पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अमली पदार्थ प्रतिबंधन अकादमी एनएसीआईएनच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 16 JAN 2024 10:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2024

आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर जी, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी निर्मला सीतारामन जी, पंकज चौधरी जी, भागवत किशनराव कराड जी, अन्य लोकप्रतिनिधी, आणि बंधू-भगिनींनो,

राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अमली पदार्थ प्रतिबंधन अकादमीच्या या दिमाखदार संकुलासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. ज्या श्री सत्य साई जिल्ह्यात, ज्या भागात हे संकुल उभारले आहे, ते स्वतःच खास आहे. हे क्षेत्र आपल्या अध्यात्म, राष्ट्र उभारणी आणि सुशासनाशी निगडित आपल्या वारशाचे प्रतिनिधित्व करते. पुट्टापर्थी हे श्री सत्य साईबाबांचे जन्मस्थान आहे हे तुही सर्व जाणताच. थोर स्वातंत्र्यसैनिक पद्मश्री कल्लूर सुब्बाराव यांची ही भूमी आहे. प्रसिद्ध कठपुतळी कलाकार दलवाई चलपती राव यांना या प्रदेशाने नवी ओळख दिली आहे. ही भूमी विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्याच्या सुशासनाची प्रेरणास्रोत आहे. अशाच प्रेरणादायी ठिकाणी ‘नसिन’चे हे नवे संकुल बांधण्यात आले आहे. मला विश्वास आहे की हे संकुल सुशासनाला नवीन आयाम देईल आणि देशातील व्यापार आणि उद्योगाला नवीन चालना देईल.

मित्रांनो,

आज थिरुवल्लुवर दिवस देखील आहे. संत थिरुवल्लुवर म्हणाले होते – उरुपोरुळुम उल्गु-पोरुळुम तन्-वोन्नार, तिरु-पोरुळुम वेन्दन पोरुळ म्हणजे महसूल म्हणून मिळालेल्या शाही करांवर आणि शत्रूकडून जिंकलेल्या पैशावर राजाचाच अधिकार असतो. आता लोकशाहीत राजे नसतात, प्रजा हीच राजा असते आणि सरकार प्रजेची सेवा करण्याचे काम करते. त्यामुळे सरकारला पुरेसा महसूल मिळावा यासाठी तुमची खूप मोठी भूमिका आहे.

मित्रांनो,

येथे येण्यापूर्वी मला लेपाक्षी येथील पवित्र वीरभद्र मंदिराचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. मंदिरात रंगनाथ रामायण ऐकण्याची संधी मिळाली. मी तिथल्या भक्तांसोबत भजन-कीर्तनात सहभागी झालो. असे म्हणतात की येथे जवळच भगवान श्रीराम आणि जटायूची भेट झाली होती. तुम्हाला माहिती आहे की, अयोध्येतील श्रीरामाच्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी माझे 11 दिवसांचे व्रत-अनुष्ठान सुरू आहे. अशा पावन प्रसंगी येथे साक्षात देवाकडून आशीर्वाद मिळाल्याने मी धन्य झालो आहे. सध्या संपूर्ण देश राममय झाला आहे, राम भक्तीत न्हाऊन निघाला आहे. पण मित्रांनो, प्रभू श्रीरामाचे आयुष्य, त्यांची प्रेरणा ही श्रद्धा आणि भक्तीच्या मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. प्रभू राम हे प्रशासनात, सामाजिक जीवनात सुशासनाचे असे प्रतीक आहेत, जे तुमच्या संस्थेसाठी देखील एक महान प्रेरणा बनू शकतात.

मित्रांनो,

रामराज्याची कल्पना हीच खऱ्या लोकशाहीची कल्पना आहे, असे महात्मा गांधी म्हणत. गांधीजींनी असे म्हणण्यामागचे कारण म्हणजे त्यांचा अनेक वर्षांचा अभ्यास आणि त्यांचे तत्वज्ञान होय. रामराज्य, म्हणजे अशी लोकशाही जिथे प्रत्येक नागरिकाचे म्हणणे ऐकले जाते आणि त्याला यथोचित सन्मान मिळतो. रामराज्यातील रहिवाशांसाठी सांगण्यात आले आहे, जे रामराज्याचे रहिवासी होते, तिथले नागरिक होते, त्यांच्यासाठी असे म्हटले आहे - रामराज्यवासी त्वम्, प्रोच्छ्रयस्व ते शिरम्। न्यायार्थं यूध्य्स्व, सर्वेषु समं चर। परिपालय दुर्बलं, विद्धि धर्मं वरम्। प्रोच्छ्रयस्व ते शिरम्, रामराज्यवासी त्वम्। म्हणजेच रामराज्यवासीयांनो, ताठ मानेने जगा, न्यायासाठी लढा, सर्वांना समान वागणूक द्या, दुर्बलांचे रक्षण करा, धर्माला सर्वोच्च माना, ताठ मानेने जगा, तुम्ही रामराज्याचे रहिवासी आहात. सुशासनाच्या या चार स्तंभांवर रामराज्य उभे राहिले. जिथे प्रत्येकजण सन्मानाने, न घाबरता ताठ मानेने वावरू शकतो. जिथे प्रत्येक नागरिकाला समान वागणूक दिली जाते. जिथे दुर्बलांचे रक्षण होते आणि जिथे धर्म म्हणजेच कर्तव्य सर्वोच्च आहे. आज, 21 व्या शतकातील तुमच्या आधुनिक संस्थेची चार मोठी उद्दिष्टे हीच तर आहेत. प्रशासक म्हणून, नियम आणि नियमनांची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून, तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवावे लागेल.

