पंतप्रधान कार्यालय
नवी दिल्लीतील लाल किल्ला येथे पराक्रम दिवसानिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
23 JAN 2024 10:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2024
केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी किशन रेड्डी जी, अर्जुन राम मेघवाल जी, मीनाक्षी लेखी जी, अजय भट्ट जी, ब्रिगेडियर आर एस चिकारा जी, आझाद हिंद सेनेचे माजी सैनिक लेफ्टिनेंट आर माधवन जी, आणि माझ्या प्रिय देशवासियांनो!
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवसाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आझाद हिंद सेनेच्या वीरांच्या सामर्थ्याचा साक्षीदार राहिलेला हा लाल किल्ला आज पुन्हा नव्या ऊर्जेने उजळून निघाला आहे. अमृत काळाचे हे प्रारंभीचे वर्ष... संपूर्ण देशात संकल्पातून सिद्धीचा उत्साह... हे क्षण खरोखरच अभूतपूर्व आहेत. कालच संपूर्ण विश्व, भारताच्या सांस्कृतिक चेतनेच्या एका ऐतिहासिक टप्प्याचे साक्षीदार बनले आहे. भव्य राम मंदिरात प्राण प्रतिष्ठेची ऊर्जा, त्या भावना, अखिल विश्वाने, अखिल मानवजातीने अनुभवल्या. आणि आज आपण आपले नेते सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करत आहोत. गेल्या काही वर्षांपासून, जेव्हापासून 23 जानेवारी, पराक्रम दिवस घोषित करण्यात आला आहे तेव्हापासून प्रजासत्ताक दिवस कार्यक्रम 23 जानेवारीपासून बापूंच्या पुण्यतिथीपर्यंत 30 जानेवारीपर्यंत सुरू असतो. प्रजासत्ताक दिवसाच्या या उत्सवात आता 22 जानेवारीचा श्रद्धेचा महोत्सवही जोडला गेला आहे. जानेवारी महिन्याचे हे शेवटचे काही दिवस आपल्या श्रद्धा, आपली सांस्कृतिक चेतना, आपले प्रजासत्ताक आणि आपल्या देशभक्तीसाठी खूप प्रेरणादायी ठरत आहेत. मी तुम्हाला शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
नेताजींच्या जीवनाचे चित्रण करणारे प्रदर्शन आज येथे भरले आहे. एकाच कॅनव्हासवर कलाकारांनी नेताजींच्या जीवनाचे चित्रण केले आहे. या प्रयत्नाशी संबंधित सर्व कलाकारांचे मी कौतुक करतो. काही वेळापूर्वी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित झालेल्या माझ्या लहान सहकाऱ्यांशीही मी संवाद साधला. एवढ्या लहान वयात त्यांचे धाडस आणि कौशल्य थक्क करणारे आहे. प्रत्येक वेळी जेव्हा मला भारतातील युवाशक्तीला भेटण्याची संधी मिळते तेव्हा विकसित भारतासाठीचा माझा विश्वास अधिक दृढ होत जातो. देशाच्या अशा सक्षम अमृत पिढीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक मोठे आदर्श आहेत.
मित्रांनो,
आज पराक्रम दिवसानिमित्त लाल किल्ल्यावरून भारत पर्व सुरू होत आहे. पुढील 9 दिवसांत भारत पर्वमध्ये प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे देशातील विविधतेचे दर्शन घडेल. भारत पर्व हे सुभाषचंद्र बोस यांच्या आदर्शांचे प्रतिबिंब आहे. व्होकल फॉर लोकलचा अंगीकार करण्याचा हा उत्सव आहे. हा उत्सव पर्यटनाला चालना देण्याचा आहे. हा उत्सव विविधतेचा सन्मान आहे. हा उत्सव, एक भारत श्रेष्ठ भारतला नवी उंची देणारा आहे. या उत्सवात सहभागी होऊन देशातील विविधतेचा आनंद साजरा करण्याचे मी सर्वांना आवाहन करतो.
