आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक आरोग्य संघटना करणार, रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण करणाऱ्या आयसीडी 11 मॉड्यूल 2 (मॉर्बिडिटी कोड्स) चे प्रकाशन


आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी उपचार पद्धतींवर आधारित रोगांशी संबंधित डेटा आणि शब्दावलीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या आयसीडी 11 वर्गीकरणामध्ये समावेश होणार

एएसयू (आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध) उपचार पद्धतींमध्ये रोगांची व्याख्या करणाऱ्या शब्द संहिते मध्ये जागतिक पातळीवर एकसमानता येणार

Posted On: 09 JAN 2024 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2024

 

जागतिक आरोग्य संघटनेच्या, ICD 11 TM Module 2, Morbidity Codes, अर्थात  रोगांचे वर्गीकरण करणाऱ्या (आयसीडी) आंतरराष्ट्रीय संहितेच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन 10 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे, आयोजित कार्यक्रमात होणार आहे. आयुर्वेद, सिद्ध, युनानी (एएसयु) उपचार पद्धतींवर आधारित रोगांशी संबंधित डेटा (विदा) आणि शब्दावली आता जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘आयसीडी 11’ वर्गीकरण यादीत समाविष्ट केली जाईल.

या प्रयत्नांमुळे एएसयू (आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध) उपचार पद्धतींमध्ये रोगांची व्याख्या करणाऱ्या शब्दसंग्रह संहिते मध्ये जागतिक पातळीवर एकसमानता येईल. 

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आंतरराष्ट्रीय स्तरावर रोगांचे वर्गीकरण करण्यासाठी रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण (ICDs) ही मालिका विकसित केली आहे. आजारांवरील सध्या उपलब्ध असलेला जागतिक डेटा प्रामुख्याने आधुनिक बायोमेडिसिन (जैव वैद्यक शास्त्र) द्वारे निदान केल्या जाणार्‍या आरोग्यसेवा पद्धतींवर आधारित आहे. आयुर्वेद, सिद्ध, युनानी इत्यादी आयुष उपचार पद्धतींवर आधारित रोगांशी संबंधित डेटा आणि संज्ञांचे वर्गीकरण अद्याप जागतिक आरोग्य संघटनेच्या आयसीडी मालिकेत समाविष्ट केलेले नाही.

सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स (CBHI) ही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत असलेली संस्था आयसीडी-संबंधित उपक्रमांसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे सहयोग केंद्र म्हणून काम करते. विविध रोग आणि मृत्युदरावरील डेटाचे संकलन आणि प्रसार  यामध्ये ही संस्था सहाय्य करते. आयुष मंत्रालयाने नॅशनल आयुष मॉर्बिडिटी अँड स्टँडर्डाइज्ड इलेक्ट्रॉनिक पोर्टल (NAMSTE) द्वारे यापूर्वीच आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी औषधांसाठी संहिता (शब्दावली) विकसित केली आहे.

आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहयोगाने आयसीडी 11 मालिकेच्या TM2 मॉड्यूल अंतर्गत आयुष - आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी उपचार पद्धतींवर आधारित रोगांशी संबंधित डेटा आणि शब्दावलीचे वर्गीकरण तयार केले आहे. हे वर्गीकरण उपलब्ध करून देण्यासाठी आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेबरोबर करारही केला आहे.

या प्रयत्नांमुळे भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवा वितरण प्रणाली, संशोधन, आयुष विमा संरक्षण, संशोधन आणि विकास आणि धोरण-निर्धारण प्रणालींना अधिक बळकटी मिळेल आणि त्याचा विस्तार होईल. याशिवाय, समाजातील विविध रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यातील रणनीती तयार करण्यामध्ये ही शब्दावली उपयोगी ठरेल. जागतिक आरोग्य संघटनेचे इतर अनेक सदस्य देश देखील आयसीडी मध्ये पारंपरिक वैद्यकीय रोगांच्या शब्दावली समाविष्ट करण्यासाठी समान प्रारूप लागू करण्यासाठी उत्सुक आहेत.

मलेरियासारखे संसर्गजन्य रोग आणि दीर्घकालीन निद्रानाश यासारख्या जीवनशैलीशी निगडीत आजारांचा देखील या वर्गीकरणात समावेश करण्यात आला आहे. व्हर्टिगो गाईडन्स डिसऑर्डर (मूळ नाव), हा आजार आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी या तीन पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये सामान्यतः मज्जासंस्थेचा विकार म्हणून ओळखला जातो. या आजाराला आयुर्वेदात 'भ्रमह' सिद्ध, 'अजल किरकृपू' आणि युनानीमध्ये 'सद्र-ओ-द्वार' म्हणून ओळखले जाते.

आयसीडी-11 अंतर्गत, अशा शब्दावली आणि नावांचे आंतरराष्ट्रीय कोडिंग केले जाईल, आणि आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी उपचार पद्धतींमधील प्रचलित रोगांची नावे आणि डेटा आंतरराष्ट्रीय स्तरावर TM 2 मॉड्यूलद्वारे कोडमध्ये सूचीबद्ध केला जाईल. 10 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालयाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आयसीडी 11 प्रकाशित केला जाईल.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1994670) Visitor Counter : 183


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu