पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधताना केलेले भाषण
Posted On:
08 JAN 2024 3:23PM by PIB Mumbai
सर्व देशवासियांना माझा आदरपूर्वक नमस्कार !
2-3 दिवसांपूर्वीच विकसित भारत संकल्प यात्रेला 50 दिवस पूर्ण झाले.इतक्या अल्प वेळेत या यात्रेत 11 कोटी लोक सहभागी होणे ही अभूतपूर्व गोष्ट आहे.समाजाच्या टोकाशी असलेल्या व्यक्तीपर्यंत सरकार स्वतः पोहोचत आहे, आपल्या योजनांशी त्यांना जोडून घेत आहे. विकसित भारत संकल्प यात्रा केवळ सरकारची नव्हे तर संपूर्ण देशाची यात्रा ठरली आहे, स्वप्नांची यात्रा ठरली आहे, संकल्पांची यात्रा बनली आहे.विश्वासाची यात्रा बनली आहे आणि म्हणूनच मोदी की गॅरेंटी वाली गाडीकडे मोठ्या भावनेने आज देशाचे प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक कुटुंब,आपल्या उज्वल भविष्याची उमेद म्हणून या गॅरेंटी वाल्या गाडीकडे पाहत आहे. गाव असो किंवा शहर प्रत्येक ठिकाणी या यात्रेबाबत उमेद आहे, उत्साह आहे, विश्वास आहे. मुंबईसारखे महानगर असो किंवा मिझोरम मधले दूरवरचे दुर्गम गाव, कारगिलचे डोंगर असोत किंवा कन्याकुमारीचा समुद्र किनारा,देशाच्या कानाकोपऱ्यात मोदी की गॅरेंटी वाली गाडी पोहोचत आहे.ज्या गरिबांचे जीवन सरकारी योजनांचा लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत गेला ते आज अर्थपूर्ण परिवर्तन अनुभवत आहेत. हे सरकारी कर्मचारी,सरकारी अधिकारी,नेता हे लोक गरीबाच्या दरवाज्यात येऊन आपल्याला सरकारी योजनांचा लाभ मिळाला की नाही असे विचारतील अशी कल्पना कोणी केली होती का ? मात्र असे घडत आहे,अतिशय इमानदारीने होत आहे.मोदी की गॅरेंटी वाली गाडीसह सरकारी कार्यालय,जन प्रतिनिधी,देशवासियांजवळ, त्यांच्या गावात-मोहल्ल्यात पोहोचत आहेत.आता ज्या लोकांशी माझा संवाद झाला त्यांच्या चेहऱ्यावरही याचा आनंद दिसत आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
आज देशातच नव्हे तर जगभरातही मोदी की गॅरेंटी
याची मोठी चर्चा होत आहे. मात्र मोदी की गॅरेंटी याचा अर्थ काय आहे ? देशातल्या प्रत्येक लाभार्थ्या पर्यंत मिशन मोडद्वारे सरकार पोहोचण्या साठी हे इतकी मेहनत का करतात, सरकार आपल्या सेवेसाठी अखंडपणे इतकी मेहनत का करत आहे ? सरकारी योजना पात्र सर्वच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आणि विकसित भारत यांचा काय सबंध आहे ?
आपल्या देशात अनेक पिढ्यांनी सोयुसुविधांच्या अभावात आयुष्य घालवले, स्वप्ने अपूर्ण राहिली.अभाव हेच आपले नशीब मानले आणि अशा अभावातच त्यांना जीवन व्यतीत करणे भाग पडले. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी हा संघर्ष देशातल्या गरीब,शेतकरी,महिला आणि युवा वर्गाला अधिक झेलावा लागला.वर्तमान आणि भावी पिढ्यांना असे जीवन जगायला लागू नये,आपल्या आधीच्या पिढ्यांनी, वयोवृद्धांनी ज्या समस्यांना तोंड दिले, त्या आपल्याला सोसाव्या लागू नयेत असा सरकारचा प्रयत्न आहे आणि हेच उद्दिष्ट घेऊन आम्ही इतकी मेहनत करत आहोत. देशातल्या मोठ्या लोकसंख्येला दैनंदिन जीवनासाठीच्या छोट्या-छोट्या गरजांसाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षातून त्यांना बाहेर काढण्याचा सरकारचा उद्देश आहे.म्हणूनच आम्ही गरीब,शेतकरी,महिला आणि युवा वर्गावर लक्ष केंद्रित करत आहोत आणि आमच्यासाठी या देशातल्या सर्वात मोठ्या चार जाती आहेत. जेव्हा गरीब,शेतकरी,महिला आणि युवा या चार जाती, ज्या माझ्या सर्वात प्रिय जाती आहेत, त्या बळकट झाल्या तर हिंदुस्तान नक्कीच बळकट होईल.म्हणूनच ही विकसित भारत यात्रा सुरु झाली आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जात आहे.
