ऊर्जा मंत्रालय
आरईसी लिमिटेडने रेल्वे विकास निगम लिमिटेडबरोबर सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी, या करारान्वये मल्टी-मॉडल पायाभूत सुविधा प्रकल्पांना पुढील 5 वर्षांत 35,000 कोटी रुपयांपर्यंत वित्तपुरवठा केला जाणार
Posted On:
03 JAN 2024 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जानेवारी 2024
आरईसी लिमिटेडने रेल्वे विकास निगम लिमिटेडबरोबर (RVNL) सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली असून या करारानुसार रेल्वे विकास निगम लिमिटेड द्वारे पुढील 5 वर्षांमध्ये राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 35,000 कोटी रुपयांपर्यंत वित्तपुरवठा केला जाणार आहे. यामध्ये रेल्वे विकास निगम लिमिटेड प्रथमच हात आजमावत असलेल्या मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हब प्रकल्प, रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते, बंदर आणि मेट्रो प्रकल्प यांचा समावेश आहे.

आरईसी चे संचालक (वित्त), अजॉय चौधरी आणि रेल्वे विकास निगम लिमिटेडचे संचालक (कार्यान्वयन) राजेश प्रसाद यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी आरईसी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्ही के देवांगन, रेल्वे विकास निगम लिमिटेडचे संचालक (वित्त) संजीब कुमार, रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या संचालक (कार्मिक) अनुपम बन तसेच आरईसी आणि रेल्वे विकास निगम लिमिटेडचे इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
आरईसी लिमिटेड, ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत 1969 मध्ये स्थापित एक महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. हा उपक्रम वीज-पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी दीर्घकालीन कर्ज आणि इतर वित्त उत्पादने प्रदान करतो. यामध्ये निर्मिती, पारेषण, वितरण, नवीकरणीय ऊर्जा यांच्यासह इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी स्टोरेज आणि हरित हायड्रोजन सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा समावेश आहे. अगदी अलीकडे, आरईसी लिमिटेडने रस्ते आणि द्रुतगती मार्ग, मेट्रो रेल्वे, विमानतळ, आयटी कम्युनिकेशन, सामाजिक आणि व्यावसायिक पायाभूत सुविधा (शैक्षणिक संस्था, रुग्णालये), बंदरे आणि इलेक्ट्रो-मेकॅनिकल (E&M) कामांचा समावेश असलेल्या गैर-उर्जा पायाभूत सुविधा क्षेत्रासह स्टील आणि रिफायनरी सारख्या इतर विविध क्षेत्रात देखील विविधता आणली आहे. आरईसी चे कर्ज खाते 4,74,275 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
रेल्वे विकास निगम लिमिटेड, हा रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत "शेड्यूल 'A' नवरत्न" केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या सुमारे 30% पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करत असून PPP मॉडेल अंतर्गत मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा मार्गही सुरू केला आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड प्रामुख्याने रेल्वे प्रकल्प हाती घेत असला तरीही या उपक्रमाने आता रस्ते, बंदर, पाटबंधारे आणि मेट्रो प्रकल्पांमध्येही प्रवेश केला आहे. यापैकी अनेकांचा रेल्वे पायाभूत सुविधांशी एक ना एक मार्गाने संबंध जोडलेला आहे.
N.Meshram/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1992736)
Visitor Counter : 141