माझ्या कुटुंबियांनो,
आझाद हिंद सेनेला 75 वर्ष झाल्यानिमित्त या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याचे भाग्य लाभलेला तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. नेताजींचे जीवन केवळ कष्टांचीच नव्हे तर पराक्रमाचीही पराकाष्ठाही आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेताजींनी आपल्या स्वप्नांना आणि आकांक्षांना तिलांजली दिली. त्यांनी ठरवले असते तर एका उत्तम जीवनाचा पर्याय ते निवडू शकले असते. पण त्यांनी आपली स्वप्ने भारताच्या संकल्पाशी जोडली. नेताजी देशाच्या त्या थोर सुपुत्रांपैकी एक होते ज्यांनी केवळ परकीय राजवटीला विरोधच केला नाही तर भारतीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना उत्तरही दिले. नेताजींनीच अत्यंत ठामपणे लोकशाहीची जननी म्हणून भारताची ओळख जगासमोर मांडली. जेव्हा जगातील काही लोक भारतातल्या लोकशाहीबद्दल साशंक होते, तेव्हा नेताजींनी त्यांना भारताच्या लोकशाहीची आणि त्याच्या भूतकाळाची आठवण करून दिली. लोकशाही ही मानवी संस्था आहे, असे नेताजी म्हणायचे. आणि ही व्यवस्था शेकडो वर्षांपासून भारतात वेगवेगळ्या ठिकाणी चालत आली आहे . लोकशाहीची जननी म्हणून आपल्या ओळखीचा आज भारताला अभिमान वाटू लागला असताना नेताजींच्या विचारांनाही बळ मिळाले आहे.
मित्रांनो,
गुलामगिरी ही केवळ राज्यकारभाराची नसते, तर विचार आणि व्यवहारातही असते, हे नेताजी जाणत होते. त्यामुळे विशेषतः त्या काळातील तरुण पिढीमध्ये याबाबत जागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आजच्या भारतात जर नेताजी असते तर युवा भारतात आलेल्या नवचेतनेने त्यांना किती आनंद झाला असता याची कल्पना करू शकतो. आज भारतातील तरुणांना त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या मूल्यांचा आणि त्यांच्या भारतीयत्वाचा ज्या प्रकारे अभिमान आहे, ते अभूतपूर्व आहे. आम्ही कोणापेक्षा कमी नाही, आमचे सामर्थ्य कोणापेक्षा कमी नाही, हा आत्मविश्वास आज भारतातील प्रत्येक तरुणामध्ये आला आहे.
जिथे कोणीही पोहोचू शकले नव्हते त्या चंद्राच्या भागावर आपण झेंडा फडकावू शकतो. आपण 15 लाख किलोमीटरचा प्रवास करून सूर्याच्या दिशेने वाटचाल केली आणि नियोजित स्थानी आपण पोहोचलो. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. सूर्य असो किंवा समुद्राची खोली, कोणत्याही रहस्यापर्यंत पोहोचणे आपल्यासाठी अवघड नाही. आपण जगातील पहिल्या तीन आर्थिक शक्तींपैकी एक होऊ शकतो. जगातल्या आव्हानांवर उपाय देण्याची आमच्यात क्षमता आहे. हा विश्वास, हा आत्मविश्वास आज भारतातील युवावर्गात दिसून येत आहे. भारतातील युवावर्गात आलेली ही जागृती विकसित भारताच्या निर्माणासाठीची ऊर्जा बनली आहे. त्यामुळेच आज भारतातील युवा पंच प्रतिज्ञा अंगीकारत आहेत. त्यामुळे आज भारतातील युवा गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून काम करत आहेत.
माझ्या कुटुंबियांनो,
नेताजींचे जीवन आणि त्यांचे योगदान युवा भारतासाठी प्रेरणादायी आहे. ही प्रेरणा प्रआपल्यासोबत निरंतर राहावी, प्रत्येक पावलावर कायम राहावी यासाठी आम्ही गेल्या 10 वर्षांत निरंतर प्रयत्न केले आहेत. आम्ही कर्तव्य पथावर नेताजींच्या प्रतिमेला उचित स्थान दिले आहे. आमचा उद्देश आहे- कर्तव्य पथावर येणाऱ्या प्रत्येक देशवासीयाने नेताजींचे कर्तव्याप्रती समर्पण स्मृतीत जपावे.