मित्रांनो,
कोणीही पात्र लाभार्थी सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहता कामा नये. काही वेळा जागृतीच्या अभावी,काही वेळा इतर कारणांमुळे काही लोक सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहतात, अशा लोकांपर्यंत पोहोचणे हे आपले दायित्व आहे असे आमचे सरकार मानते. म्हणूनच मोदी की गॅरेंटी ही गाडी गावा-गावात पोहोचत आहे.जेव्हापासून ही यात्रा सुरु झाली आहे सुमारे 12 लाख नव्या लाभार्थींनी उज्वला गॅस योजनेच्या मोफत जोडणीसाठी अर्ज केला आहे. काही दिवसांपूर्वी मी अयोध्या इथे होतो तेव्हा उज्वला योजनेच्या 10 कोटीव्या लाभार्थी भगिनीच्या घरी गेलो होतो.याशिवाय सुरक्षा विमा योजना,जीवन ज्योती विमा योजना,पीएम स्वनिधी या योजनांसाठीही यात्रे दरम्यान लाखो अर्ज प्राप्त झाले आहेत.
मित्रांनो,
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान 2 कोटीहून अधिक गरिबांची आरोग्य तपासणी झाली आहे.याच काळात एक कोटी लोकांची क्षयरोग तपासणी,22 लाख लोकांची सिकल सेल अॅनिमिया तपासणी झाली आहे. हे सर्व लाभार्थी बंधू-भगिनी कोण आहेत ?हे सर्व जण गाव-गरीब,दलित,मागास आदिवासी समाजातले लोक आहेत,ज्यांच्यासाठी पूर्वीच्या सरकारच्या काळात डॉक्टरपर्यंत पोहोचणे हे एक मोठे आव्हान होते. आज डॉक्टर तिथेच त्यांची तपासणी करत आहेत आणि प्रारंभिक तपासणी नंतर आयुष्मान योजने अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार तर आहेतच.
किडनीच्या रुग्णांसाठी मोफत डायलिसिसची सुविधा आणि जनऔषधी केंद्रांवर स्वस्त औषधे देखील उपलब्ध आहेत. देशभरात बांधली जाणारी ही आयुष्मान आरोग्य मंदिरे, गावांसाठी आणि गरिबांसाठी मोठी आरोग्य केंद्रे बनली आहेत. म्हणजेच विकसित भारत संकल्प यात्रा गरिबांच्या आरोग्यासाठीही वरदान ठरली आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
आपल्या करोडो माता भगिनींना सरकारच्या या प्रयत्नांचा मोठा लाभ मिळतो आहे, याचा मला आनंद आहे. आज महिला स्वत: पुढे येऊन नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहेत. पूर्वी अशा अनेक भगिनी होत्या ज्यांच्या हातात शिवणकाम, भरतकाम आणि विणकाम असे काही कौशल्य होते, मात्र त्यांच्याकडे आपले काम सुरू करण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. मुद्रा योजनेने त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा आत्मविश्वास दिला आहे, मोदींची हमी आहे. आज प्रत्येक गावात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. आज काही बँक मित्र आहेत, काही प्राणीमित्र आहेत, काही आशा-एएनएम-अंगणवाडीत आहेत. गेल्या 10 वर्षात 10 कोटी भगिनी महिला बचत गटांमध्ये सामील झाल्या आहेत. या भगिनींना 7.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त सहाय्य दिले गेले आहे. यातील अनेक भगिनी गेल्या काही वर्षांत लखपती दीदी झाल्या आहेत. आणि हे यश पाहून मी स्वप्न पाहिले आहे, संकल्पाच्या रूपात मी हे स्वप्न पाहिले आहे आणि आम्ही ठरवले आहे की दोन कोटी, हा आकडा खूप मोठा आहे. मला दोन कोटी लखपती दीदी घडवायच्या आहेत. जरा विचार करा, लखपती दीदींची संख्या दोन कोटींवर पोहोचली तर किती मोठी क्रांती होईल. सरकारने नमो ड्रोन दीदी योजनाही सुरू केली आहे. मला सांगण्यात आले आहे की विकसित संकल्प यात्रेदरम्यान सुमारे 1 लाख ड्रोनचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच मिशन मोडवर अशा प्रकारे जनतेला कोणत्याही तंत्रज्ञानाशी जोडले जाते आहे. सध्या केवळ कृषी क्षेत्रात ड्रोन वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र येत्या काही दिवसांत त्याची व्याप्ती इतर क्षेत्रांतही विस्तारणार आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
