राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

यकृत आणि पित्त विज्ञान संस्थेच्या (आयएलबीएस) नवव्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्या सहभागी

Posted On: 27 DEC 2023 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (27 डिसेंबर 2023) नवी दिल्ली येथे यकृत आणि पित्त विज्ञान संस्थेच्या (आयएलबीएस) नवव्या दीक्षांत समारंभात सहभागी झाल्या. त्यांनी यावेळी उपस्थितांना संबोधितही केले.

आय. एल. बी. एस. ने केवळ 13 वर्षांच्या कालावधीत जागतिक दर्जाची कार्यक्षमता आणि सचोटीच्या बळावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे असे यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या. आय. एल. बी. एस. मध्ये 1000 हून अधिक यकृत प्रत्यारोपण आणि अंदाजे 300 मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तुलनेने कमी खर्चात जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवून आय. एल. बी. एस. सारख्या संस्थांच्या बळावर भारत आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा केंद्र म्हणून पुढे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

जीवन विज्ञान आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत असे राष्ट्रपती म्हणाल्या. आय. एल. बी. एस. मध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता अभ्यास विभागाची स्थापना हा एक समयोचित उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. आय. एल. बी. एस. ने उपचार करण्याबरोबरच संशोधन क्षेत्रात काम करत राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. यकृत हे आपल्या शरीराचे सुरक्षा रक्षक आहे. आपल्या देशात यकृताशी संबंधित आरोग्याच्या समस्या गंभीर आहेत आणि त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे रोग हे चिंतेचे कारण आहेत. यकृताचे आजार रोखण्यासाठी आय. एल. बी. एस. महत्त्वपूर्ण योगदान देईल अशी अपेक्षा आहे, असे त्या म्हणाल्या.

पुरेशा संख्येने अवयव उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्ण यकृत, मूत्रपिंड किंवा इतर प्रत्यारोपणापासून वंचित राहतात. दुर्दैवाने, अवयवदानाशी संबंधित अनैतिक व्यवहार देखील वेळोवेळी प्रकाशात येतात. या समस्यांचे निराकरण करणे ही जागरूक समाजाची जबाबदारी आहे. आपल्या देशात अवयवदानाबद्दल लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकाधिक जनजागृती मोहिमा आयोजित करण्याची गरज आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या.

डॉक्टरांनी स्वतःची काळजी घ्यावी असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला. कामाच्या लांबणाऱ्या वेळा, सततचे आपत्कालीन उपचार आणि रात्रीची कामे यासारख्या आव्हानांमध्ये, डॉक्टरांना सतत पूर्ण सतर्कतेने आणि उत्साहाने रुग्णांची सेवा करावी लागते, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे, सर्व आव्हाने असूनही, त्या सर्वांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या निरोगी आणि सतर्क राहणे महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

N.Meshram/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1990797) Visitor Counter : 97