राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान
Posted On:
22 JAN 2024 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (22 जानेवारी 2024) नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात 19 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले. शौर्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या श्रेणींमध्ये प्रत्येकी एक; समाजसेवेच्या श्रेणीत चार; क्रीडा श्रेणीत पाच तर कला आणि संस्कृती श्रेणीत सात मुलांना हा पुरस्कार मिळाला.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, हा पुरस्कार सोहळा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लहान मुलांच्या अद्भुत क्षमता आणि प्रतिभेला प्रोत्साहन देण्याची संधी आहे. मुलांचे यश साजरे करण्याची ही एक संधी आहे. त्यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व मुलांचे कौतुक केले.
आपल्या मुलांमध्ये अष्टपैलू प्रतिभा आहे. समर्पण आणि कठोर परिश्रमातून स्वतःची ओळख निर्माण करण्याची अफाट क्षमता त्यांच्यात आहे. त्यांना योग्य दिशा दाखवणे हे आपले कर्तव्य आहे जेणेकरून ते त्यांच्यातील प्रतिभा आणि उर्जेचा योग्य वापर करू शकतील असे राष्ट्रपती म्हणाल्या.
आज भारताकडे मोठ्या संख्येने युवकांच्या रूपात अमूल्य संसाधन आहे. केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या प्रगतीमध्ये हे संसाधन महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आपल्याला आपल्या युवकांना तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सक्षम बनवायचे आहे. त्यांना नवोन्मेष आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहन द्यावे लागेल, तरच ते या वेगाने बदलणाऱ्या जगात आपले योग्य स्थान निर्माण करू शकतील असे राष्ट्रपती म्हणाल्या.
आजकालची मुले तंत्रज्ञानाच्या बाबतीत कुशल आहेत. ते त्यांच्या शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. मात्र तंत्रज्ञानाचाही अनेकदा गैरवापर होतो. डिप फेक, आर्थिक फसवणूक, मुलांचे शोषण असे अनेक गुन्हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जात आहेत असे त्या म्हणाल्या. सोशल मीडिया हे आपले मत व्यक्त करण्यासाठी आणि कोणत्याही विषयाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक सशक्त माध्यम आहे, परंतु अफवा पसरवण्यासाठी देखील त्याचा गैरवापर केला जात आहे असे त्यांनी नमूद केले. त्यांनी मुलांना सतर्क राहण्याचा आणि चुकीच्या कामांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला, कारण एक चुकीचे पाऊल त्यांचे भविष्य धोक्यात आणू शकते.
युवा पिढीमध्ये शारीरिक हालचाली कमी होत असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. त्या म्हणाल्या की, शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे लहान मुले आणि युवकांमध्ये दुर्मिळ असणारे अनेक आजार आज वाढत आहेत असे त्या म्हणाल्या. युवकांनी एक तरी खेळ शिकावा आणि त्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहिले नाही तरी चालेल मात्र खेळ त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवतात. खेळामुळे त्यांच्यात खिलाडू वृत्ती आणि सांघिक भावना विकसित होते असे त्या म्हणाल्या. .
राष्ट्रपती म्हणाल्या की, लहान मुले आणि युवक हे आपल्या देशाच्या भविष्याचे नेतृत्व करणार आहेत. त्यांना आधुनिक शिक्षण देण्याबरोबरच भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्यांची जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य आहे. अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, या निमित्ताने आपण श्रीरामाचे आदर्श आणि रामायणात वर्णन केलेली जीवनमूल्ये आपल्या जीवनात अंगीकारण्याचा संकल्प करायला हवा.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1998788)