संरक्षण मंत्रालय
व्हाईस ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी, एव्हीएसएम, एनएम यांनी स्वीकारला नौदलाच्या उपप्रमुखपदाचा कार्यभार
Posted On:
04 JAN 2024 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2024
व्हाईस ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी, एव्हीएसएम, एनएम यांनी आज 4 जानेवारी 2023 रोजी नौदलाच्या उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यावर ध्वज अधिकारी त्रिपाठी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशाची सेवा करताना हौतात्म्य पत्करणाऱ्या वीरांना अभिवादन केले. नौदलाच्या उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी व्हाईस ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी वेस्टर्न नेव्हल कमांडचे प्रमुख ध्वज अधिकारी म्हणून काम केले आहे.
रेवा सैनिकी शाळा आणि खडकवासल्यांच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले त्रिपाठी 1 जुलै 1985 रोजी नौदलाच्या सेवेत रुजू झाले. दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्धनीतीचे विशेषज्ञ असलेल्या त्रिपाठी यांनी यापूर्वी नौदलाच्या प्रमुख युद्धनौकांवर सिग्नल कम्युनिकेशन अधिकारी आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर अधिकारी म्हणून आणि त्यानंतर आयएनएस मुंबई या गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर युद्धनौकेवर कार्यकारी अधिकारी आणि प्रधान युद्धनीती अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांनी भारतीय नौदलाच्या विनाश, कर्च आणि त्रिशूल या युद्धनौकांची धुरा सांभाळली आहे.
2019 मध्ये वाईस ऍडमिरल पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्रिपाठी यांची केरळमधील एझिमला येथील प्रतिष्ठेच्या भारतीय नौदल अकादमीचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. जुलै 2020 ते मे 2021 या कालावधीत ते नौदल परिचालनाचे महासंचालक होते ज्या काळात नौदलाच्या सागरी परिचालनामध्ये सर्वाधिक वाढीची नोंद झाली. कोविड महामारीच्या मोठ्या प्रमाणात उद्रेक असलेल्या काळात अतिशय गुंतागुंतीच्या सुरक्षाविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी नौदल नेहमीच युद्धसज्ज, विश्वासपात्र, एकसंध आणि भविष्यासाठी सज्ज दल असेल हे त्यांनी सुनिश्चित केले. त्यानंतर जून 21 ते फेब्रुवारी 23 या काळात ध्वज अधिकारी त्रिपाठी यांनी कार्मिक प्रमुख म्हणून काम केले. वाईस ऍडमिरल त्रिपाठी यांनी त्यांच्या सेवेत दाखवलेल्या समर्पित वृत्तीबद्दल त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक आणि नौसेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1993045)
Visitor Counter : 124