आपल्या देशात पूर्वीच्या सरकारांमध्ये शेतकरी आणि कृषी धोरणाबाबतच्या चर्चेची व्याप्ती फारच मर्यादित होती. शेतकरी सक्षमीकरणाची चर्चा केवळ उत्पादन आणि विक्रीपुरती मर्यादित राहिली. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. हाय विचार करून शेतकऱ्यांची प्रत्येक अडचण दूर करण्यासाठी आमच्या सरकारने चौफेर प्रयत्न केले. पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला किमान 30 हजार रुपये देण्यात आले आहेत. छोट्या शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. कृषी क्षेत्रातील सहकाराला चालना देणे हे याच विचाराचे फलित आहे. PACS असो, FPO असो, छोट्या शेतकऱ्यांच्या अशा संघटना आज एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून आकाराला येत आहेत. साठवणूक सुविधांपासून ते अन्न प्रक्रिया उद्योगापर्यंत शेतकऱ्यांच्या अशा अनेक सहकारी संस्था आम्ही पुढे आणत आहोत. काही दिवसांपूर्वी सरकारने डाळ उत्पादक शेतकऱ्यांसाठीही मोठा निर्णय घेतला आहे. आता कडधान्य उत्पादक शेतकरी थेट सरकारला डाळ ऑनलाइनही विकू शकणार आहेत. यामध्ये डाळ उत्पादक शेतकऱ्यांना केवळ एमएसपीवर खरेदीची हमी मिळणार नाही, तर बाजारात चांगला भाव मिळण्याची हमीही मिळेल. सध्या तूरडाळीसाठी ही सुविधा देण्यात आली आहे. मात्र येत्या काळात त्याची व्याप्ती इतर कडधान्यांपर्यंतही वाढवण्यात येणार आहे. आपण परदेशातून डाळ खरेदी करण्यासाठी जो पैसा पाठवतो तो देशातील शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
मित्रहो,
विकसित भारत संकल्प यात्रेत माझ्या सोबत असणाऱ्या, हे काम सांभाळणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचेही मी कौतुक करू इच्छितो. अनेक ठिकाणी थंडी वाढत आहे, अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे, अडचणीही येत आहेत. मात्र असे असतानाही या संकल्प यात्रेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा आणि लोकांचे जीवनमान उंचावावे, यासाठी स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारीही पूर्ण निष्ठेने काम करत आहेत. अशाच प्रकारे आपले कर्तव्य बजावून आपल्याला पुढे जायचे आहे, देशाला विकसित करायचे आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना अनेकानेक शुभेच्छा! आणि ज्या लोकांशी मला संवाद साधण्याची संधी मिळाली, त्यांचे अनेक पैलू मला जाणून घेता आले आणि त्यांचा आत्मविश्वास मी पाहिला, त्यांच्या वक्तव्यात मला संकल्प दिसून आला. ही खऱ्या अर्थाने भारतातील सामान्य माणसाची क्षमता आहे, हीच क्षमता देशाला पुढे नेणार आहे आणि याची अनुभूती होऊ लागली आहे. आज देशातील प्रत्येक व्यक्ती, 2047 साली भारताला विकसित भारत बनवण्याच्या उद्देशाने काम करत, हे आपले सर्वांचे सौभाग्य आहे. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि जेव्हा विकसित यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळेल, तेव्हा आपण नक्कीच पुन्हा भेटू. अनेकानेक आभार!
***
SonalT/NC/MP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1994448)
Visitor Counter : 162
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam