राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार केले प्रदान

Posted On: 11 JAN 2024 4:00PM by PIB Mumbai


नवी दिल्ली , 11 जानेवारी 2024

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (11 जानेवारी, 2024) नवी दिल्ली येथे गृहनिर्माण आणि नगर विकास व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार प्रदान केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, व्यापक सहभागाद्वारे करण्यात आलेले स्वच्छ सर्वेक्षण हे स्वच्छतेचा स्तर उंचावण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. 'स्वच्छतेकडून समृद्धीकडे' या मार्गावर वाटचाल करणाऱ्या सर्वांची त्यांनी प्रशंसा केली. स्वच्छता अभियानामुळे महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाच्या संधी निर्माण होत आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आपले स्वच्छता मित्र हे आपल्या स्वच्छता मोहिमेतील आघाडीचे सैनिक आहेत. स्वच्छता मित्रांची सुरक्षा, सन्मान आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी पावले उचलली जात आहेत, या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, मॅनहोल्सची स्वच्छता यांत्रिकीकरणाद्वारे करून आणि मशीन-होल्सद्वारे स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करूनच आपण संवेदनशील समाज म्हणून आपली खरी ओळख निर्माण करू शकू.

स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात कचरा व्यवस्थापनामध्ये पुनर्प्रक्रीयेवर भर दिला जात आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, चक्राकार अर्थव्यवस्थेमधील, अधिकाधिक वस्तूंवर पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर करण्याच्या पद्धती शाश्वत विकासासाठी उपयुक्त ठरत आहेत. ही प्रणाली कचरा व्यवस्थापनामध्येही अत्यंत उपयुक्त ठरू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, कचऱ्यापासून मूल्य या संकल्पनेचा आपण स्वीकार केला तर, प्रत्येक वस्तू किमती आहे, हे अधिक स्पष्ट होईल. हरित (विघटनशील) कचर्‍यापासून बायोगॅस निर्मिती आणि कचऱ्यापासून बनवलेल्या इंधनामधून वीजनिर्मिती, यामागे हीच सर्वांगीण आणि प्रगतीशील विचारसरणी काम करते, असे त्या म्हणल्या.  

राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या लोकसंख्येपैकी जवळजवळ एक तृतीयांश लोक शहरी भागात राहतात. शहरे आणि शहरांची स्वच्छता त्यांच्या आरोग्यासाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. शहरी भागातील मोठी जमीन कचऱ्याच्या डोंगराखाली गाडली गेली आहे, असे नमूद करून त्या म्हणाल्या की, शहरी भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी असे कचऱ्याचे डोंगर अत्यंत घातक आहेत.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत अशा डंप-साइट्स (कचरा टाकण्याच्या जागा) नष्ट केल्या जात आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सर्व शहरी भागांमध्ये प्रभावीपणे काम करून, शून्य डंप-साईटचे लक्ष्य गाठले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, देशातील युवक आपले सर्वात महत्वाचे भागीदार आहेत. युवा पिढीने आपली सर्व शहरे आणि संपूर्ण देश स्वच्छ ठेवण्याचा निश्चय केला, 2047 चा भारत जगातील सर्वात स्वच्छ देशांच्या यादीत सामील होऊन आपली स्वातंत्र्याची शताब्दी नक्कीच साजरी करेल. देशातील सर्व तरुणांनी भारताला जगातील सर्वात स्वच्छ देश बनवण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवून, पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -


S.Tupe/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 1995194) Visitor Counter : 157