मित्रांनो,

देशाला आधुनिक परिसंस्था प्रदान करणे ही ‘नसिन’ची भूमिका आहे. एक अशी परिसंस्था जी देशात उद्योग-व्यवसाय सुलभ करू शकते. जी भारताला जागतिक व्यापाराचा महत्त्वाचा भागीदार बनवण्यासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण करू शकते. जी कर, सीमाशुल्क, अंमली पदार्थ यांसारख्या विषयांद्वारे देशात व्यवसाय करण्याच्या सुलभतेला प्रोत्साहन देते आणि जी चुकीच्या पद्धतींवर कठोर कारवाई करते. काही वेळापूर्वी मी काही तरुण आणि तरुण प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनाही भेटलो. ही अमृतकाळाचे नेतृत्व करणारी कर्मयोगींची अमर पिढी आहे जी अमर युगाचे नेतृत्व करेल. सरकारने तुम्हा सर्वांना अनेक अधिकार दिले आहेत. या अधिकारांचा वापर आपल्या विवेकबुद्धीवर अवलंबून असतो. आणि यामध्येही तुम्हाला भगवान श्रीरामांच्या जीवनातून प्रेरणा मिळेल. एका घटनेत प्रभू राम लक्ष्मणाला म्हणतात - नेयं मम मही सौम्य दुर्लभा सागराम्बरा। न हीच्छेयम धर्मेण शक्रत्वमपि लक्ष्मण॥ म्हणजे मी मनात आणले तर सागराने वेढलेली ही भूमीसुद्धा माझ्यासाठी दुर्मिळ नाही. पण अधर्माच्या मार्गावर चालताना मला इंद्रपद मिळाले तरी ते मी स्वीकारणार नाही. लहानसहान लालसेपोटी लोक कित्येकदा आपले कर्तव्य, आपली प्रतिज्ञा विसरतात हे आपण अनेकदा पाहतो. त्यामुळे तुमच्या कार्यकाळात तुम्हीही प्रभू रामाचे वचन लक्षात ठेवा.

मित्रांनो,

तुम्ही थेट कर प्रणालीशी संबंधित आहात. गोस्वामी तुलसीदासजींनी रामराज्यात करवसुलीच्या पद्धतीबाबत सांगितलेली गोष्ट अतिशय समर्पक आहे. गोस्वामी तुलसीदास जी सांगतात – बरसत हरषत लोग सब, करषत लखै न कोइ, तुलसी प्रजा सुभाग ते, भूप भानु सो होइ। म्हणजेच सूर्यामुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पीभवन होते आणि मग त्याच पाण्याचे ढग बनून पावसाच्या रूपाने पाणी पृथ्वीवर परत येते, समृद्धी वाढवते. आपली करप्रणालीही तशीच असली पाहिजे. जनतेकडून गोळा केलेल्या कराचा प्रत्येक पैसा लोककल्याणासाठी वापरला जावा आणि समृद्धीला चालना मिळावी यासाठी आमचा प्रयत्न असायला हवा. जर तुम्ही अभ्यास केला तर याच प्रेरणेने आम्ही गेल्या 10 वर्षांत करप्रणालीत प्रचंड सुधारणा केल्या. यापूर्वी देशात विविध करप्रणाली होत्या, ज्या सामान्य नागरिकाला सहजासहजी समजत नव्हत्या. पारदर्शकतेअभावी प्रामाणिक करदाते आणि व्यावसायिकांना त्रास होत होता. जीएसटीच्या रूपाने आम्ही देशाला आधुनिक प्रणाली दिली. सरकारने प्राप्तिकर प्रणालीही सुलभ केली.

