भारतीय निवडणूक आयोग
14 वा राष्ट्रीय मतदार दिन (एन. व्ही. डी.) 25 जानेवारी 2024 रोजी साजरा केला जाणार
या दिवसानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जाणार एन. व्ही. डी. पुरस्कार
भारतीय निवडणूक आयोग साजरे करत आहे राष्ट्रसेवेचे 75 वे वर्ष
Posted On:
24 JAN 2024 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2024
भारतीय निवडणूक आयोग 25 जानेवारी 2024 रोजी 14 वा राष्ट्रीय मतदार दिन (एन. व्ही. डी.) साजरा करत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय कायदे आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
मालदीव, फिलीपिन्स, रशिया, श्रीलंका आणि उझबेकिस्तान आदी निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे प्रमुख आणि प्रतिनिधी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मतदारांना समर्पित, एन. व्ही. डी. 2024 ची संकल्पना-'मतदानाइतके महत्वाचे काहीही नाही, मी मतदान करतोच' या गेल्या वर्षीच्या संकल्पनेचा एक भाग आहे.
या कार्यक्रमादरम्यान, माननीय राष्ट्रपती 2023 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती विषयक पुरस्कार प्रदान करतील. माहिती तंत्रज्ञान उपक्रम, सुरक्षा व्यवस्थापन, निवडणूक व्यवस्थापन, सर्वांसाठी सहज निवडणूक, मतदार यादी आणि मतदार जागरूकता तसेच जनसंपर्क क्षेत्रातील योगदान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये 2023 मध्ये निवडणुका आयोजित करण्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना हे पुरस्कार प्रदान केले जातील. मतदार जागृतीसाठी दिलेल्या मौल्यवान योगदानाबद्दल सरकारी विभाग आणि माध्यम संस्थांसह महत्त्वाच्या घटकांना देखील पुरस्कार दिले जातील.
भारतीय निवडणूक आयोगाच्या '2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ई. सी. आय. चे उपक्रम’ ('ई. सी. आय. इनिशिएटिव्ह्ज फॉर जनरल इलेक्शन्स 2024') या पुस्तिकेची पहिली प्रत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हस्ते राष्ट्रपतींना सादर केली जाईल. निवडणुकांच्या मुक्त, निष्पक्ष, सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागात्मक आयोजनाची खातरजमा करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रत्येक विभागाने हाती घेतलेल्या उपक्रमांचा सर्वसमावेशक आढावा या पुस्तकात देण्यात आला आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राज कुमार हिरानी यांच्या सहकार्याने तयार केलेला 'माय व्होट माय ड्यूटी "हा मतदार जागृतीसाठीचा लघुपटही यावेळी प्रदर्शित केला जाणार आहे. या लघुपटामध्ये अनेक ख्यातनाम व्यक्तींचा सहभाग असून लोकशाहीची भावना आणि एकेका मताची शक्ती याबाबत त्यांनी जनजागृतीपर संदेश दिला आहे.
भारतीय निवडणूक आयोग 25 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रसेवेचे 75 वे वर्ष साजरे करत आहे. हा महत्त्वपूर्ण दिवस साजरा करण्यासाठी आणि 2024 च्या संसदीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'सर्वसमावेशक निवडणुका' या संकल्पनेवर आधारित एक टपाल तिकीट जारी केले जाईल.
या प्रसंगी, आगामी संसदीय निवडणुका 2024 साठी मतदार शिक्षण आणि जागृतीसाठी एक नाविन्यपूर्ण बहु-माध्यम मोहीम देखील सुरू केली जाईल.
एन. व्ही. डी. हा राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, मतदारसंघ आणि मतदान केंद्र स्तरावर साजरा केला जातो, त्यामुळे तो देशातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक ठरतो.
* * *
R.Aghor/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1999211)
Visitor Counter : 984