पंचायती राज मंत्रालय

केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘लिंगाधारित हिंसाचाराला प्रतिबंध करण्यात पंचायती राज संस्थांची भूमिका’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन


प्रत्येकाचे हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत वाढीव जागरुकता तसेच महिलांचे आर्थिक सक्षमीकरण ही लिंगाधारित हिंसाचार थांबवण्याची गुरुकिल्ली आहे – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

Posted On: 09 JAN 2024 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2024

 

केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे आभासी पद्धतीने ‘लिंगाधारित हिंसाचाराला (जीबीव्ही)प्रतिबंध करण्यात पंचायती राज संस्थांची भूमिका’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन केले. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते या वेळी, “लिंगाधारित हिंसाचारमुक्त पंचायती- नियुक्त प्रतिनिधींसाठी मार्गदर्शक पुस्तिका” देखील प्रकाशित करण्यात आली. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने भारतासाठीच्या संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (युएनएफपीए)सह संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज, अतिरिक्त सचिव डॉ.चंद्रशेखर कुमार, यूएनएफपीएच्या निवासी प्रतिनिधी आंद्रिया एम. वोजनार यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

   

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पंचायती राज संस्था आणि सर्व संबंधितांना लिंगाधारित हिंसा थांबवण्यासाठीच्या एकत्रित प्रयत्नांमध्ये अधिक विस्तृत जागरुकता, सामूहिक निर्धार, आर्थिक सशक्तीकरण आणि स्वयंविश्वासार्हता या महत्त्वाच्या घटकांचा अधिक वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. लिंगाधारित हिंसाचाराची व्यापक समस्या सोडवण्यासाठी  सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारण्याची तातडीची गरज आहे यावर त्यांनी अधिक भर दिला. देशभरातील महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणामध्ये योगदान देणाऱ्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीला वेग देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी विविध सरकारी विभागांची भागीदारी तसेच एनआरएलएम, जेजेएम, एसबीएम इत्यादींसारख्या विविध सरकारी योजनांच्या एकत्रीकरणाचे आवाहन केले. 

ग्रामीण भागात आर्थिक विकास, लिंग समानता तसेच महिला सशक्तीकरणाची जोपासना करण्यासाठी सरकारची कटिबद्धता लागू करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने हाती घेतलेल्या उपक्रमांची केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी प्रशंसा केली.सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात तसेच लिंगाधारित हिंसाचारासारख्या आव्हानांचा सामना करण्यात पंचायती राज संस्था तसेच ग्रामीण स्थानिक संस्था यांची भूमिका महत्त्वाची आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. महिला सशक्तीकरणाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व महत्त्वाच्या भागधारकांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी यावेळी केले.

केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध प्रभावी उपाययोजनांच्या मालिकेवर अधिक भर देत केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज यांनी यावेळी शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण, पंचायत विकास योजना, पंचायत विकास निर्देशांक आणि महिला सशक्तीकरण, समावेशन आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी अधिक चांगले वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हाती घेतलेल्या अशा इतर उपक्रमांचा उल्लेख केला.

पंतप्रधान जन धन योजने(पीएमजेडीवाय)सारख्या सरकारी योजनांनी अधिकाधिक महिलांना आर्थिक दृष्ट्या समाविष्ट आणि सक्षम होण्यास मदत केली,  एसबीएम-जी अभियानाअंतर्गत  घरगुती शौचालयांची उपलब्धता आणि पीएमएवाय-जी योजनेद्वारे राहत्या घरावर मालकीहक्क यातून महिलांचे समावेशन, आर्थिक सशक्तीकरण, प्रतिष्ठेत वाढ आणि जीवन जगण्यातील सुलभता साध्य होते हे याकडे विवेक भारद्वाज यांनी निर्देश केला.

महिलांचे सशक्तीकरण ही केवळ सामाजिक अत्यावश्यकता नसून कुटुंबे, समाज  यांचे सशक्तीकरण तसेच देशाच्या विकासासाठी आवश्यक घटक आहे यावर त्यांनी भर दिला.

युएनएफपीएच्या भारतातील निवासी प्रतिनिधी आंद्रिया एम. वोजनार यांनी लिंगाधारित हिंसाचाराच्या समस्येशी लढण्यासाठी सक्रियतेने पावले उचलल्याबद्दल केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचे आभार मानले. ही महत्त्वाची समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयाने दर्शवलेल्या कटिबद्धतेची प्रशंसा करत, त्यांनी अधिक सुरक्षित आणि अधिक समावेशक समाजाच्या निर्मितीसाठी सहयोगात्मक प्रयत्नाचे महत्त्व विषद केले.

पंचायत राज संस्थांतील नियुक्त प्रतिनिधींच्या भूमिकेची चर्चा करणे, लिंगाधारित हिंसाचाराशी संबंधित समस्यांवर उपापयोजना शोधणे आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांतील पंचायती राज विभाग, एनआयआरडी आणि पीआर, एसआयआरडी आणि पीआर, पंचायती राज प्रशिक्षण संघ आणि पंचायती तसेच इतर सर्व भागधारकांमध्ये याविषयी जागरुकता निर्माण करणे हा या कार्यशाळेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश होता.

  

शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण (एलएसडीजीज)करण्यासाठी एकत्रित प्रयत्न पुढे नेण्यास  या कार्यशाळेमुळे मदत होणार असून या कार्यशाळेचे आयोजन हे मूलभूत पातळीवर शाश्वत आणि समावेशक विकास साधण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने उचललेले अत्यंत महत्त्वाचे आणि अग्रणी पाऊल आहे.

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1994686) Visitor Counter : 71


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil