रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
अपघात कमी करण्यासाठी आणि आपत्कालीन प्रतिसाद सुधारण्यासाठी महामार्ग प्रकल्पांच्या नियामक चौकटीबरोबर सुरक्षा तंत्रज्ञानाचा मेळ साधणारी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे ही एक सातत्त्यपूर्ण प्रक्रिया आहे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Posted On:
13 DEC 2023 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2023
चारधाम राष्ट्रीय महामार्ग सुधारणा कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय महामार्ग (NH)-134 वरील बांधकामाधीन सिल्क्यारा बोगद्याचा काही भाग कोसळण्याची दुर्घटना नुकतीच घडली आहे. नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचआयडीसीएल), अर्थात राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास संस्थेद्वारे अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जात आहे. या कराराच्या अटी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांच्या अनुषंगाने सर्व सुरक्षा मानके आणि नियम प्रदान करतात. सुरक्षेच्या बाबींसह बांधकामाच्या कामाचे पर्यवेक्षण अधिकृत मान्यताप्राप्त अभियंते करतात. एनएचआयडीसीएल चे क्षेत्रीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी देखील विविध सुरक्षा विषयक पैलूंसह या कामाची नियमितपणे तपासणी करतात. अशा प्रकारे, डिझाईन (आराखडा), बांधकाम, परिचालन आणि देखभाल (O&M) अशा विविध टप्प्यांमधील सुरक्षेचे उपाय, हे बोगदा प्रकल्पांसह महामार्ग प्रकल्पांचा अविभाज्य भाग आहेत. रस्ते वापरणाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, बोगदा प्रकल्पांसह महामार्ग प्रकल्पांच्या डिझाइन टप्पा, बांधकाम टप्पा, उद्घाटन पूर्व टप्पा आणि परिचालन टप्पा, यासारख्या विविध टप्प्यांवर, रस्ते सुरक्षा ऑडिट (लेखा परीक्षण) केले जाते.
हिमालयातील प्रकल्पांसह महामार्ग प्रकल्पांच्या नियामक चौकटीबरोबर सुरक्षा तंत्रज्ञानाचा मेळ साधणारी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे, आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी, अपघात कमी करण्यासाठी आणि आपत्कालीन प्रतिसाद सुधारण्यासाठी त्यांची श्रेणी सुधारणा करणे, ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. राष्ट्रीय महामार्ग (NH)-134 वरील सिल्क्यारा बोगद्याच्या बांधकामाचा काही भाग कोसळल्यानंतर, त्याची कारणे शोधण्यासाठी आणि बोगदा कोसळल्यास/ बोगद्याच्या बांधकामाच्या बाबतीत पाळण्याच्या मानक कार्यप्रणाली (SOPs) संदर्भात शिफारशींसाठी, केंद्र सरकारने तज्ञांची समिती स्थापन केली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1986001)