आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भव अद्ययावत माहिती
आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रातील 12.6 लाख आरोग्य मेळाव्यांना 10 कोटींपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती
क्षय रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, मोतीबिंदू, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या 17 कोटींपेक्षा जास्त लोकांच्या चाचण्या
3.70 कोटींपेक्षा जास्त आयुष्मान कार्डांची आरोग्य मेळाव्यांमध्ये निर्मिती
4.38 कोटींपेक्षा जास्त आभा (आरोग्य ओळखपत्र) कार्डांची निर्मिती
Posted On:
17 DEC 2023 3:47PM by PIB Mumbai
देशातील तळागाळातील लोकसंख्येपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याच्या उद्देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी 13 सप्टेंबर 2023 रोजी गुजरात मधल्या गांधीनगर इथून दूरदृश्य माध्यमातून ‘आयुष्मान भव’ पोर्टलचे उद्घाटन केले व अभियानाला सुरुवात केली. आयुष्मान भव कार्ड, आभा कार्डांची निर्मिती, आरोग्यविषयक महत्वपूर्ण योजना आणि असंसर्गजन्य रोग, क्षय, सिकल सेल आदी विविध रोगांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशाच्या विविध भागांत 17 सप्टेंबर 2023 पासून आरोग्य मेळावे भरवण्यात आले. सरकारी योजना, माहितीचा प्रसार, प्रचार आणि आरोग्य कल्याण योजनांचे फायदे थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या मेळाव्यांची आखणी करण्यात आली आहे.

अभियानाला सुरुवात झाल्यापासून आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि सामाजिक आरोग्य केंद्रांमध्ये भरवलेल्या 12.6 आरोग्य मेळाव्यांना 16 डिसेंबर 2023 पर्यंत10 कोटींपेक्षा जास्त लोकांनी उपस्थिती लावल्याची नोंद झाली आहे.

तसेच, या काळात 17 कोटींपेक्षा जास्त (17,26,66,845) लोकांनी क्षय रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, मोतीबिंदू, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयमुखाच्या कर्करोग आदी सात रोगांच्या चाचण्या करून घेतल्या आहेत. 16 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात 86,19,636 लोकांनी या सात रोगांच्या चाचण्यांचा लाभ घेतला आहे.
सामाजिक आरोग्य केंद्रांमध्ये 34,107 आरोग्य मेळावे भरवण्यात आले असून त्यामध्ये एकूण 1,37,84,954 लोकांनी नोंदणी केली.

एकूण 3,70,36,445 आयुष्मान कार्डांची निर्मिती आरोग्य मेळाव्यांमध्ये करण्यात आली असून पैकी 4,78,168 कार्डांची निर्मिती या आठवड्यात करण्यात आली. आभा (आरोग्य ओळखपत्र) कार्डांच्या निर्मितीची एकूण संख्या 4,38,93,025 झाली आहे. एकूण 1,10,298 आयुष्मान सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
आयुष्मान भव अभियानाच्या देशभरातील अंमलबजावणीची झलक

मध्य प्रदेशात आयोजित आयुष्मान भव आरोग्य मेळावा

ओदिशात आयोजित आयुष्मान भव आरोग्य मेळावा

मणिपुरात आयोजित आयुष्मान भव आरोग्य मेळावा

उत्तर प्रदेशात आयोजित आयुष्मान भव आरोग्य मेळावा
पार्श्वभूमी –
देशातील तळागाळातील प्रत्येकापर्यंत आरोग्य सेवा घेऊन जाण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेतून ‘आयुष्मान भव’ उपक्रम साकारला आहे. त्याद्वारे देशातील प्रत्येक गाव, शहरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
***
N.Chitale/R.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1987491)