विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
श्रीराम मंदिराच्या बांधकामाला विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सी एस आय आर आणि डीएसटीच्या मिळून किमान चार आघाडीच्या राष्ट्रीय संस्थांनी तांत्रिकदृष्ट्या मदत केली आहे, तसेच आय आय टी आणि इस्रो सारख्या इतर संस्थांकडूनही महत्वपूर्ण माहिती मिळाल्याचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
21 JAN 2024 1:43PM by PIB Mumbai
श्रीराम मंदिराच्या बांधकामाला विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सी एस आय आर (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) आणि डीएसटी (विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग) च्या मिळून किमान चार आघाडीच्या राष्ट्रीय संस्थांनी तांत्रिकदृष्ट्या मदत केली आहे, तसेच आय आय टी (भारतीय तंत्रविज्ञान संस्था) आणि इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) सारख्या संस्थांकडूनही महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे.
ज्या चार संस्थांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यात सीएसआयआर च्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (सीबीआरआय) रुरकी, नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनजीआरआय) हैदराबाद आणि हिमाचल प्रदेशात पालमपूर इथली इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायो रिसोर्स टेक्नॉलॉजी या संस्था, तर डी एस टी ची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (आय आय ए) बंगळुरू या संस्थांचा समावेश आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान डॉ जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.
सीएसआयआर-सीबीआरआय रुरकीने राम मंदिर उभारणीत मोठे योगदान दिले आहे. सीएसआयआर-एनजीआरआय हैदराबादने मंदिराच्या पायाची रचना आणि भूकंपरोधक सुरक्षिततेवर महत्त्वपूर्ण माहिती पुरवली आहे. डी एस टी-आय आय ए बंगळुरूने राम मूर्तीच्या माथ्यावर सूर्य तिलक हा सूर्य किरणांचा झोत पाडण्याबाबत तांत्रिक सहाय्य प्रदान केले आणि सी एस आय-आर-आय एच बी टी पालमपूरने 22 जानेवारी रोजी अयोध्येतील दिव्य राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ट्यूलिप्स फुले फुलवली आहेत, अशी माहिती केंद्रीय विज्ञान मंत्र्यांनी दिली.
360 फूट लांब, 235 फूट रुंद आणि 161 फूट उंच असलेली मुख्य मंदिराची वास्तू, राजस्थानच्या बन्सी पहाडपूर इथून उत्खनन केलेल्या वालुकापाषाणापासून बनलेली आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. मंदिराच्या बांधकामात कुठेही सिमेंट किंवा लोखंड आणि पोलादाचा वापर केलेला नाही. 3 मजली मंदिराची संरचनात्मक रचना भूकंप प्रतिरोधक आहे आणि ते 2,500 वर्षांपर्यंत 8 रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के सहन करू शकते, असे त्यांनी सांगितले.
श्रीराम नवमीच्या दिवशी बरोबर मध्यान्ही बारा वाजता प्रभू श्रीरामचंद्राच्या मस्तकावर 6 मिनिटे सूर्यकिरणे पडतील, अशा प्रकारे रचना केलेली सूर्य तिलक प्रणाली हे या राम मंदिराचे अनोखे असे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत सर्व तत्वज्ञानांचा व्यापक स्तरावर एकत्रित विचार करून त्या द्वारे पारंपरिक आणि आधुनिक ज्ञानाच्या मिलाफावर भर दिला आहे.
"जगातील मोठी अर्थव्यवस्था म्हणून, भारताने दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे, लवकरच आपण चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू आणि नंतर जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ", असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1998461)
Visitor Counter : 103