जिथे आझाद हिंद सरकारने पहिल्यांदा तिरंगा फडकवला, त्या अंदमान आणि निकोबार बेटांना आम्ही नेताजींची नावे दिली. आता अंदमानमध्ये नेताजींसाठी समर्पित स्मारक देखील उभारले जात आहे. आम्ही लाल किल्ल्यावरच नेताजी आणि आझाद हिंद फौज यांच्या योगदानाला समर्पित एक संग्रहालय बांधले आहे. पहिल्यांदाच आपत्ती व्यवस्थापन पुरस्काराच्या स्वरूपात नेताजींच्या नावाने एखादा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वतंत्र भारतात कोणत्याही सरकारने आझाद हिंद सेनेला समर्पित इतके काम केले नसेल, जितके आमच्या सरकारने केले आहे. आणि हे देखील मी आमच्या सरकारचे भाग्य मानतो.
मित्रहो,
देशाला भेडसावणारी आव्हाने नेताजींना खूप चांगल्या प्रकारे समजत होती आणि त्याबद्दल ते सर्वांना सावध करत असत. ते म्हणाले होते की , जर आपल्याला भारताला महान बनवायचे असेल तर लोकशाही समाजाच्या पायावर राजकीय लोकशाही बळकट करणे आवश्यक आहे. पण दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतर, त्यांच्या याच विचारांवर जोरदार आघात करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर, घराणेशाही, सगेसोयऱ्यांना प्राधान्य यांसारख्या अनेक वाईट गोष्टी भारताच्या लोकशाहीवर वर्चस्व गाजवत राहिल्या. भारताला हव्या त्या गतीने विकास करता न येण्याचे हे देखील एक प्रमुख कारण आहे.
समाजातील एक मोठा वर्ग संधींपासून वंचित होता. आर्थिक आणि सामाजिक उत्थानाच्या संसाधनांपासून ते खूप दूर होते. राजकीय आणि आर्थिक निर्णय , धोरण निर्मितीवर निवडक घराण्यांचे वर्चस्व होते. या परिस्थितीचा सर्वाधिक त्रास जर कोणाला झाला असेल तर ती देशाची युवा शक्ती आणि देशाच्या महिला शक्तीला झाला. युवकांना पावलोपावली भेदभाव करणाऱ्या व्यवस्थेचा सामना करावा लागला. महिलांना त्यांच्या लहान-सहान गरजांसाठीही बराच काळ वाट पाहावी लागत होती. अशा परिस्थितीत कोणताही देश विकास करू शकत नव्हता आणि हेच भारताच्या बाबतीत घडले.
त्यामुळे 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर आम्ही ' सबका साथ - सबका विकास " या भावनेने वाटचाल केली. आज, दहा वर्षांत, देश पाहत आहे की गोष्टी कशा बदलत आहेत. नेताजींनी स्वतंत्र भारताचे जे स्वप्न पाहिले होते ते आता पूर्ण होत आहे. आज गरिबातील गरीब कुटुंबातील मुला-मुलीला देखील याची खात्री आहे की त्यांना जीवनात प्रगती करण्यासाठी संधींची कमतरता नाही. आज देशाच्या नारीशक्तीला हा विश्वास देखील मिळाला आहे की सरकार आपल्या लहानात लहान गरजेविषयी संवेदनशील आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नारी शक्ती वंदन अधिनियम देखील तयार करण्यात आला आहे. मी देशातील प्रत्येक युवकाला, प्रत्येक भगिनीला आणि कन्येला सांगेन की अमृत काळ तुमच्यासाठी आपला पराक्रम दाखवण्याची संधी घेऊन आला आहे. देशाच्या राजकीय भवितव्याचे नवनिर्माण करण्याची तुमच्यासमोर खूप मोठी संधी आहे. विकसित भारताच्या राजकारणात परिवर्तन घडवून आणण्यात तुम्ही मोठी भूमिका बजावू शकता. केवळ आपली युवा आणि महिला शक्तीच देशाच्या राजकारणाला घराणेशाही आणि भ्रष्टाचाराच्या कुप्रथांमधून बाहेर काढू शकते. या वाईट गोष्टींचा अंत करण्याची शक्ती आपल्याला राजकारणाच्या माध्यमातूनही दाखवावी लागेल.
