मी नेहमीच वाट पाहत असतो. या कार्यक्रमामुळे मला विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळते. आणि मी त्यांच्यावर परीक्षेविषयी असणारा तणाव कमी करण्याचाही प्रयत्न करीत असतो. गेल्या 7 वर्षांपासून ‘परीक्षा पे चर्चा’, हे शिक्षण आणि परीक्षा यासंबंधी, अनेक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी एक खूप चांगलं माध्यम बनलं आहे. मला आनंद वाटतो की, यावेळी सव्वा दोन कोटींपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नावनोंदणी केली आहे. आणि आपले योगदान ही दिलं आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो की, ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा 2018 मध्ये हा कार्यक्रम सुरू केला होता, त्यावेळी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांचा आकडा फक्त 22,000 होता. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि परीक्षेच्या तणावाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक अभिनव प्रयत्न करण्यात आले आहेत. मी तुम्हा सर्वांना, विशेषतः युवकांना, विद्यार्थ्यांना विनंती करतो की, त्यांनी उद्या विक्रमी संख्येनं या कार्यक्रमात सहभागी व्हावे. मलाही तुमच्याबरोबर संवाद साधताना खूप छान वाटेल. याच शब्दांबरोबर मी ‘मन की बात’ च्या या भागात आपला निरोप घेतो. लवकरच पुन्हा भेटूया ! धन्यवाद !!
***
S.Tupe/AIR/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2000185)
Visitor Counter : 201
Read this release in:
Gujarati
,
Kannada
,
Telugu
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Malayalam