आम्ही देशात चेहरामुक्त कर मूल्यांकन प्रणाली सुरू केली आहे. या सर्व सुधारणांमुळे आज देशात विक्रमी कर संकलन होत आहे. आणि जेव्हा सरकारकडे जमा होणारे कर संकलन वाढत आहे, मग सरकार देखील जनतेचा पैसा विविध योजनांच्या माध्यमातून जनतेला परत करत आहे. 2014 मध्ये केवळ दोन लाख रुपयांपर्यंत, दोन लाखांच्या उत्पन्नावरच करामध्ये सवलत दिलेली होती. आम्ही कर सवलतीची सीमा दोन लाखांवरून वाढवून ती सात लाखांपर्यंत पोहोचवली. 2014 नंतर आमच्या सरकारने करा मध्ये जी सवलत दिली आहे, ज्या सुधारणा केल्या आहेत त्यामुळे देशवासीयांच्या सूमारे अडीच लाख कोटी रुपयांच्या कराची बचत झाली आहे. सरकारने लोककल्याणाच्या मोठ्या योजना तयार केल्या आहेत, सरकार आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासावर विक्रमी गुंतवणूक करत आहे.  आणि तुम्ही हे देखील लक्षात घ्या की आज जेव्हा देशातील करदाता हे पाहतो की त्याचा पैसा योग्य कामांसाठी वापरला जात आहे तेव्हा तो करदाता देखील पुढाकार घेऊन कर भरायला तयार होत आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये कर भरणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. म्हणजेच आम्ही जे काही जनतेकडून घेतले ते जनतेच्या चरणी समर्पित केले आहे. हेच तर सुशासन आहे, हाच तर रामराज्याचा संदेश आहे.

मित्रांनो,

रामराज्यात संसाधनांचा सर्वोत्कृष्ट वापर कसा केला जाईल यावर देखील विशेष लक्ष दिले जात होते. भूतकाळात आपल्या प्रकल्पांना अटकवण्याची, लटकवण्याची आणि भटकवण्याची एक प्रवृत्ती होती. या कारणांमुळे देशाचे खूप मोठे नुकसान होत असते. अशा प्रवृत्तीच्या बाबतीत सजग करत असताना भगवान राम आपले बंधू भरत यांना सांगतात, भरत आणि राम या दोघांमधील हा संवाद खूपच चित्तवेधक आहे. राम भरताला सांगतात - कच्चिदर्थं विनिश्चित्य लघुमूलं महोदयम्। क्षिप्रमारभसे कर्तुं न दीर्घयसि राघव।। याचा अर्थ - ज्या कामांमध्ये गुंतवणूक कमी आणि त्याचे फायदे अधिक आहेत अशी कामे तू वेळ वाया न घालवता पूर्ण करतोस याचा मला विश्वास आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये आमच्या सरकारने देखील खर्चावर लक्ष ठेवले आहे आणि अनेक प्रकल्पांना निहित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

मित्रांनो,

गोस्वामी तुलसीदास जी म्हणतात - 'माली भानु किसानु सम नीति निपुन नरपाल । प्रजा भाग बस होहिंगे कबहुँ कबहुँ कलिकाल। म्हणजेच, सरकारच्या ठायी माळी, सूर्य आणि शेतकरी यांच्यासारखे गुण असले पाहिजेत. माळी कमकुवत रोपांना आधार देतो, त्याचे पोषण करतो, त्या रोपाच्या हक्काचे पोषण लुबाडणाऱ्यांना पिटाळून लावतो. त्याप्रमाणेच, सरकारने, आपल्या प्रशासनाने गरिबातील गरीब व्यक्तीला देखील सबळ बनवले पाहिजे, त्यांना सशक्त बनवले पाहिजे. सूर्य देखील अंधाराचा विनाश करतो, वातावरणाची शुद्धी करतो, आणि पाऊस पडावा यासाठी ऋतुचक्राला मदत करतो. गेल्या दहा वर्षात आम्ही गरीब, शेतकरी, महिला आणि युवक या सर्वांना जास्तीत जास्त सशक्त बनवले आहे. समाजातील जे लोक वंचित होते, शोषित होते, समाजात शेवटच्या स्तरावर उभे होते असे लोकच प्राधान्याने आमच्या योजनांच्या केंद्रस्थानी होते. गेल्या दहा वर्षात सुमारे दहा कोटी खोट्या नाव नोंदणी आम्ही कागदपत्रातून वगळून टाकल्या आहेत. आज दिल्ली मधून निघालेला एक एक पैसा त्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात पोहोचतो, जो त्याचा खरा हक्कदार आहे. ‘भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई आणि भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई’ याला सरकारने नेहमी प्राधान्य दिले आहे. आपण सर्वांनी हा प्राधान्यक्रम लक्षात ठेवून आपले काम केले पाहिजे.

