मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
भारतीय कुक्कुटपालन क्षेत्रातील निर्यातीला चालना देण्यासाठी आणि नवी दिल्लीत कुक्कुटपालन परिसंस्था मजबूत करण्यासाठी आव्हाने आणि धोरणे जाणून घेण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली आघाडीच्या पोल्ट्री निर्यातदारांसोबत गोलमेज बैठक
अंडी आणि ब्रॉयलरचे उत्पादन दरवर्षी 8 ते 10 टक्के दराने वाढत आहे - अलका उपाध्याय
निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विभागाने 33 पोल्ट्री कंपार्टमेंट्स एव्हियन इन्फ्लुएंझा- मुक्त असल्याचे नमूद केले : उपाध्याय
2022-23 या आर्थिक वर्षात भारताने 57 पेक्षा जास्त देशांना 1,081.62 कोटी रुपये (134.04 दशलक्ष डॉलर) मूल्याची एकूण 664,753.46 मेट्रिक टन पोल्ट्री उत्पादनांची केली निर्यात
Posted On:
23 DEC 2023 3:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 23 डिसेंबर 2023
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिव अलका उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली येथे गोलमेज बैठक झाली. या धोरणात्मक बैठकीत "भारतीय पोल्ट्री उत्पादनांची निर्यात: पोल्ट्री परिसंस्था मजबूत करण्यासंबंधी आव्हाने आणि धोरणे" या विषयावर चर्चा करण्यासाठी आघाडीच्या कंपन्या, राज्य सरकारे आणि उद्योग संघटनांसह प्रमुख भागधारक एकत्र आले होते.
बैठकीमध्ये अलका उपाध्याय यांनी अधोरेखित केले की भारतीय कुक्कुटपालन क्षेत्र आता शेतीचा अविभाज्य भाग असून प्रथिने आणि पौष्टिक गरजा पूर्ण करण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पिकांचे उत्पादन वर्षाला दीड ते दोन टक्के दराने वाढत असताना, अंडी आणि ब्रॉयलरचे उत्पादन वर्षाला 8 ते 10 टक्के दराने वाढत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये ते, मोठा उद्योग म्हणून उदयाला आले आहे आणि भारताला अंडी आणि ब्रॉयलर मांसाचे प्रमुख जागतिक उत्पादक म्हणून स्थान मिळवून दिले आहे.
निर्यातीला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग विविध उपक्रम हाती घेत आहे, असे अलका उपाध्याय यांनी सांगितले. विभागाने नुकतेच उच्च पॅथोजेनिसिटी एव्हियन इन्फ्लुएंझापासून मुक्ती मिळाल्याचे स्वतःहून घोषित केले आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विभागाने 33 पोल्ट्री कंपार्टमेंट्स एव्हियन इन्फ्लूएंझापासून मुक्त असल्याचे नमूद केले आहे. वैधतेच्या आधारे विभागाने जागतिक प्राणी आरोग्य संघटनेकडे 26 विभाग अधिसूचित केले आहेत. 13 ऑक्टोबर 2023 रोजी, जागतिक प्राणी आरोग्य संघटनेने त्याला मंजुरी दिली. त्याचबरोबर विभागाने गेल्या काही वर्षांत खाद्य टंचाईची समस्या सोडवण्यासाठी उपक्रम हाती घेतले आहेत. तसेच कोविड काळात पोल्ट्री उत्पादनांच्या वापराविरुद्ध देशभर पसरलेली दिशाभूल करणारी माहिती खोडून काढण्यासाठी विभागाने पावले उचलली आहेत.
अलका उपाध्याय यांनी पोल्ट्री निर्यातीला चालना देणे, भारतीय पोल्ट्री क्षेत्र मजबूत करणे, व्यवसाय सुलभता वाढवणे, पोल्ट्री उत्पादन निर्यातीतील आव्हाने दूर करणे आणि अनौपचारिक क्षेत्रातील कंपन्यांच्या एकत्रीकरणाची रणनीती आखणे तसेच जागतिक पातळीवर पोल्ट्री क्षेत्राची स्थिती आणखी मजबूत करण्यावर प्रामुख्याने भर दिला. पोल्ट्री आणि पोल्ट्री-संबंधित उत्पादनांचा आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यासाठी पोल्ट्री कंपार्टमेंटलायझेशनची संकल्पना स्वीकारून इन्फ्लुएंझाशी संबंधित धोका कमी करण्यासाठी विभागाच्या सक्रिय दृष्टिकोनाबाबत त्यांनी आपले विचार मांडले.
2022-23 या आर्थिक वर्षात भारताने जागतिक बाजारपेठेत लक्षणीय प्रगती केली, 57 पेक्षा जास्त देशांना एकूण 664,753.46 मेट्रिक टन पोल्ट्री उत्पादनांची निर्यात केली, ज्याची एकूण किंमत 1,081.62 कोटी रुपये (134.04 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) आहे. बाजारपेठ संबंधी अलिकडील एका अभ्यासानुसार, भारतीय पोल्ट्री बाजारपेठेने 2024 2032 च्या 8.1% सीएजीआरसह 2023 मध्ये 30.46 अब्ज डॉलर्सचे उल्लेखनीय मूल्यांकन साध्य केले.
गोलमेज बैठकीने गतिशील आदानप्रदानासाठी एक मंच उपलब्ध करून देत सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि भारतीय पोल्ट्री क्षेत्राच्या शाश्वत वाढीसाठी मजबूत धोरणे आखण्यासाठी सहकार्यात्मक प्रयत्नांना प्रोत्साहन दिले. बैठकीत पोल्ट्री क्षेत्राचे प्रतिनिधी, निर्यातदार यांनी पोल्ट्री निर्यातीसंबंधी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाविषयी :
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग पशु कल्याणाला चालना देण्यासाठी, शाश्वत पशुधन विकास सुनिश्चित करण्यासाठी आणि भारतातील दुग्ध आणि मांस क्षेत्रासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.
इन्व्हेस्ट इंडिया बद्दल:
इन्व्हेस्ट इंडिया ही राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा पुरवणारी संस्था आहे, जी गुंतवणुकीला उत्प्रेरित करण्यात, नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि भारतात व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
M.Pange/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1989893)
Visitor Counter : 132