संरक्षण मंत्रालय
प्रजासत्ताक दिन सोहळा 2024: वीर गाथा 3.0 मध्ये देशभरातील तब्बल 1.37 कोटी विद्यार्थ्यांचा सहभाग; निवडक 100 विजेत्यांना विशेष अतिथी म्हणून 26 जानेवारीचे संचलन पाहता येणार
Posted On:
05 JAN 2024 6:01PM by PIB Mumbai
प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने ‘वीर गाथा’ हा संयुक्त उपक्रम आयोजित केला होता. या संयुक्त प्रकल्पाच्या तिसर्या आवृत्तीला संपूर्ण भारतातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशभरातील सुमारे 2.43 लाख शाळांमधील 1.37 कोटी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला. त्यामधून राष्ट्रीय स्तरावर 100 विजेते निवडण्यात आले आहेत. या 100 विजेत्यांच्या यादीमध्ये - इयत्ता 3री ते 5वी गट, इयत्ता 6 वी ते 8 वी गट; इयत्ता 9वी ते 10वी आणि इयत्ता 11वी ते 12वी या प्रत्येक श्रेणीमध्ये प्रत्येकी 25 जणांचा समावेश आहे. विजेत्यांची यादी खाली दिली आहे:
(विजेत्या 100 जणांची सूची )
वीर गाथा 3.0 हा प्रकल्प 13 जुलै 2023 रोजी सुरू करण्यात आला. यामध्ये निबंध आणि परिच्छेद लेखनासाठी वैचारिक विषय दिले गेले. विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या ‘रोल मॉडेल’ सारख्या संकल्पनांचा शोध घेवून सादर करण्याचा पर्याय देण्यात आला. विशेषत: शौर्य पुरस्कार विजेत्यांवर लक्ष केंद्रित करणे; तसेच राणी लक्ष्मीबाईंसारख्या प्रेरणा देणार्या कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकाच्या जीवनकथांचा सखोल अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या वैविध्यपूर्ण विषयांनी वीर गाथा 3.0 ची सामग्री केवळ समृद्ध झाली नाही तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा या गोष्टींची सखोल माहितीही सहभागी मुलांना मिळाली.
वीर गाथा 3.0 चा शालेय स्तरावरील उपक्रम 30 सप्टेंबर 2023 रोजी पूर्ण झाला.
यानंतर राज्य आणि जिल्हा स्तरावरील मूल्यमापनांच्या मालिकेनंतर, राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापनासाठी जवळपास 3,900 प्रवेशिका सादर करण्यात आल्या. शिक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या समितीने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या (यूटी) राज्य नोडल अधिकार्यांनी मंजूर केलेल्या 100 सर्वोत्तम नोंदींची निवड केली. प्रत्येक विजेत्याला 10,000 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे आणि विशेष अतिथी म्हणून कर्तव्यपथ येथे होणा-या प्रजासत्ताक दिन संचलन - 2024 चे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे.
स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करण्यासाठी, सरकारने ’स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या काय्रक्रमाचा एक भाग म्हणून ‘वीर गाथा’ हा प्रकल्प सुरू केला होता.
***
N.Chitale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1993674)
Visitor Counter : 193