मित्रांनो,

‘राष्ट्राच्या विकासासाठी राज्याचा विकास’ या भावनेने आजवर जे काम झाले आहे त्याचे सुखद परिणाम आज आपल्याला दिसत आहेत. काल प्रकाशित झालेल्या निती आयोगाच्या ताज्या अहवालाची माहिती तुमच्याकडे असेलच. जेव्हा कोणतेही सरकार गरिबांप्रति संवेदनशील असते, जेव्हा कोणतेही सरकार स्वच्छ मनाने गरिबांच्या अडचणी दूर करण्यासाठी काम करते तेव्हा त्याचे चांगले परिणाम दिसून येत असतात. आमच्या सरकारने नऊ वर्षात देशातील सुमारे 25 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढले असल्याचे नीती आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. ज्या देशांमध्ये अनेक दशके केवळ गरिबी हटवण्याच्या घोषणा देण्यात येत होत्या, त्या देशात केवळ नऊ वर्षात 25 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढणे ऐतिहासिक आहे, अभूतपूर्व आहे. 2014 मध्ये सत्ता स्वीकारल्यानंतर आमच्या सरकारने ज्याप्रमाणे गरीब कल्याणाला प्राधान्य दिलेहे त्याचेच फलित आहे. या देशातील गरिबामध्ये ते सामर्थ्य आहे की जर त्यांना साधने पुरवली गेली, संसाधने दिली गेली तर ते स्वतःच गरिबीला नामोहरम करू शकतील, असे मी नेहमीच मानत आलो आहे. आज हेच प्रत्यक्ष घडत असताना आपण पाहत आहोत. आमच्या सरकारने गरिबांच्या आरोग्यावर खर्च केला आहे, शिक्षणावर खर्च केला आहे, रोजगार आणि स्वयंरोजगारावर खर्च केला आहे, त्यांच्या सुविधांमध्ये वृद्धी केली आहे. आणि जेव्हा गरिबांचे सामर्थ्य वाढले, त्यांना सुविधा मिळाल्या तेव्हा ती गरीब व्यक्ती गरिबीला हरवून निर्भयाने गरिबीतून बाहेर पडली आहेत. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी ही आणखी एक शुभ वार्ता देशाला मिळाली आहे. भारतात गरिबी कमी होऊ शकते, ही गोष्ट प्रत्येकाला एका नव्या विश्वासाने भारून टाकणारी आहे, देशाचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. भारतात कमी होत असलेली गरिबी, देशात नव्या मध्यमवर्गाची, मध्यमवर्गाची कक्षा निरंतर रुंदावण्याचे कारण बनत आहे. नव्या मध्यम वर्गाच्या वाढत्या कक्षेमुळे आर्थिक उपक्रमांना किती मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे, हे तुम्ही आर्थिक क्षेत्रात काम करणारे लोक योग्य प्रकारे जाणून आहात. अशावेळी तुम्हाला, ‘नैसिन’ ला जास्त गंभीरतेने आपली जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

मित्रांनो,

तुम्हाला आठवतच असेल, लाल किल्ल्यावरून बोलताना मी सर्वांच्या एकसाथ प्रयत्नांबाबत बोललो होतो. ‘सबका प्रयास’ चे महत्व  काय आहे, याचे उत्तर देखील आपल्याला प्रभू श्रीरामाच्या जीवन प्रवासात सापडते. श्रीरामासमोर विद्वान, बलशाली आणि संपन्न लंकाधिपती रावणाला हरवण्याचे विराट आव्हान होते. यासाठी त्यांनी छोटी छोटी संसाधने, प्रत्येक प्रकारच्या जीवांना एकत्र केले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच एक विराट शक्ती निर्माण झाली आणि सरते शेवटी श्रीरामालाच सफलता मिळाली. याप्रमाणेच विकसित भारताच्या निर्मितीमध्ये देखील प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक नागरिक यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. देशाच्या उत्पन्नाची साधने वाढावीत, देशात गुंतवणूक वाढावी, देशात व्यापार उद्योग करणे सोपे व्हावे यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करायचे आहे. ‘सबका प्रयास’ या मंत्राचे अनुसरण करायचे आहे. ‘नैसिन’ चा हा नवा परिसर, स्वातंत्र्याच्या अमृत काळात सुशासनाचे प्रेरणास्थळ बनेल, अशी कामना करत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन.

 S.Tupe/V.Joshi/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1997003) Visitor Counter : 142