माझ्या कुटुंबियांनो,
मी काल अयोध्येत म्हटले होते की रामकार्यातून राष्ट्रकार्यात सहभागी होण्याची वेळ आली आहे. रामभक्तीतून देशभक्तीची भावना बळकट करण्याची ही वेळ आहे. आज भारताच्या प्रत्येक पावलावर, प्रत्येक कृतीवर जगाचे लक्ष आहे. आज आपण काय करतो, काय साध्य करतो, हे जगाला उत्सुकतेने जाणून घ्यायचे आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे आपले उद्दिष्ट आहे. भारताला आर्थिकदृष्ट्या समृद्ध , सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत आणि संरक्षणविषयक धोरणात्मकदृष्ट्या सक्षम बनवणे हे आपले ध्येय आहे. यासाठी पुढील पाच वर्षांत आपण जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनणे महत्वाचे आहे . आणि हे उद्दिष्ट आपल्या आवाक्याबाहेर नाही . गेल्या दहा वर्षांत आपण 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकाची आर्थिक शक्ती बनून पुढे आलो आहोत . गेल्या दहा वर्षांत संपूर्ण देशाच्या प्रयत्नांमुळे आणि प्रोत्साहनामुळे सुमारे 25 कोटी भारतीय गरिबीतून बाहेर आले आहेत. यापूर्वी कल्पनाही केली नव्हती अशी उद्दिष्टे आज भारत साध्य करत आहे .
माझ्या कुटुंबियांनो,
गेल्या दहा वर्षांत भारतानेही आपली संरक्षणविषयक धोरणात्मक क्षमता बळकट करण्यासाठी एक नवीन मार्ग निवडला आहे . बऱ्याच काळापासून भारत संरक्षण- सुरक्षेच्या गरजांसाठी परदेशांवर अवलंबून राहिला आहे. पण आता आपण ही परिस्थिती बदलत आहोत. आम्ही भारतीय सैन्याला आत्मनिर्भर बनवण्यात गुंतलो आहोत . अशी शेकडो शस्त्रे आणि उपकरणे आहेत , ज्यांची आयात देशाच्या सैन्याने पूर्णपणे थांबवली आहे. आज देशभरात एक चैतन्यदायी संरक्षण उद्योग उभारला जात आहे. एकेकाळी संरक्षण सामग्रीचा जगातील सर्वात मोठा आयातदार असलेला भारत आता जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदारांच्या यादीत सामील होत आहे.
मित्रांनो,
आजचा भारत संपूर्ण जगाला एक जागतिक मित्र म्हणून जोडण्यात गुंतलेला आहे . आज आम्ही जगातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी पुढे जात आहोत . एकीकडे आपण जगाला युद्धातून शांततेकडे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. दुसरीकडे, आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी देखील पूर्णपणे सज्ज आहोत.
मित्रांनो,
पुढील 25 वर्षे भारतासाठी, भारतीय लोकांसाठी खूप महत्वाची आहेत . अमृतकाळाच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग आपण राष्ट्रहितासाठी केला पाहिजे. आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील , आपल्याला पराक्रम दाखवावा लागेल. विकसित भारताच्या उभारणीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. पराक्रम दिवस आपल्याला दरवर्षी या संकल्पाची आठवण करून देत राहील . पुन्हा एकदा , संपूर्ण देशाला पराक्रम दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मरण करत मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो .
माझ्यासोबत बोला-
भारत माता की जय.
भारत माता की जय.
भारत माता की जय.
खूप खूप धन्यवाद.
* * *
Jaydevi PS/Sonali K/Shailesh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1999205)
Visitor Counter : 125
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam