सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

नशा मुक्त भारत अभियान

Posted On: 19 DEC 2023 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 डिसेंबर 2023 

 

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने युवक, महिला, विद्यार्थी यांच्यामध्‍ये नशा मुक्त भारत अभियानाचा संदेश पोहोचवण्‍यासाठी 23 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे इस्कॉन बरोबर एक सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य कराराची  मुख्‍य उद्दिष्‍ट्ये  खालीलप्रमाणे आहेत:

  1. या संदर्भात समाजामध्‍ये प्रत्यक्ष कार्यक्रम आणि समाज माध्‍यमाद्वारे जागरूकता निर्माण करणे
  2. उच्च शैक्षणिक संस्था, विद्यापीठांचे परिसर  आणि शाळा या  अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे
  3. समुदायापर्यंत  पोहोचणे आणि अवलंबून असलेल्या लोकांना चिन्हित करणे.
  4. समुपदेशनाचे कार्य वाढविणे  आणि पुनर्वसन करण्‍यावर अधिक भर देणे
  5. तरुण आणि किशोरवयीन मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे

मंत्रालयाने एनएमबीए म्हणजेच “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत देशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी नवचेतना मॉड्यूल विकसित केले आहेत.

पहिल्या टप्प्यात निश्चित करण्‍यात आलेल्या 300 जिल्ह्यांमधील प्रत्येकी 30पेक्षा जास्त  शिक्षकांसह 100 शाळांचा समावेश केला जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील पाच (05) मास्टर ट्रेनर्स निश्चित  करण्‍यात आले  आहेत.  त्यांना संबंधित राज्यांचे  शिक्षण विभाग आणि एससीईआरटी यांच्यावतीने  प्रशिक्षण दिले जात आहे. हे मॉड्यूल विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

‘नवचेतना’ ची पोहोच वाढविणे आणि प्रभाव आणखी मजबूत करण्यासाठी, प्रशिक्षण साहित्य भारतातील 12 प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित केले जात आहे.

"नशा मुक्त भारत अभियान" अंतर्गत, शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्ये आणि अमलीपदार्थ याविषयी जागरूकता आणि शिक्षण वाढवण्याच्या उद्देशाने शिक्षकांद्वारे नवचेतना प्रशिक्षण ‘ पॅकेज’ चा प्रसार आणि अंमलबजावणी केली जात आहे.

नवचेतना मॉड्यूलची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

  1. शालेय मुलांना असे पदार्थ वापरण्यास प्रतिबंध करणे.  
  2. जी मुले अंमली पदार्थांचे सेवन करतात, त्यांची पुढील तपासणी करणे, समुपदेशनासाठी पाठिंबा देणे  आणि उपचारांसाठी योग्‍य साखळी प्रदान करणे
  3. अंमली  पदार्थ सेवनाच्या प्रारंभीच्या  लक्षणांबद्दल मुलांच्या कुटुंबांना/शिक्षकांना सहाय्य प्रदान करणे  आणि सहाय्याची माहिती उपलब्ध करून देणे.

नवचेतना मॉड्युल्स अंतर्गत, चंदिगड, हिमाचल प्रदेश, जम्मू,  पंजाब, दिल्ली आणि हरियाणा या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत 309  मास्टर ट्रेनर्सना प्राथमिक स्तरावरचे  प्रशिक्षण देण्यात आले आहे. मंत्रालयाने पुढील वर्षीसाठी 300 जिल्ह्यांतील चिह्नित  केलेल्या शाळांमध्ये नवचेतना मॉड्यूल प्रत्यक्षात आणण्याचे लक्ष्य निश्चित केले  आहे.

सामाजिक न्याय आणि सबलीकरण  राज्यमंत्री  ए. नारायणस्वामी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

N.Chitale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1988395) Visitor Counter : 152


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu