विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील भारतातील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रस्ता भागाचे उद्घाटन

Posted On: 13 JAN 2024 8:28PM by PIB Mumbai

 

निती आयोगाचे सदस्य (विज्ञान आणि तंत्रज्ञान) डॉ. व्ही. के. सारस्वत यांच्या हस्ते आज मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील भारतातील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रस्ता   भागाचे उद्घाटन झाले.  वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (CSIR-CRRI) यांनी विकसित केलेले स्टील स्लॅग रस्ते तंत्रज्ञान पोलाद उद्योगांच्या कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करत आहे सोबतच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) देशात मजबूत आणि पर्यावरणपूरक राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्यासाठी मदत करत आहे, असे डॉ सारस्वत यांनी प्रसंगी बोलताना सांगितले.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - केंद्रीय रस्ते संशोधन संस्था यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली जेएसडब्ल्यु स्टील कंपनीने राष्ट्रीय महामार्ग - 66 मुंबई-गोवाच्या इंदापूर-पनवेल विभागात 1 किमी लांबीचा चार पदरी स्टील स्लॅग रस्त्याचा भाग बांधला आहे.  या रस्त्याच्या बांधकामासाठी सुमारे 80,000 टन CONARC स्टील स्लॅगचे रायगड जिल्ह्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यु स्टील प्रकल्पात  प्रक्रिया केलेले स्टील स्लॅग एग्रीगेट्स म्हणून रूपांतरित करण्यात आले आहेत.

A highway with cars and trucksDescription automatically generated

जेएसडब्ल्यु स्टील लिमिटेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एस राठोड यांनी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - केंद्रीय रस्ते संशोधन संस्था यांनी केलेल्या प्रयत्नांचे तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जेएसडब्ल्यु स्टील लिमिटेडला हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मिळालेल्या सहकार्याचे कौतुक केले.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - केंद्रीय रस्ते संशोधन संस्था पोलाद मंत्रालयाच्या प्रायोजित संशोधन प्रकल्पांतर्गत, स्टील स्लॅग रोड बांधकामात प्रक्रिया केलेल्या स्टील स्लॅगच्या वापरासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे विकसित करत आहे, अशी माहिती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेचे संचालक डॉ. मनोरंजन परिडा यांनी दिली. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेने विविध पोलाद उद्योगांच्या सहकार्याने गुजरात, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश येथे रस्ते बांधणीत स्टील स्लॅगचा यशस्वीरित्या वापर केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई विभागाचे प्रादेशिक अधिकारी तसेच  मुख्य महाव्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांनी सांगितले की स्टील स्लॅग रस्ता  त्याच्या नवीन तांत्रिक वैशिष्ट्यांसाठी आणि अपवादात्मक कामगिरीसाठी ओळखला जातो. या तंत्रज्ञानाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रशंसा मिळवली आहे, असेही ते म्हणाले.

***

N.Chitale/S.Mukhedkar/Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1995925) Visitor Counter : 148


Read this release in: English , Urdu , Hindi