वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद अल युसेफ यांची द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांवर चर्चा
Posted On:
18 DEC 2023 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2023
16 डिसेंबर 2023 रोजी ओमानचे सुलतान महामहिम हैथम बिन तारिक यांच्या भारत भेटीच्या निमित्ताने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद अल युसेफ यांनी नवी दिल्ली येथे उभय देशांमधील द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांवर चर्चा केली.
भारत-ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर (सीईपीए) स्वाक्षरीसाठी सुरू असलेल्या वाटाघाटींच्या गतीबाबत उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले एक महिन्याहून कमी काळात वाटाघाटीच्या दोन फेऱ्या जलद गतीने होत आहेत हे दोन्ही देश आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे द्योतक आहे असे त्यांनी अधोरेखित केले.
भारत-ओमान सीईपीए च्या मसुद्याबाबत वाटाघाटी मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. भारत-ओमान सीईपीए वाटाघाटी लवकर पूर्ण करण्यासाठी आणि करारावर स्वाक्षरी करण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी उर्वरित मुद्द्यांवर चर्चा पूर्ण करण्याचे आवाहन उभय नेत्यांनी आपापल्या प्रतिनिधींना केले.
तसेच उभय मंत्र्यांनी दोन्ही देशांतील गुंतवणूक वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवरही चर्चा केली. यासाठी इन्व्हेस्ट इंडियामध्ये ओमान डेस्क तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे इन्व्हेस्ट ओमान देखील इंडिया डेस्क सुरू करणार आहे.
भारत आणि ओमानचा मैत्री आणि सहकार्याचा दीर्घकालीन इतिहास आहे, ज्याचा पाया परस्पर विश्वास आणि आदर तसेच गेल्या अनेक शतकांपासूनचे दोन्ही देशांमधील लोकांमधील मजबूत संबंध हा आहे.
उभय देशांमधील द्विपक्षीय व्यापार 2021-2022 मध्ये 82.64% ने वाढून 9.99 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचला. 2020-2021 मधील 5.4 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत, मागील दोन वर्षांत तो दुपटीने वाढून 2022-2023 मध्ये 12.39 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका झाला.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1987842)
Visitor Counter : 100