ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
'प्रशिक्षण(कोचिंग) क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध आणि नियमन' समितीची बैठक
सर्व प्रशिक्षण(कोचिंग) संस्थांना मार्गदर्शक तत्त्वे होणार लागू
प्रशिक्षण(कोचिंग) संस्थांकडून यशस्विता दर, निवडीची संख्या इत्यादींबाबतचे खोटे दावे रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे
Posted On:
09 JAN 2024 7:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2024
प्रशिक्षण(कोचिंग) क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची पहिली बैठक, 8 जानेवारी 2024 रोजी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सी. सी. पी. ए.) घेतली. मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यावर समितीने चर्चा केली.
समितीचे अध्यक्ष रोहित कुमार सिंग आहेत तर ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव आणि सी. सी. पी. ए. चे मुख्य आयुक्त यांच्यासह इतर आयुक्त (सी. सी. पी. ए.), कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (डी. ओ. पी. टी.), शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय विधी विद्यापीठ (एन. एल. यू.), दिल्ली, एफ. आय. आय. टी. जे. ई. ई., खान ग्लोबल स्टडीज आणि इकिगाई लॉचे प्रतिनिधी हे या समितीचे सदस्य आहेत. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (एल. बी. एस. एन. ए. ए.) या बैठकीत सहभागी झाली होती.
सचिव (ग्राहक व्यवहार) आणि मुख्य आयुक्त (सी. सी. पी. ए.) रोहित कुमार सिंग यांनी यावेळी आपली भूमिका मांडली. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण हा सी. सी. पी. ए. साठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. विशेषतः प्रशिक्षण क्षेत्रातील जाहिरातींशी संबंधित काही पैलूंबाबत स्पष्टता आणण्याची गरज आहे असे ते म्हणाले. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यावर सी. सी. पी. ए. चा ठाम विश्वास आहे आणि ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा सेवांची खोटी किंवा दिशाभूल करणारी जाहिरात केली जाणार नाही याची ते खातरजमा करतात असेही त्यांनी सांगितले.
ही मार्गदर्शक तत्त्वे सर्व प्रशिक्षण संस्थांना, मग ती ऑनलाईन असो किंवा प्रत्यक्ष, लागू होतील आणि त्यात स्वरूप किंवा माध्यम काहीही असो, सर्व प्रकारच्या जाहिरातींचा समावेश असेल. यशस्वी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रमासंदर्भात काही माहिती लपवली असेल, उदाहरणार्थ अभ्यासक्रम सशुल्क आहे की निःशुल्क आणि त्याचा कालावधी किती आहे वगैरे तर त्या प्रशिक्षण संस्थेने दिलेली जाहिरात, ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये स्पष्टपणे सांगितल्यानुसार दिशाभूल करणारी आहे असा त्याचा अर्थ निघू शकतो असे या असं या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.
प्रशिक्षण संस्थांनी यशाची टक्केवारी व निवडींची संख्या आणि ग्राहकांचा गैरसमज होऊ शकतो किंवा ग्राहक स्वायत्तता आणि निवड यांचे उल्लंघन होऊ शकेल, अशा इतर कोणत्याही पद्धतींबाबत खोटे दावे करू नयेत, अशी तरतूदही मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आहे.
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काय करावे आणि काय करू नये हे देखील विहित करण्यात आले असून जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी ते पाहावे.
- प्रशिक्षण संस्थेने यशस्वी उमेदवाराच्या छायाचित्रासह आवश्यक माहिती नमूद करावी:-
- यशस्वी उमेदवाराचा क्रमांक
- यशस्वी उमेदवाराने निवडलेला अभ्यासक्रम
- अभ्यासक्रमाचा कालावधी
- अभ्यासक्रम सशुल्क होता की मोफत
- प्रशिक्षण संस्थांनी 100% निवड किंवा 100% नोकरीची हमी किंवा प्रीलिम अथवा मुख्य परीक्षेची हमी असे दावे करू नयेत.
- जाहिरातीतील अस्वीकरण/प्रकटीकरण/महत्त्वाच्या माहितीचा फॉन्ट जाहिरात/दावा यात वापरल्याप्रमाणेच असावा. अशा माहितीचे स्थान जाहिरातीमध्ये दिसेल अशा स्थानी ठळक असावे.
प्रशिक्षण संस्थांद्वारे दिशाभूल करणार्या जाहिरातींसाठी दंड ग्राहक संरक्षण कायदा, 2019 नुसार शासित केला जाईल. मार्गदर्शक तत्त्वे केवळ भागधारकांना याबाबत अधिक स्पष्ट कल्पना देण्याच्या स्वरूपातील आहेत आणि यासंदर्भातले ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे उल्लंघन हे ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील सध्याच्या तरतुदींतर्गत शासित असेल, हेदेखील स्पष्ट करण्यात येत आहे.
मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची नितांत गरज असल्याचे समितीचे निरीक्षण असून बैठकीत चर्चा केल्याप्रमाणे मसुदा लवकरात लवकर जारी केला जावा.
सीसीपीएने प्रशिक्षण संस्थांद्वारे दिशाभूल करणार्या जाहिरातींवर स्वाधिकाराने कारवाई केली होती. या संदर्भात सीसीपीएने 31 प्रशिक्षण संस्थांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी नोटिसा बजावल्या आहेत आणि त्यातील 9 जणांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.
काही प्रशिक्षण संस्था यशस्वी उमेदवारांनी निवडलेला अभ्यासक्रम, त्यांनी उपस्थिती लावलेल्या अभ्यासक्रमाचा कालावधी आणि उमेदवारांनी भरलेले शुल्क यासंबंधी महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपवून ग्राहकांची दिशाभूल करतात, असे सीसीपीएचे निरीक्षण आहे. काही प्रशिक्षण संस्था सत्यापित केलेल्या पुराव्यांशिवाय 100% निवड, 100% नोकरीची हमी आणि प्रीलिम आणि मुख्य परीक्षेची हमी यांसारखे दावे करत असल्याचेही सीसीपीएच्या निदर्शनाला आले आहे.
* * *
S.Patil/Vinayak/Sonali K/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1994628)
Visitor Counter : 185