वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत आणि संयुक्त अरब अमिरात परस्परांबरोबरचा द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सवर नेण्याची आकांक्षा बाळगत असल्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन

Posted On: 10 JAN 2024 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 10 जानेवारी 2024

भारत आणि संयुक्त अरब अमिरात (युएई), परस्परांबरोबरचा द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सवर नेण्याची आकांक्षा बाळगत असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेत 'यूएई भारत व्यापार परिषदेला' संबोधित करताना, केंद्रीय मंत्र्यांनी भारत-युएई भागीदारीचे बहुआयामी स्वरूप अधोरेखित केले, ज्यामध्ये अंतराळ संशोधन, सुरक्षा, शिक्षण आणि हवामान कृती या क्षेत्रांमधील सहकार्यांचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, दोन्ही देश आपली भागीदारी आणखी वाढवण्यासाठी उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील नवीन संधींचा शोध घेत आहेत. ते म्हणाले की भारत युएई व्यापक आर्थिक भागीदारी कराराअंतर्गत द्विपक्षीय व्यापार वाढला आहे. भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर आणि रुपेला (Rupay) प्रोत्साहन  आणि रुपया आणि दिराम यांच्यातील थेट व्यापार सुलभ करण्यासाठीचा पुढाकार यासारख्या महत्त्वाच्या द्विपक्षीय सहकार्यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

 केंद्रीय मंत्र्यांनी नवीन भागीदारीच्या शक्यता पडताळणे, संधी ओळखणे आणि विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या अमर्याद शक्यतांवर भर दिला. भारत-यूएई भागीदारी म्हणजे, सामायिक इतिहास आणि परस्पर प्रगतीच्या आकांक्षांवर आधारित 21 व्या शतकातील सहयोगाची व्याख्या आहे, अशी कल्पना त्यांनी मांडली. अबुधाबी येथे फेब्रुवारीमध्ये डब्ल्यूटीओ मंत्रिस्तरीय परिषद 13 च्या आयोजनाबद्दल परिषदेचे अध्यक्ष डॉ. थानी यांची पियुष गोयल यांनी प्रशंसा केली, आणि ही परिषद यशस्वी होण्यासाठी भारताकडून पूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले.

भारताचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आणि तरुण, महत्त्वाकांक्षी लोकसंख्येचा उल्लेख करून, देशाच्या 1.4 अब्ज लोकांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भरीव परतावा देण्याची आणि योगदान देण्याची क्षमता अधोरेखित करत, गुंतवणूकदारांनी भारताच्या विकास गाथेचे भागीदार व्हावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले.


S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1995016) Visitor Counter : 55