अल्पसंख्यांक मंत्रालय

वर्ष 2023 मध्ये ऐतिहासिक उच्चांक गाठत हजसाठी 4000 हून अधिक महिलांनी एलडब्ल्युएम श्रेणीत यशस्वीरित्या केले अर्ज दाखल

Posted On: 14 DEC 2023 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2023

 

भारत सरकारने हज 2018 मध्ये लेडी विदाऊट मेहरम (LWM - अर्थात हाजी पुरुषाच्या सोबतीशिवाय  यात्रेला जाणारी स्त्री) श्रेणी सादर केली होती आणि तेव्हापासून या श्रेणी अंतर्गत अर्ज करण्यासाठी अधिकाधिक महिलांना प्रोत्साहित करण्यावर भर दिला जात आहे.  वर्ष 2023 मध्ये, ऐतिहासिक उच्चांक गाठत 4000 हून अधिक महिलांनी लेडी विदाऊट मेहराम श्रेणी अंतर्गत यशस्वीरित्या अर्ज दाखल केले आहेत. 

पारंपारिक रित्या, मुस्लिम महिलांच्या वाढत्या  सहभागात एक प्रमुख अडथळा म्हणजे या पवित्र धार्मिक यात्रेसाठी सोबत असलेल्या पुरुष हाजीवर, म्हणजेच मेहरमवर अवलंबून राहणे.  भारत सरकारने 2018 मध्ये पंचेचाळीस (45) वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांना मेहरमशिवाय हजसाठी अर्ज करण्याची परवानगी देऊन हे निर्बंध काढून टाकले होते आणि, पात्र महिलांना चार (4) जणींच्या गटांमध्ये एलडब्ल्युएम श्रेणी अंतर्गत हजयात्रा करण्याची तरतूद करण्यात आली होती.

हज-2023 मध्ये, प्रथमच, भारत सरकारने एकट्या पात्र महिलांना देखील एलडब्ल्युएम श्रेणी अंतर्गत हज-2023 साठी अर्ज करण्याची परवानगी दिली.  या परवानगीमुळे आजवरचा उच्चांक गाठत हज 2023 मध्ये 4000 हून अधिक महिला अर्जदारांनी अर्ज दाखल करुन वाढता आत्मविश्वास, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक गतिशीलता यांची प्रचिती दिली आहे.  या उपक्रमाने लिंग समावेशकता आणि महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक सहाय्यक म्हणूनही काम केले आहे.

एलडब्ल्युएम श्रेणीतील अर्जांना प्रोत्साहन देण्यासोबतच, एलडब्ल्युएम श्रेणीतील यात्रेकरूंना हज  यात्रेत अधिक सुलभता आणि सुविधा देण्यासाठी प्रशासकीयदृष्ट्या पुढील उपाययोजना करण्यात आल्या आहेत:-

  1. एलडब्ल्युएम श्रेणी अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही एकट्या पात्र महिला यात्रेकरूंच्या अर्जाच्या नोंदणीच्या प्रक्रियेचे सरलीकरण.
  2. सौदी अरेबिया (KSA) च्या हवाई प्रवासादरम्यान महिलांना सुविधा आणि सहाय्य करण्यासाठी  लेडी खादिम-उल-हुज्जाज यांच्या नियुक्ती सह  यात्रा प्रारंभाच्या ठिकाणाहून समर्पित हवाई उड्डाणे चालवली गेली.
  3. केवळ मेहरम श्रेणीतील हाजींना राहण्यासाठी समर्पित इमारती उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.  महिला यात्रेकरू आणि त्यांच्या सामानाच्या सुरक्षेसाठी समर्पित महिला समन्वयक, हज अधिकारी, हज सहाय्यक आणि खादिम उल हुज्जाज यांना तैनात करण्यात आले होते.  याव्यतिरिक्त, आरोग्य आणि स्वच्छतेच्या समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या इमारतींमध्ये महिला डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिक तैनात करण्यात आले होते.
  4. सौदी अरेबियामध्ये एलडब्ल्युएम श्रेणीतील यात्रेकरूंच्या वास्तव्यादरम्यान, त्यांच्या वाहतुकीसाठी आवश्यक तेथे, विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.

ही माहिती अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

 

* * *

S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1986448) Visitor Counter : 49


Read this release in: Urdu , Hindi , Tamil , English