संरक्षण मंत्रालय

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची लंडन येथे युकेचे संरक्षण मंत्री ग्रांट शॅप्स यांच्याशी चर्चा; संरक्षण क्षेत्रातील उद्योगविषयक सहकार्य वाढवण्यावर दिला भर


द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय कॅडेट एक्स्चेंज कार्यक्रमासाठी भारत आणि युके यांच्या दरम्यान सामंजस्य करार; संशोधन आणि विकास क्षेत्रात संरक्षण सहयोगाबाबत व्यवस्था पत्रावर स्वाक्षऱ्या

Posted On: 09 JAN 2024 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2024

 

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज, 09 जानेवारी 2024 रोजी, लंडन येथे युकेचे संरक्षण मंत्री ग्रांट शॅप्स यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही बाजूंकडून संकल्पनांच्या  फलदायी देवाणघेवाणीसह ही बैठक अत्यंत स्नेहपूर्ण वातावरणात पार पडली. दोन्ही मंत्र्यांनी संरक्षण, सुरक्षा आणि सहकार्यविषयक मुद्द्यांवर केलेल्या चर्चेत संरक्षण क्षेत्रातील उद्योगविषयक सहकार्य वाढवण्यावर अधिक भर देण्यात आला. भारत आणि युके यांच्यातील संबंध केवळ व्यावहारिक नसून हे दोन्ही देश अनेक साम्य आणि सामायिक उद्दिष्टांसह नैसर्गिक भागीदार आहेत यावर यूकेचे संरक्षण मंत्री ग्रांट शॅप्स यांनी अधिक भर दिला. दोन्ही देशांदरम्यान, विशेषतः हिंद-प्रशांत प्रदेशात वाढत्या धोरणात्मक एककेंद्रीकरणाची कौतुकाने नोंद घेतली.

या द्विपक्षीय संरक्षणविषयक बैठकीनंतर, भारत आणि युके यांच्यादरम्यान दोन करार करण्यात आले- पहिला होता द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय कॅडेट एक्स्चेंज कार्यक्रमाबाबत सामंजस्य करार आणि दुसरा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि युकेच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा (डीएसटीएल) यांच्या दरम्यान संशोधन आणि विकास क्षेत्रातील संरक्षण सहयोगाबाबत व्यवस्था पत्र. हे करार दोन्ही देशांच्या लोकांदरम्यान विशेषतः दोन्ही देशांच्या युवकांमध्ये वैचारिक देवाणघेवाणीला चालना देतील आणि दोन्ही देशांतील संरक्षणविषयक संशोधनाच्या सहयोगासाठी अधिक विस्तृत क्षेत्र उपलब्ध करून देतील.  

काल, 8 जानेवारी रोजी रात्री उशिरा लंडन येथे पोहोचल्यानंतर, केंद्रीय संरक्षणमंत्र्यांनी आज सकाळी टॅव्हीस्टॉक स्क्वेयर येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून लंडनमधील कार्यक्रमांना सुरुवात केली. या परिसराच्या जवळच असलेल्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे महात्मा गांधी यांनी वर्ष 1888 ते 1891 या काळात कायद्याचे शिक्षण घेतले. 9 जानेवारी या तारखेला प्रतीकात्मक महत्त्व आहे कारण वर्ष 1915 मध्ये याच तारखेला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईला परतले. परदेशातील भारतीय समुदायाने देशाच्या विकासाप्रति दिलेल्या समृद्ध योगदानाच्या स्मरणार्थ आता हा दिवस, भारतात प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. 

युकेच्या संरक्षणमंत्र्यांशी बैठक करण्यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना अश्व रक्षक परेड मैदानावर औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1994690) Visitor Counter : 67