पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या अध्यक्षांनी पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकांची घेतली भेट
भारताच्या एकूण ऊर्जा संचयात नैसर्गिक वायूचा वाटा 15% पर्यंत वाढवण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांची राज्यपालांना दिली माहिती
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2024 11:02AM by PIB Mumbai
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाचे (PNGRB) अध्यक्ष डॉ. अनिल कुमार जैन यांनी 19 जानेवारी 24 रोजी चंदीगड इथे चंडीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक व पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली.

अध्यक्षांनी यावेळी प्रामुख्याने चंदीगड केंद्रशासित प्रदेशातील तेल व वायू पायाभूत सुविधांच्या प्रगतीबद्दल आणि भारताच्या एकूण ऊर्जा संचयात नैसर्गिक वायूचा वाटा 15% पर्यंत वाढवण्याची पंतप्रधानांची संकल्पना साकार करण्यासाठी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाने हाती घेतलेल्या कार्यांबद्दल राज्यपालांना माहिती दिली. पंजाबमधील नैसर्गिक वायूच्या प्रसारात झालेल्या प्रगतीबाबतही त्यांनी राज्यपालांना माहिती दिली. स्वयंपाक करताना नैसर्गिक वायूचा वापर आणि वाहतुकीत सीएनजीच्या वापरासह या दोन्ही वायुंचा नैसर्गिक पर्यावरणीय फायदा तसेच सुविधांवर भर देण्यात आला.
औद्योगिक आणि व्यावसायिक गाळ्यांमध्ये प्रदूषित घन व द्रव इंधनाऐवजी नैसर्गिक वायूचा पर्याय, जमीन पुनर्संचयित शुल्क तर्क सुसंगत करणे, सीएनजीवरील मूल्यवर्धित कर इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या पाठिंब्याने शहरी गॅस वितरक परवानाधारक मार्च 2025 पर्यंत "हरघर पीएनजी" वितरण करण्यास तयार असतील यावर डॉ अनिल जैन यांनी भर दिला. स्वच्छ आणि हरित शहराचा लौकिक प्राप्त करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले.
राज्यपालांनी याची प्रशंसा केली आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशात नैसर्गिक वायूच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या अध्यक्षांनी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, गृह सचिव तसेच प्रशासक आणि चंदीगड महापालिका आयुक्तांचे सल्लागार नितीन कुमार यादव यांची देखील भेट घेतली. बैठकीत नैसर्गिक वायूला चालना देण्याच्या मुद्द्यांबाबत आणि घरगुती, वाहतूक, औद्योगिक आणि व्यावसायिक घटकांमध्ये त्याचा वाढता वापर यावर चर्चा करण्यात आली. गृह सचिवांनी या सामायिक उद्दिष्टासाठी केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या संपूर्ण सहकार्याचे आश्वासनही दिले. उपरोक्त चर्चांमुळे चंदीगडच्या ऊर्जा घटकांमध्ये या स्वच्छ इंधनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने आजपर्यंत देशभरातील 300 भौगोलिक क्षेत्रे प्राधिकृत केली आहेत, ज्यात 98% लोकसंख्या आणि 88% क्षेत्र शहरी गॅस वितरण जाळ्याच्या विकासाचा समावेश आहे. वर्ष 2032 पर्यंत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने 12.5 कोटी देशांतर्गत PNG जोडण्या पुरवण्याचे, 17,751 CNG स्थानकांची स्थापना करण्याचे आणि 5,42,224 इंच-किमी पाइपलाइन टाकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत देशभरात 1.2 कोटी घरगुती PNG जोडण्या आणि 6,159 CNG स्थानकांची स्थापना करण्यात आली आहे.
***
S.Pophale/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1998345)
आगंतुक पटल : 148