युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी पहिल्याच खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चा एका शानदार सोहळ्यात केला शुभारंभ
अत्यंत उत्साहपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात, 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1400 पेक्षा अधिक लोकांच्या सहभागाने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध
खेलो इंडिया पॅरा गेम्सचे 10 ते 17 डिसेंबर दरम्यान दिल्लीत आयोजन
Posted On:
11 DEC 2023 7:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2023
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत के. डी. जाधव इनडोअर हॉलमध्ये एका दिमाखदार समारंभात खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 म्हणजेच दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धांच्या शुभारंभाची औपचारिक घोषणा केली.
दिल्लीत तीन ठिकाणी, 10 ते 17 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धांमध्ये 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 1450 हून अधिक खेळाडू आणि सुरक्षा दलातील खेळाडू सहभागी होणार आहे.
या दिमाखदार सोहळ्याच्या सुरुवातीला, हिमाचल प्रदेश पोलिस बँडने चित्तथरारक सादरीकरण केले त्यांनी वाजवलेल्या धूनमुळे, मैदानावर देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरण म्हणजे ‘साई’च्या अधिकाऱ्यांनी ‘कालबेलिया’ हे पारंपरिक नृत्य सादर केले, त्यानंतर 'वी आर वन' गटाच्या नृत्य कलाकारांनी पॅरा नृत्य सादर केले.क्रीडा गीताने, सोहळ्याची सुरुवात झाली त्यानंतर, 'पॅरा गेम्सची उत्क्रांती' या संकल्पनेवर आधारित एलईडी नृत्य प्रेक्षकांना आकर्षित करून गेले.
देशातील दिग्गज दिव्यांग खेळाडू दीपा मलिक, भाविना पटेल, सुमित अंतिल आणि इतरांसमवेत अनुराग ठाकूर यांनी देखील, खेलो इंडिया पॅरा गेम्सचे उद्घाटन करण्यापूर्वी मशाल रिलेमध्ये भाग घेतला.
"भारतीय खेळांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे कारण देशाच्या राजधानीत पहिल्यांदाच खेलो इंडिया पॅरा गेम्स आयोजित केले जात आहेत, ज्यामुळे देशाच्या क्रीडा संस्कृतीत एक नवी चळवळ सुरू झाली आहे. सर्व खेळाडूंना त्यांच्या, क्षमता/अक्षमतांचा विचार न करता, समान संधी देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. खेलो इंडिया दिव्यांग क्रीडा स्पर्धा, हे नव्या भारताचे प्रतीक आहे ", असे अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.
स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देत, अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, " ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही केलेल्या तुमच्या प्रयत्नांबद्दल मला तुम्हा सर्वांचा खूप अभिमान वाटतो. खेळाडू आणि स्पर्धेच्या आयोजक अधिकाऱ्यांसह 3000 हून अधिक लोक आज इथे आले असून, एकूण 276 सुवर्णपदके जिंकण्यासाठी त्यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार आहे. मी प्रत्येक खेळाडूला खूप खूप शुभेच्छा देतो ".
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्रयत्नांचे अभिनंदन करताना केंद्रीय गृह आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्य मंत्री निसिथ प्रामाणिक म्हणाले, “विकलांग शब्दाऐवजी दिव्यांग शब्दाचा वापर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपण आभारी आहोत, ज्यांनी अपंग हा शब्द न वापरता ‘दिव्यांग’ हा शब्द लागू केला. त्यांच्या दूरदर्शी प्रयत्नांनी लोकांना आपली विचारसरणी बदलण्यासाठी प्रोत्साहन दिले.
“खेलो इंडिया कार्यक्रमाद्वारे भारतीय क्रीडा क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्याच्या प्रयत्नांबद्दल मी अनुराग ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. 2030 पर्यंत भारत आशियाई पॅरा गेम्स, अर्थात दिव्यांगांसाठीच्या स्पर्धांमध्ये 200 हून अधिक पदके मिळवू शकेल, यात शंका नाही,” असे ते पुढे म्हणाले.
सर्व पॅरा ऍथलीट्सना सक्षम करणे, हे खेलो इंडिया पॅरा गेम्स आयोजित करण्यामागील केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. दिव्यांगांच्या कल्याणासाठी सरकारने अनेक महत्त्वाचे उपक्रम सुरू केले आहेत.
खेलो इंडिया पॅरा गेम्सचे उद्घाटन इंदिरा गांधी स्टेडियम, जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि करणी सिंग शूटिंग रेंज या तीन ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. ऍथलेटिक्स, नेमबाजी, तिरंदाजी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि भारोत्तोलन, या सात पॅरा क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होणार आहे. शीतल देवी, भाविना पटेल, अशोक यांच्यासह भारताचे इतर अव्वल आंतरराष्ट्रीय पॅरा क्रीडापटू स्पर्धेत सहभागी होतील.
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांना मिळालेल्या अफाट यशानंतर आता खेलो इंडिया पॅरा गेम्सचे आयोजन केले जात आहे, आणि प्रथमच आयोजित केल्या जाणाऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या निमित्ताने राजधानी दिल्लीमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. आठवडाभर चालणारा हा क्रीडा महोत्सव सर्वसमावेशकतेचे प्रतीक असेल तसेच तो मानवी सन्मानाचा उत्सव ठरेल.
S.Kane/R.Aghor/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1985168)
Visitor Counter : 160